संघटनेच्या कर्तव्यदक्ष ऑटो चालकास सापडलेला १७ हजाराचा मोबाईल प्रवाश्यास केला परत
प्रामाणिकपणा व माणूसकी जपणारी ही संघटना : अनेकांतून होत आहे अभिनंदनीय कर्तव्याचे कौतुक!

अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : हल्लीच्या काळात बहुतांशरित्या प्रामाणिकपणा दुर्मिळ होत असल्याचे निदर्शनास येत असले तरी अजूनही काही सुसंस्कारी,चारित्र्यसंपन्न व प्रामाणिक लोक समाजात असल्याचा प्रत्यय नुकताच नांदेड शहरात आला असून ऑटोरिक्षात बसलेल्या एका प्रवाशाचा मोबाईल हरवला व तो टायगर संघटनेच्या ऑटोरिक्षा चालकास मिळाला. सापडलेला तो मोबाईल या चालकाने प्रामाणिकपणे त्या प्रवाश्यास परत केल्याने त्याचे अनेकांतून अभिनंदन होत आहे.
टायगर ऑटो रिक्षा चालक संघटनेचे सदस्य रिक्षा चालक शेख सुफियान रफिक,रा.फारुख नगर नांदेड हे दि.९ सप्टेंबर २०२५ रोजी नेहमी प्रमाणे आपला एम.एच.२६ बी. डी.८२२३ क्रमांकाचा ऑटो रिक्षा नांदेड शहरात घेऊन गेले असता दुपारी ४:३० वाजताच्या दरम्यान त्यांच्या ऑटो रिक्षामध्ये भगवानराव मारोतराव पतंगे, रा.येळेगाव ता. कळमनुरी जि.हिंगोली हा प्रवासी मौलाना अबुल कलाम आझाद ऑटो रिक्षा स्टॅन्ड रेल्वे स्टेशन नांदेड येथून बसला आणि नमस्कार चौक येथे उतरला.लोटस हॉस्पिटलमध्ये हृदयाचे ऑपरेशन झालेल्या व औषधी घेण्यासाठी नांदेडला आलेल्या या प्रवाश्याच्या नंतर लक्षात आले की,त्यांचा मोबाईल त्या ऑटो रिक्षातच राहिला असावा? लगेच त्यांनी रेल्वे स्टेशन समोर असलेला तो ऑटोरिक्षा थांबा गाठला व तेथे उपस्थित असलेल्या शेख अहेमद यांना मोबाईल विषयी सांगितले.यावेळी शेख अहेमद यांनी तात्काळ चालक शेख सुफियान यांच्याशी संपर्क साधला असता सदरील प्रवाश्याचा मोबाईल माझ्या ऑटोरिक्षात सापडला असून तो माझ्याकडे सुरक्षित आहे असे त्याने सांगितले.ही माहिती टायगर ऑटो रिक्षा चालक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अहेमद (बाबा) बागवाले यांना देण्यात आली.
अहेमद (बाबा) बागवाले यांनी ही माहिती लगेच वजिराबाद नांदेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम व वाहतूक पोलीस निरीक्षक साहेबराव गुट्टे यांना दिली.चालक शेख सुफियान व पो.नि.साहेबराव गुट्टे यांना तेथे बोलावून घेतले.मोलाना अबुल कलाम आझाद रिक्षा स्टॅन्ड येथे रिक्षा चालक शेख सुफियान यांच्या कडील प्रवासी भगवानराव पतंगे यांचा १७ हजार रुपये किंमतीचा मोबाईल उपस्थितांसमोर परत करण्यात आला.यावेळी पो.नि. साहेबराव गुट्टे,टायगर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अहेमद (बाबा) बागवाले, संदीप राठोड,शेख अहेमद,शेख इसाक,ठाकूर, डूकरे पाटील,नासेर खान,सावकार यांसह टायगर ऑटो रिक्षा संघटनाच्या पदाधिकाऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.




