लक्ष्मीपुजनाच्या पुर्वसंध्येला पिंपळढव येथील तरुण शेतकऱ्याने जीवन संपविले...
पिंपळढव साठवण तलावात जमिन गेली...जगण्याचे एकमेव साधन बुडीत क्षेत्रात गेले,अपेक्षेप्रमाणे मावेजा ही मिळाला नाही...भविष्यात जगावे कसे ? या नैराश्येतून तरुण शेतकऱ्याने केली आत्महत्या...

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : पिंपळढव ता.भोकर येथील एका शेतकऱ्याची पुर्ण ६ एकर जमीन पिंपळढव साठवण तलावाच्या बुडीत क्षेत्रात गेली.त्यांना सदरील जमिनीचा मावेजा अपेक्षेपेक्षा खुप कमी मिळाला.कुटूंबाच्या जगण्याचे मुख्य साधन गेले. यामुळे भविष्यात जगावे कसे ? हा प्रश्न सातत्याने सतावत असल्याने भविष्यातील जगण्याच्या चिंतेच्या नैराश्यातून २३ वर्षीय तरुण शेतकऱ्याने दि.२० ऑक्टोबर रोजी विषारी औषध प्राशन करून ऐन दिवाळी सणात लक्ष्मी पूजनाच्या पुर्वसंध्येला आत्महत्या केली असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पिंपळढव ता.भोकर येथे होते असलेल्या साठवण तलावाच्या निर्मितीने जलसिंचन विकासात भर पडत आहे. त्यासाठी सिद्धार्थनगरवाडी,जामदरी,डौर व पिंपळढव येथील काही शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनी या तलावाच्या बुडीत क्षेत्रात गेल्या.याच बुडीत क्षेत्रात पिंपळढव येथील नरसिंग मारोती करेवाड (४५) यांची ६ एकर पुर्ण शेती गेली. या जमिनीच्या मोबदल्यात त्यांना केवळ २१ लाख रुपये मंजूर झाले.पहिल्या हप्त्यात त्यापैकी ७० टक्के मावेजा त्यांना मिळाला आहे.यामुळे ती जमिन ७/१२ वरुन कमी करण्यात आली आहे.उर्वरित रक्कम येणे शिल्लक होती. सदरील शेतकऱ्याच्या कुटूंबात त्यांच्यासह पत्नी व २ मुले असे एकूण ४ जण,या सर्वांची उपजिविका याच शेतीवर अवलंबून होती.
त्यांचा मोठा मुलगा मारोती उर्फ बबलू नरसिंग करेवाड (२३) हा आई-वडिलांना नेहमी म्हणायचा…आपली पुर्ण शेती गेली.त्यामोबदल्यात आपल्याला जो मावेजा मिळाला आहे तो खुपच कमी आहे.त्या रक्कमेत दुसरी जमिन घ्यायची म्हटले तर त्यात १ एकर जमिन पण येत नाही. आपले जगण्याचे मुख्य साधन गेले आहे,भविष्यात आपण जगायचे कसे ? असे म्हणून तो हताश व्हायचा.आई-वडील सर्वजण त्यांची समजूत काढायचे.परंतू त्याचे समाधान व्हायचे नाही.दि.२० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी मारोती करेवाड हा तरुण शेतकरी आपल्या त्या शेताकडे गेला व सायंकाळी ६:०० वाजताच्या दरम्यान कोणतेतरी विषारी औषध प्राशन केले.याच अवस्थेत तो घरी आला.दिवाळी सण असल्याने सर्वजण घरीच होते.घरी येताच तो अंगणात कोसळला.सर्वजण त्याच्याजवळ जाऊन पाहतात तर काय? त्याने विषारी औषध प्राशन केल्याचे निदर्शनास आले.अशा अवस्थेत ही त्याने आपल्या शेतीविषयीच बोलले.कुटूंबिय व नातेवाईकांनी त्यास उपचारासाठी भोकर येथे आणण्यासाठी प्रयत्न केले,परंतू यात यश आले नाही व त्याची प्राणज्योत मालवली.वडिल नरसिंग करेवाड यांनी त्यांची सर्व जमीन पिंपळढव साठवण तलावाच्या बुडीत क्षेत्रात गेली व ७/१२ कोरा झाला आणि शासनाने मोबदल्यातला मावेजा ही खुपच कमी दिला.कुटूंबियांच्या जगण्याचे एकमेव मुख्य साधन गेले.भविष्यात जगायचे कसे ? ही चिंता सतावत असल्याने नैराश्येपोटी माझ्या मुलाने ही आत्महत्या केली आहे,अशी फिर्याद दिली.यावरुन ५४/२०२५ प्रमाणे भोकर पोलीसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.रात्री दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी डी.एस.हाके यांनी भोकर पोलीस ठाण्यात येऊन या शेतकरी कुटूंबाची आस्थेवाईकपणे चौकशी करुन सांत्वन केले.तर पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास जमादार राजेश्वर कळणे हे करत आहेत.तसेच समाजसेवक तथा राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार यांनी देखील या शेतकरी कुटूंबाची भेट घेऊन सांत्वन केले.ऐन दिवाळीचा सण व लक्ष्मीपुजन दिनाच्या पुर्वसंध्येला या तरुण शेतकऱ्याने नैराश्यातून आपले जीवन संपविले असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




