नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी जनतेची कामे पारदर्शकपणे करावित-खा.अशोक चव्हाण
लोकनियुक्त नगराध्यक्ष भगवान दंडवे यांनी स्विकारला पदभार ; साडे पाच वर्षांनी संपले भोकर नगर परिषदेवरील प्रशासक राज

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : जनतेने मोठ्या विश्वासाने नगराध्यक्ष व सर्व पक्षीय नगरसेवकांना निवडून दिले आहे.त्यामुळे सर्वजण मिळून जनतेची कामे स्वच्छ व पारदर्शकपणे विनाविलंब करावित, असे आदेशपर सुचक वक्तव्य माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी केले.ते भोकर नगर परिषदेच्या नुतन लोकनियुक्त नगराध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्या प्रसंगी बोलत होते.
राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने दि.२१ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी प्रक्रिया संपन्न झाली व यात भोकर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत थेट जनतेतून भाजपाचे भगवान दंडवे हे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले.तर २२ नगरसेवकांच्या या नगरपरिषदेकरिता भाजपाचे १३ व भाजपा पुरस्कृत ४ असे एकूण १७ नगरसेवक निवडून आले.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) २ व अपक्ष ३ असे अन्य ५ नगरसेवक निवडून आले. परंतू नुतन लोकनियुक्त नगराध्यक्ष भगवान दंडवे यांच्या पदग्रहणास काही दिवस मुहूर्त मिळाला नव्हता.अखेर मुहूर्त मिळाला व दि.२ जानेवारी २०२६ रोजी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण,माजी आमदार अमिता अशोकराव चव्हाण,आमदार ॲड.श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्या मुख्य उपस्थितीत भोकर नगर परिषदेच्या वतीने पदग्रहण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले.
यावेळी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण, भाजपाचे भोकर तालुकाध्यक्ष दिवाकर रेड्डी सुरकुंटवार, माजी जि.प.सभापती प्रकाश देशमुख भोसीकर,बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर,विशाल माने, शेख युसूफ,नगर परिषदेचे मुख्याधिकारी ऋषभ पवार यांसह आदींची सत्कारपीठावर उपस्थिती होती.
नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी ऋषभ पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत केले.तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष भगवान दंडवे व २० नगरसेवकांसह पराभूत तिघांचा खा.अशोक चव्हाण,आमदार ॲड.श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि पुढील सेवा कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर नगराध्यक्ष भगवान दंडवे यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून भोकर शहरातील सर्व नागरीकांचे,खा.अशोक चव्हाण,आमदार ॲड.श्रीजया चव्हाण यांसह पक्षश्रेष्ठी व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्यां सर्वांचे ऋण व्यक्त केले.तसेच भोकर शहरातील नागरिकांनी आम्हास निवडून देत आमच्यावर जे प्रेमरुपी विश्वास व्यक्त केला आहे तो विश्वास टिकवून ठेवण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून तत्परतेने नागरी समस्या सोडवित पारदर्शकपणे काम करु,असे आश्वस्त केले.
आमदार ॲड.श्रीजया चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, नुतन वर्ष हे शहरातील नागरिकांचे विकासात्मक स्वप्न व नवी दिशा घेऊन आलेले आहे. नुतन नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक हे नगर परिषदेंतर्गतची कामे प्राधान्याने करतील व शहराच्या विकासात्मक कामांची आणि नागरी सुविधांची स्वप्ने पुर्ण करतील असा मला विश्वास आहे,असे त्या म्हणाल्या.
तर पुढे बोलतांना खा.अशोक चव्हाण म्हणाले की,पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विविध पक्ष अपक्ष एकमेकांविरुद्ध लढलोत.परंतू आता निवडणूक संपली असून नगर परिषदेत सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहोत.जनतेने निवडून दिलेले तुम्ही सर्व सदस्य आहात. त्यामुळे लोकशाहीचे पाळेमुळे मजबूत करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे व त्यासाठी सर्वांनी विकासात्मक दृष्टीकोन ठेवून चांगला,स्वच्छ व पारदर्शक कारभार करावा. गेल्या ५ वर्षात आपण अनेक विकासात्मक कामे केलोत व पुढील ५ वर्षात अपेक्षीत असलेले उर्वरित कामे करणारच आहोत. असे आश्वासित ही त्यांनी यावेळी केले.सदरील सोहळ्याचे सुरेख असे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन नगरसेविका प्रतिनिधी मनोज गिमेकर यांनी केले.या सोहळ्यास भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते,नगरसेवकांचे समर्थक यांसह नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
…यावेळीच्या काही महत्त्वाच्या घडामोडी…
भगवान दंडवे तुम्हीच पाच वर्षे नगराध्यक्ष राहणार?- खा.अशोक चव्हाण यांनी घेतला मिश्कीलपणे चिमटा
लोकनियुक्त नगराध्यक्षांवर अडीच वर्षांनी अविश्वास ठराव घेतला जाऊ शकतो असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने पारित केला असल्याने खा.अशोक चव्हाण यांनी यावेळी नुतन नगराध्यक्ष भगवान दंडवे यांना मिश्कीलपणे चिमटा घेत म्हटले की,’तुम्ही पाच वर्षे नगराध्यक्ष राहणार काय?’ आणि या प्रश्नाचे उत्तर ही त्यांनीच दिले.उत्तरात म्हटले की,होय तुम्हीच राहणार आहात.तुमची खुर्ची मजबूत आहे व या खुर्चीतून जनतेचे कामे विना तक्रार आणि त्यांना कसलाही त्रास न होता सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन करावेत. असे केल्यास तुम्हीच पाच वर्षे नगराध्यक्ष रहाल,अशी मी ग्वाही देतो.असे ही ते म्हणाले.
नागरीकांना त्रास होणार नाही व फाईली टेबलवर पडून राहणार नाहीत याची काळजी नगर परिषद प्रशासनाने घ्यावी- मुख्याधिकारी यांना केल्या सुचना
दि.१० मे २०२० रोजी भोकर नगर परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती झाली.पहिले प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी पवन चांडक व शेवटचे प्रशासक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांची नियुक्ती होती.भोकर नगर परिषदेवर तब्बल ५ वर्ष ७ महिने २३ दिवस प्रशासक राज होते.लोकनियुक्त नगराध्यक्ष भगवान दंडवे यांनी दि.२ जानेवारी २०२६ रोजी पदभार स्विकारला व प्रशासक राज संपले. दरम्यानच्या दीर्घ काळात भोकर शहरातील अनेक नागरिकांना त्यांची कामे करुन घेण्यासाठी खुप त्रास झाला.ही बाब लक्षात घेऊन खा.अशोक चव्हाण यांनी सत्कार पीठावरील उपस्थित मुख्याधिकारी ऋषभ पवार यांना सुचीत केले की,आता नागरिकांना कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी व त्यांच्या कामाच्या फाईली सहा सहा महिने टेबलवर पडून राहिल्या नाही पाहिजेत.यासाठी नगर परिषद प्रशासनाचा कारभार तत्परतेचा व पारदर्शकतेचा झाला पाहिजे.काही सरकारी अडचणी आल्या तर आम्ही ते पाहू,असे ही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २ नगरसेवकांनी या सोहळ्याकडे फिरवली पाठ,तर ३ अपक्ष नगरसेवकांनी मात्र लावली हजेरी…
संपन्न झालेल्या व होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि खासदार अशोक चव्हाण यांच्यात एकमेकांविरुद्ध टिकास्त्रांचे युद्ध सुरू झाले असल्याचे सर्वश्रृत आहे.सातत्याने आपल्या नेत्याचा अवमान करण्याचा प्रयत्न खा.अशोक चव्हाण व भाजपाच्या काही लोकांकडून केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सदरील पदग्रहण सोहळ्यास अनुपस्थित राहण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या(अजित पवार) नगरसेविका वैशाली गणेश बोलेवार आणि नगरसेवक संजय सुभाषराव घंटलवार यांनी घेतल्याचे समजले असून यामुळेच त्यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरविली असल्याचे यावेळी चर्चील्या जात होते.
तर भाजपाचे माजी नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर यांचा दारुण पराभव करणारे अपक्ष नगरसेवक जटालवार साईप्रसाद सुर्यकांतराव व भाजपाचे भोकर शहराध्यक्ष विशाल माने यांचा पराभव करणारे अपक्ष नगरसेवक देशमुख राजेश्वर विनायकराव यांनी मात्र या सोहळ्याला हजेरी लावली आणि त्यांच्या प्रभागातील विकासात्मक कामांच्या पार्श्वभूमीवर सत्कार स्विकारला. तसेच महत्वाची बाब म्हणजे खा.अशोक चव्हाण तथा भाजपाने उमेदवारी न दिल्याने प्रभाग क्र.८ ब मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून भाजपाच्या उमेदवारास पराभूत करुन निवडून आलेल्या नगरसेवीका अर्चना बालाजी बिल्लरवार यांच्या घरी खा.अशोक चव्हाण गेले व त्यांनी बिल्लरवार परिवाराची नाराजी दूर केली.यामुळे त्या नगरसेवीकेसह बिल्लरवार परिवाराने परत भाजपास पाठींबा दिला आणि सोहळ्यास उपस्थित राहून आमदार ॲड.श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते त्या नगरसेवीकेने सत्कार स्विकारला. एकूणच असे की,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दोन नगरसेवकांनी दर्शविलेला विरोध हा कायमचा राहणार आहे काय ? यावर प्रश्नचिन्ह उभे असून याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. अपक्ष तीन नगरसेवकांपैकी एका नगरसेविकेने पाठींबा दर्शविला असल्याने त्यांचा विरोध ही संपलेला आहे.तर खऱ्या अर्थाने विरोधक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या उर्वरित दोन अपक्ष नगरसेवकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन खा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते सत्कार स्विकारला असल्याने पुढील काळात नगर परिषदेच्या सभागृहात सत्ताधारींच्या विरोधी बाकावर किती नगरसेवक राहतील ? हे पाहण्याची उत्सुकता राहणार आहे.
चार माजी नगराध्यक्षांचीही या सोहळ्यास अनुपस्थिती…
निवडणूकीतील पराभव एका माजी नगराध्यक्षांचा लागला जिव्हारी
भोकर नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष डॉ.विजयकुमार दंडे,दुसरे नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर,तिसरे नगराध्यक्ष साहेबराव सोमेवाड व चौथ्या नगराध्यक्षा संगिता विनोद चिंचाळकर या ४ माजी नगराध्यक्षांची सदरील सोहळ्या प्रसंगीची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.यापैकी एका माजी नगराध्यक्षांना सोहळ्याचे निमंत्रणच दिल्या गेले नसल्याचे बोलल्या जात होते.तर माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांचे अतिशय जवळचे व विश्वासू म्हणून परिचित असलेले माजी नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर यांचा प्रभाग क्र.१ मध्ये दारुण पराभव झाला आणि त्यांना पराभूत करणारे अपक्ष नगरसेवक जटालवार साईप्रसाद सुर्यकांतराव यांना सदरील सोहळ्यास निमंत्रित करण्यात आले होते.ही बाब खटकल्याच्या नाराजीतूनच माजी नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर, त्यांच्या सुविद्य पत्नी माजी नगराध्यक्षा संगिता विनोद चिंचाळकर व विनोद चिंचाळकर यांचे प्रिय मित्र माजी नगराध्यक्ष साहेबराव सोमेवाड या तिघांनीही सदरील सोहळ्यास अनुपस्थिती लावली असल्याची चर्चा उपस्थितांतून होत होती.
जणू काही नगर परिषदेच्या नुतन इमारतीचे ही झाले लोकार्पण...
भोकर नगर परिषदेची टोलेजंग इमारत उभी राहिली आहे. परंतू गेली साडेपाच वर्षे प्रशासक राज होते व सदरील इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास मुहुर्तच मिळाला नव्हता. त्यामुळे लोकार्पणाची वाट न पाहता नगर परिषद प्रशासनाने सदरील इमारतीवर ताबा मिळवित कार्यालय कार्यान्वित केले.इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याची उणीव सातत्याने जाणवत होती.ती उणीव पदग्रहण सोहळ्याच्या माध्यमातून नगर परिषद प्रशासनाने भरुन काढण्याचा प्रयत्न केल्याचे यावेळी दिसून आले.पुष्पहार व फुग्यांनी इमारत सजविण्यात आली होती.लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांनी सजलेल्या या इमारतीत आपल्या नेत्यांसह प्रवेश करत पदग्रहण केले.यातून अशाप्रकारे दुहेरी कार्यक्रम पार पडला व जणू काही या इमारतीचा लोकार्पण सोहळा ही संपन्न झाल्याचे चित्र उपस्थितांना पहावयास मिळाले.



