आपलं नांदेडक्राइमनांदेड जिल्हाभोकरमराठवाडा

कत्तलीसाठी नेणारे ११ गोवंश भोकर पोलीसांनी पकडले

११ गोवंश व १ चारचाकी मालवाहू वाहन असा एकूण ५ लाख १६ हजार रुपयाचा मुद्देमाल केला हस्तगत

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : गोपनीय माहिती मिळाल्यावरुन तस्करी मार्गाने तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेत असलेले ११ गोवंश दि.११ फेब्रुवारी रोजी रात्री ९:३० वाजताच्या दरम्यान भोकर पोलीसांनी गारगोटवाडी ते दिवशीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पकडले असून गोवंशासह १ मालवाहू चारचाकी वाहन असा एकूण ५ लाख १६ हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.तसेच ते वाहन सोडून चालकाने पलायन केल्यामुळे आज्ञात आरोपींविरुद्ध भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भोकर पोलीसांनी केलेली सदरील कारवाई ही अभिनंदनीय असल्याने पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ही कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी आदेशित केल्यावरुन गोवंश हत्त्या व तस्करी विरोधी कारवाई करण्याच्या संदर्भाने दि.११ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री शोध मोहिमेवर निघालेल्या भोकर पोलीसांच्या एका पथकास गोपनीय माहिती मिळाली की,तामसा ता.हदगाव येथून भोकर तालुक्यातील बोरगाव मार्गाने एक वाहन कत्तलीसाठी गोवंश घेऊन जात आहे.ही माहिती त्या पथकाने आपल्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिली.त्यानुसार पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,भोकर च्या अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील,नांदेड चे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव,किनवटचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांचे मार्गदर्शनाखाली भोकर चे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी पो.उप.नि.मोहन राठोड,जमादार सोनाजी कानगुले,जमादार बालाजी लक्षटवार,जमादार राम वाघमारे,जमादार राजेश घुन्नर जमादार शेख मकसूद,जमादार अतिष राचलवाड,चालक जमादार राम टेकाळे यांचे पथक सदरील कारवाईसाठी गतीमान केले.या पथकाने सदरील मालवाहू वाहन बोरगाव (सुधा) ता.भोकर येथील रस्त्यावर थांबविण्याचा प्रयत्न केला.परंतू त्या वाहनात क्रुरतेने निर्दयीपणे गोवंश कोंबुन ठेवलेले असल्याने वाहन चालकाने ते वाहन त्या ठिकाणी थांबविले नाही.तसेच निष्काळजीपणे व हयगयीने ते वाहन भरधाव वेगाने बटाळा मार्गाने तेलंगणा राज्यात जाण्यासाठी पळविले.यावेळी पोलीस आपला पाठलाग करत असल्याचे त्या चालकाच्या लक्षात आल्याने त्याने वाहनाचा वेग वाढविला यात त्याचा वाहनाच्या गती वरील ताबा सुटला. यामुळे गारगोटवाडी ते दिवशी या दरम्यान ते वाहन रस्त्याच्या खाली उतरले.यावेळी त्या चालकाने ते वाहन तेथेच सोडून पलायन केले.
रस्त्याखाली उतरलेल्या वाहनाजवळ जाऊन पोलीस पथकाने पाहनी केली असता पांढऱ्या रंगाच्या एम.एच.४० सी.एम.९०५३ क्रमांकाच्या मालवाहू बोलेरो वाहनात क्रुरतेने व निर्दयीपणे छळ करत कोंबलेल्या ८ गायी व ३ कालवडी असे एकूण २ लाख १६ हजार रुपये किमतीचे ११ गोवंश जनावरे मिळून आले.उपरोक्त किमतीचे गोवंश व ३ लाख रुपये किंमतीचे ते मालवाहू वाहन असा एकूण ५ लाख १६ हजार रुपयाचा मुद्देमाल या पथकाने ताब्यात घेतला.तस्करी मार्गाने कत्तलीसाठी जात असलेले हे गोवंश भोकर पोलीसांच्या सतर्कतेमुळे वाचले व जीवदान मिळालेल्या या गोवंशास भोकर पोलीसांनी सुरक्षितपणे गोशाळेत सोडले. तसेच पो.उप.नि.मोहन राठोड यांनी फिर्याद दिल्यावरुन गु.र.नं.५८/२०२६ कलम ५ (ब), ९ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम व सहकलम ११ (१) (ग) (च) प्राण्यांचा छळ अधिनियम सहकलम १२५,२८१ भारतीय न्याय संहिता प्रमाणे अज्ञात आरोपींविरुद्ध भोकर पोलीसात दि.१२ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.नि.अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास जमादार बालाजी लक्षटवार हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close