भोकर महसूल विभागाने जप्त केलेली ६० ब्रास रेती १२ घरकुल धारक लाभार्थ्यांना केली वितरित
तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी वरीष्ठांच्या आदेशाने रेती साठेबाजांवर केली मोठी कारवाई

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर शहर व तालुक्यात तस्करी मार्गाने मोठ्या प्रमाणात अवैध रेती येत असल्याच्या आणि खरेदी विक्री होऊ साठवण केल्या जात असल्याच्या तक्रार होत होत्या.त्या अनुषंगाने भोकर महसूल विभागाचे तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी वरीष्ठांच्या आदेशाने सर्वे करून भोकर शहरात साठवण केलेल्या रेतीचे पंचनामे केले होते.त्या अवैध रेती साठ्यांपैकी तीन ठिकाणची एकूण ६० ब्रास रेती दि.२ जून रोजी महसूल विभागाने ताब्यात घेतली व शासन नियमानुसार १२ घरकुल धारक लाभार्थींना प्रति लाभार्थी ५ ब्रास प्रमाणे ती रेती वितरीत केली आहे.तर तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी केलेल्या या धाडसी कारवाईमुळे अवैधरित्या रेती खरेदी करून साठवण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
भोकर तालुक्यात मोठी नदी वाहत नसल्याने रेती घाट ही नाहीत.त्यामुळे तालुक्यातील बांधकामांसाठी वैध असो का अवैध रेती अन्य तालुक्यातून आणावी लागते.याचाच गैरफायदा घेत माफिया हे तस्करी मार्गाने आणलेली अवैध रेती अव्वा च्या सव्वा भावाने विक्री करुन मोकळे होतात. महसूल व पोलीस विभागाकडून अनेक वेळा अवैध रेती पकडली जाते व कारवाई ही केली जाते.परंतू या दोन्ही विभागाची नजर चुकवून काही रेती तस्कर गरजवंताना अवैध रेती विक्री करतातच.तस्करी मार्गाने आलेल्या या रेतीचे साठे भोकर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याच्या तक्रारी अनेक गरजवंत घरकुल धारक लाभार्थी व अन्य नागरीकांकडून होत होत्या.तसेच घरकुल धारक लाभार्थी बांधकामासाठी रेती उपलब्ध करुन देण्यासाठी मागणी करत होते.याच अनुषंगाने भोकर तहसिल चे तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी वरीष्ठांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली भोकर शहर व तालुक्यात आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण केले. यात त्यांना भोकर शहरात काही ठिकाणी अवैध रेतीचे साठे करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते.यावरुन सदरील अवैध रेती साठ्यांचे महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत रितसर पंचनामे ही करण्यात आले.तसेच त्याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आली होती.
घरकुल धारक लाभार्थींना बांधकामासाठी ५ ब्रास रेती शासन निर्णयानुसार उपलब्ध करुन देण्यासाठी अनेक घरकुल धारक लाभार्थींनी मागणी केली होती.याची दखल घेऊन त्यांना अवैधरित्या साठविलेली ती रेती उपलब्ध करून देण्यासाठी भोकर चे तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे परवानगीची मागणी केली होती.त्यांच्या त्या मागणीस वरिष्ठांनी मंजूरी दिली.त्यावरुन तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी भोकर शहरात अवैधरित्या साठवण केलेली व जप्त केलेली ती रेती घरकुल धारक लाभार्थींना वाटप करण्याचा निर्णय घेतला.तसेच दि.२ जून २०२६ रोजी भोकर शहरातील उमरी रोड इदगाह परिसर,हुंडेकर कॉलनी मधील विमल शाळेजवळ व सोनटक्के कॉलनी बोरगाव रोड या तीन ठिकाणची जप्त करण्यात आलेली ६० ब्रास रेती शासन निर्णय तरतुदीनुसार व वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार ताब्यात घेऊन मंजूर घरकुल धारक लाभार्थींना प्रति लाभार्थी ५ ब्रास रेती याप्रमाणे एकूण १२ लाभार्थींना ती वितरीत केली.त्या लाभार्थीत पोमनाळा येथील ३, सोमठाणा येथील ३,रायखोड येथील १,खडकी येथील २ व चिंचाळा येथील २ व अन्य १ अशा प्रकारे एकूण १२ घरकुल धारक लाभार्थींचा समावेश आहे.तर सदरील रेती वितरणाच्या धाडसी कार्यवाहीत तहसिलदार विनोद गुंडमवार यांच्या समवेत निवासी नायब तहसिलदार अभयराज नंगडे,उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे नायब तहसिलदार काशिनाथ डांगे,मंडळ अधिकारी मनोज खंदारे, सहाय्यक महसूल अधिकारी रत्नाकर भुरके,ग्राम महसूल अधिकारी अनिल मुनेश्वर यांसह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.




