आपलं नांदेडनांदेड जिल्हाभोकरमराठवाडाराजकिय

भोकर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या दावेदारीत त्या तिघांपैकी ‘तो’ कोण असेल ?

नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या संभाव्य तीन उमेदवारांची यादी प्रदेश पक्षश्रेष्ठीकडे सादर

उत्तम बाबळे,संपादक
भोकर : राज्य निवडणूक आयोगाने दि.४ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा केली आहे.त्यामुळे पक्ष व अपक्ष  इच्छूक उमेदवारांनी निवडणुकीच्या रणांगणात झुंज देण्यासाठी कंबर कसली आहे.काही राज्य व राष्ट्रीय पक्षाच्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची अद्यापही निश्चिती झालेली नाही.परंतू भाजपने निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच प्रत्येक नगरपालिका/नगरपरिषदेमध्ये निरीक्षक पाठवून मोर्चेबांधणी केलेली आहे.पक्ष निरीक्षकांनी काही पदाधिकारी व काही नागरिकांच्या भेटी घेऊन,चर्चा करून गोपनीय अहवालानुसार प्रत्येक नगरपालिका/नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी तीन संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत.तसेच ती यादी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सादर करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.भोकर नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी साधारणतः ६ जणांची नावे चर्चेत आहेत.परंतू उपरोक्त प्रमाणे प्रदेश पक्षश्रेष्ठीकडे पाठविण्यात आलेले ते तीन नावे कोणाची व त्यापैकी उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत.त्यात नांदेड जिल्ह्यातील १२ नगर परिषद व १ नगर पंचायतीचा समावेश आहे.माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण व त्यांच्या कन्या आमदार ॲड.श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्या मतदारसंघातील भोकर नगर परिषदेच्या निवडणूकीकडे अनेकांचे विशेष लक्ष आहे. राज्यात भाजपा,शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महायुती आहे.परंतू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती धर्म पाळल्या जाणार नसल्याचे गृहीत धरून प्रत्येक पक्षाने आपापल्या पक्षाची तयारी केल्याचे निदर्शनास येत आहे.त्यानुसार होऊ घातलेल्या भोकर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या दावेदारीतील संभाव्य उमेदवारांनी पक्षश्रेष्ठी आणि मतदारांपुढे उच्छूक उमेदवार म्हणून अनेकांनी इच्छा प्रकट केलेली आहे.त्यात नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर, त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा सौ.संगिता विनोद चिंचाळकर,भगवानराव दंडवे,शेख युसूफ,चंद्रकांत पाटील चिंचाळकर व डॉ. रामेश्वर भाले यांच्या नावांचा समावेश आहे.
या सहा जणांपैकी ४ जणांनी भोकर नगर परिषदेची सत्ता उपभोगलेली आहे.तर दोघांचे या क्षेत्रात नव्याने व पहिल्यांदाच पदार्पण होत आहे.असे असले तरी यावेळी थेट जनतेमधून नगराध्यक्षाची निवड होणार आहे.त्यासाठी भाजपकडून कसून चाचपणी करण्यात आली असून उमेदवार ठरविण्यात आले आहेत.तसेच नगराध्यक्ष कोण असावा,याबाबतही निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतलेली आहेत.भाजपकडून प्रत्येक नगरपालिका/नगर परिषदेच्या शहरांत पक्षाचे आमदार,जिल्हाध्यक्ष,प्रमुख पदाधिकारी यांना पाठवण्यात आले होते.तसेच विविध आघाड्यांच्या अध्यक्षांसह जिल्हा पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून नगराध्यक्षपदाचे योग्य उमेदवार कोण ? हे गोपनीयरित्या ठरविण्यात आले आहे.यामधूनच नगराध्यक्ष पदासाठी तीन नावे ठरविण्यात आली असल्याचेही समजते. तसेच ते तीन नावे प्रदेश पक्षश्रेष्ठीकडे पाठविण्यात आले आहेत असे ही समजते.पाठविण्यात आलेल्या त्या तीन नावांचे पुन्हा एकदा तातडीने सर्वेक्षण केले जाणार असून मतदारांना या उमेदवाराबाबत काय वाटते? याचा आढावा देखील सर्वेक्षणाच्या माध्यमातून घेतला जाणार आहे,अशी माहिती सुत्रांद्वारे समोर येत आहे. होऊ घातलेली निवडणूक ऑक्टोबर २०२५ च्या अखेरीस अद्ययावत केलेल्या मतदार यादीनुसार घेण्यात येणार असून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया दि.१० नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होईल आणि अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि.१७ नोव्हेंबर २०२५ आहे.दि.२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून,दि.३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी केली जाणार आहे.निवडणूक मतदान प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे पार पडणार असून हे यंत्रच मतमोजणीतून विजयी व पराजयी उमेदवार ठरविणार आहे.भोकर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या संभाव्य तीन उमेदवारांचे नावे प्रदेश पक्षश्रेष्ठीकडे पाठविण्यात आले आहेत.त्यापैकी ‘तो’ एक कोण ? हे दि.१७ नोव्हेंबर २०२५ रोजी शिक्कामोर्तब होणार आहे.त्या अगोदर ही होऊ शकते.परंतू दि.१७ नोव्हेंबर रोजी पक्षाचा ‘बीफॉर्म’ त्या उमेदवाराच्या नामनिर्देशनास जोडला जातो म्हणून दि.१७ नोव्हेंबर रोजी ती निश्चिती कळणार आहे.पाहुयात उपरोक्त उल्लेखीत सहा जणांपैकी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते…? तसेच एक विशेष बाब म्हणजे खा.अशोकराव चव्हाण यांची आतापर्यंतची ‘डाव’ टाकण्याची खेळी पाहिली तर या सहा जणांऐवजी नवेच नाव ते अचानकपणे पुढे आणू शकतात,अशी ही चर्चा होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close