होय आम्ही पण आदिवासीच,एसटी आरक्षणसाठी बंजारा समाजाने भोकर मध्ये पुकारला एल्गार !
या मागणीसाठी तहसिल कार्यालयावर काढण्यात आला प्रचंड मोर्चा

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : सन १९२० च्या हैदराबाद गॅझेट नुसार आम्ही पण आदिवासीच आहोत असे म्हणत महाराष्ट्रातील बंजारा समाजास अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गात समाविष्ट करुन आरक्षण द्यावे,या मागणीसाठी भोकर तालुक्यातील बंजारा समाजाने एल्गार पुकारला असून दि.१० सप्टेंबर २०२५ रोजी समस्त बंजारा समाज आरक्षण समितीच्या वतीने भोकर तहसिल कार्यालयावर पारंपारिक वेशभूषेतील महिला व पुरुषांनी प्रचंड मोर्चा काढला.
बंजारा आरक्षण समितीचे अध्यक्ष रमेश राठोड यांच्या नेतृत्वात व सखाराम राठोड,मोहन राठोड,दिलीप जाधव, मनोजकुमार राठोड,ज्ञानेश्वर राठोड,किशोर जाधव, प्रफुल राठोड,विशाल जाधव,साई राठोड,ॲड.विनोद चव्हाण, साहेबराव जाधव,बालाजी जाधव,धोंडू राठोड यांच्या पुढाकारातून व संत सेवालाल स्मारक समिती भोकर चे अध्यक्ष डॉ.उत्तम जाधव,डॉ.राम जाधव नाईक,डॉ.अरविंद चव्हाण,डॉ.शिवाजी पवार यांसारख्या समाज मान्य प्रतिष्ठांच्या सहभागातून संत सेवालाल महाराज स्मारक तथा नंगारा भवनाची नियोजित जागा,किनवट रोड भोकर येथे याडी जगदंबा आणि संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेची पूजा करून भव्य मोर्च्याचा आरंभ करण्यात आला.पारंपारिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला व पुरुषांचा बहुसंख्येने सहभाग असलेल्या या भव्य मोर्चाची सांगता तहसिल व उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला.
यावेळी समाजातील मान्यवर व आयोजकांनी आपल्या मनोगतातून मोर्चाची पार्श्वभूमी विषद केली आणि तहसिलदार विनोद गुंडमवार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.पाठविण्यात आलेल्या निवेदनात खालील प्रमाणे ऐतिहासिक व कायदेशीर मुद्दे नमुद केले की,सन १९२० च्या हैदराबाद गॅझेटमध्ये लंबाडा/बंजारा/सुगाली समाजाचा ‘ट्राइब’ म्हणून स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.जसे की, “The Lambada’s Otherwise called Banjara’s or Sugali’s are large wandering tribe found in great number throughout the Hyderabad state…they are regarded as a distinct Tribes.” तर १९०१ ते १९४८ दरम्यानच्या सर्व हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाला ‘ट्राइब’ म्हणून संबोधले आहे.तसेच १९३१ च्या जनगणनेत त्यांची लोकसंख्या देखील नोंदवली आहे.सन १९४८ मध्ये हैदराबाद संस्थानातून मराठवाडा मुक्त झाला,परंतु सन १९५६ पर्यंत तो हैदराबाद राज्याचाच भाग राहिला. दरम्यानच्या काळात बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा होता,जो सन १९६० नंतर महाराष्ट्रात रद्द करण्यात आला.याच बरोबर दि.१० जानेवारी १९५० रोजी केंद्रीय प्रांत व बेरार सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमातीच्या यादीत चौथ्या क्रमांकावर ठेवण्यात आला होता.हा एक ऐतिहासिक दस्तावेज सद्याच्या विदर्भ आणि खानदेशातील जिल्ह्यांसाठी लागू होता.

तसेच सन १९५६ च्या राज्य पुनर्रचना कायद्यानंतर हैदराबाद व सीपी बेरार या प्रांतातून बंजारा समाजाला मिळालेला अनुसूचित जमाती (एस.टी.)चा दर्जा महाराष्ट्रात रद्द करण्यात आला,तर तेलंगणा आणि झारखंड सारख्या इतर राज्यांत तो कायम ठेवण्यात आला.हा भेदभाव संविधानातील समानतेच्या हक्काचा (अनुच्छेद १५) उल्लंघन करत आहे.हा निर्णय बंजारा समाजाच्या मागणीला बळ देणारा असल्याने हैदराबाद गॅझेट व इतर ऐतिहासिक दस्तावेज हे बंजारा समाज अनुसूचित जमातीत असल्याचे पुरावे दर्शवितात.त्यामुळे राज्य सरकारने बंजारा समाजास एस.टी.आरक्षणात समाविष्ट करावे आणि न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.सदरील मोर्चा यशस्वी करण्यासाठी आयोजन समिती व समस्त समाजाने परिश्रम घेतले असून पाठविण्यात आलेल्या निवेदनावर रमेश राठोड,मोहन राठोड,सखाराम राठोड,विशाल जाधव, मनोजकुमार राठोड,ज्ञानेश्वर राठोड,मिलन जाधव,प्रफुल्ल राठोड, साहेबराव जाधव यांसह बहुसंख्य समाज बंधू भगिनींच्या स्वाक्षऱ्या आहेत.



