आपलं नांदेडनांदेड जिल्हाभोकरमराठवाडाराजकिय

भोकर नगर परिषदेच्या उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र स्विकारण्यासाठी यंत्रणा सज्ज- विनोद गुंडमवार

आज पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास होत आहे सुरुवात...

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : होऊ घातलेल्या भोकर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ करीता नगराध्यक्ष व २२ नगरसेवकांच्या ११ प्रभागातील निवडणूकीच्या अनुषंगाने नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा आज पहिला दिवस असून या प्रक्रीयेसाठीची सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी दिली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीतील पहिल्या टप्प्यात नगर परिषद व नगर पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत असून दि.४ नोव्हेंबर २०२५ रोजी पासून त्या त्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तसेच निवडणूक लढविणाऱ्या इच्छूक उमेदवारांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा आज दि.१० नोव्हेंबर २०२५ रोजी पहिला दिवस आहे.होऊ घातलेल्या भोकर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता नगराध्यक्ष व २२ नगरसेवकांच्या ११ प्रभागासाठी पक्ष अपक्षांच्या इच्छुक उमेदवारांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा पहिला दिवस आहे.

लोकनियुक्त नगराध्यक्षासाठी ११ प्रभागातील १४ हजार १९० पुरुष,१४ हजार ५५६ स्त्री व इतर २ असे एकूण २८ हजार ७४८ मतदार ३१ मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.प्रभाग क्रमांक १ व ८ मध्ये २ आणि उर्वरित सर्व प्रभागात ३ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.

उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठीचा आज पहिला दिवस आहे.त्याकरिता राज्य निवडणूक आयोगाने सुचित केलेल्या नियमावलीनुसार त्यांनी नामनिर्देशनपत्र प्रथम ऑनलाईन दाखल करायचे आहेत व त्या नामनिर्देशनपत्राची संचिका दि.१७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३:०० वाजताच्या आत ऑफलाईन दाखल करावयाची अंतिम मुदत आहे.त्यासाठी व नाहरकत प्रमाणात देणे,नामनिर्देशनपत्रासोबतच्या महत्वाच्या कागदपत्रांची पुर्तता करणे यासह आदी बाबींकरिता एक खिडकी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.तसेच अत्यावश्यक असलेल्या सर्व पथकांची स्थापना ही करण्यात आली आहे.तसे निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसार निवड प्रक्रिया पार पडेल व उमेदवार आणि मतदारांना कोणतीही गैरसोय होऊ नये याची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी दिली आहे.तसेच सर्वांनी आचारसंहितेचे कठोरपणे पालन करावे,असे आवाहन ही त्यांनी केले आहे.निवडणूक प्रक्रीया पार पाडण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी ऋषभ पवार व भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे नायब तहसिलदार डांगे हे मदतनीस म्हणून प्रक्रिया पाहत असून उमेदवारांना काही अडचण भासल्यास त्यांच्याशी संपर्क करावा असे सांगण्यात आले आहे.तर मग पाहुयात की,आज पहिल्या दिवशी किती उमेदवार आपले नामनिर्देशनपत्र दाखल करतील ते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close