भोकर जिल्हासत्र न्यायालयाने लाचखोर अभियंत्यास दिली १ वर्ष सक्तमजुरी कारावासाची शिक्षा
तसेच १० हजार रुपये अतिरिक्त दंडाची शिक्षा ही दिली...

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : सन २०१४ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताटकळवाडी ता.भोकर येथील शाळेच्या मुख्याध्यापकाकडून शाळा खोलीच्या बांधकामाच्या निधीचे अंतिम देयक काढून देण्यासाठी भोकर पंचायत समिती अंतर्गत सेवारत असलेले तत्कालीन बांधकाम अभियंता तुकाराम आनंदराव चौतमल यांनी १ हजार ५०० रुपयाची लाच घेतली होती.सदरील गुन्हे प्रकरणात हा अभियंता दोषी ठरला असल्याने जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय भोकर चे जिल्हा न्यायाधीश मोहम्मद नसिर मोहम्मद सलीम यांनी त्यास १ वर्ष सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा दि.८ एप्रिल २०२६ रोजी सुनावली आहे.
सन २०१३ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ताटकळवाडी ता.भोकर येथील शाळेत सर्व शिक्षा अभियान योजनेअंतर्गत एका खोलीचे बांधकाम करण्या करिता ३ लाख ८० हजार रुपये निधी मंजूर झाला होता. या निधीतून त्या शाळा खोलीचे बांधकाम करण्यात आले. बांधकामासाठी मंजूर झालेल्या निधीतील उर्वरित १८ हजार ९०० रुपये निधी येणे बाकी होते.त्या निधीची मागणी शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक अशोक गंगाधर सोळंके यांनी संबंधित बांधकाम विभागाकडे वारंवार केली.परंतू पंचायत समिती कार्यालय अंतर्गत गटशिक्षणाधिकारी कार्यालयात सेवारत असलेले तत्कालीन बांधकाम अभियंता तुकाराम आनंदराव चौतमल यांनी त्या उर्वरित निधीचे अंतिम देयक काढून देण्यासाठी मुख्याध्यापकाकडे ५ हजार रुपयाची मागणी केली.यावेळी तडजोडीअंती २ हजार ५०० रुपये देण्याचे मुख्याध्यापकांनी मान्य केले.
पैशाची सततची मागणी व तगादा लावल्याने सन २०१४ मध्ये मुख्याध्यापक अशोक गंगाधर सोळंके यांनी याविषयीची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांच्याकडे केली.या तक्रारीवरुन लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड च्या पथकाने तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली.तसेच १ हजार ५०० रुपयाची लाच स्विकारतांना अभियंता तुकाराम आनंदराव चौतमल यांना पथकाने रंगेहाथ पकडले व त्यांच्याविरुद्ध गु.र.नं.२२/ २०१४ कलम ७,१३(१)(डी) सह कलम १३(२) लाच लुचपत प्रतिबंधक अधिनियम १९८८ प्रमाणे भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड चे पोलीस उपअधीक्षक भीमराव शिंगाडे यांनी केलेल्या तपासाअंती
दोषारोप पत्र दाखल केल्यानुसार जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय भोकर येथे सदरील गुन्ह्याचा खटला स्पेशल केस नंबर ०४/२०१४ प्रमाणे सुरू होता. दरम्यानच्या काळात सरकारी वकील ॲड.अनुराधा डावखरे यांनी ६ साक्षीदार तपासले.सरकारी वकील व आरोपीचे वकील यांच्या झालेला युक्तिवाद आणि कागदोपत्री पुरावे आरोपी अभियंता तुकाराम आनंदराव चौतमल यांच्या विरुद्ध गेले.यावरुन अभियंता तुकाराम आनंदराव चौतमल हे दोषी ठरले.यावरुन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय भोकर चे न्यायाधीश मोहम्मद नसिर मोहम्मद सलीम यांनी दि.८ एप्रिल २०२६ रोजी आरोपी अभियंता तुकाराम आनंदराव चौतमल यांना कलम ७,१३(१)(डी) मध्ये १ वर्ष सक्तमजुरी कारावास व ५ हजार रुपये दंड,तसेच सह कलम १३(२) लाच लुचपत प्रतिबंधक अधिनियम १९८८ मध्ये १ वर्ष सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड,अशा प्रकारे १ वर्ष सक्तमजुरी कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.सदरील खटल्या दरम्यान स्टार केस निरीक्षक अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक रसूल तांबोळी यांनी काम पाहिले.तर पैरवी अधिकारी म्हणून न्यायालयीन कामकाजात महिला पो.कॉ.वैशाली पुंडगे व पो.ह.बाबुराव सावळे यांनी सहकार्य केले.तसेच वॉरंट व समन्स बजावयाचे काम ही केले.




