भोकर तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ टप्पा क्र.१ ची अंमलबजावणी सुरु
नागरिकांनी याचा लाभ घ्यावा-तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी केले आवाहन!

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : नागरिकांना महसूल,सामाजिक सुरक्षा योजना, मोजणी व इतर शासकीय सेवा अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय, भोकर यांच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ टप्पा क्र.१ हे दि.७ मार्च २०२६ ते दि.८ मे २०२६ या दरम्यान राबविण्यात येणार असून सदरील शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन भोकर चे तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी केले आहे.
दि.७ मार्च २०२६ ते दि.८ मे २०२६ या कालावधीत भोकर तालुक्यातील ५ मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.यातील मंडळ निहाय शिबिराचे आयोजन पुढील प्रमाणे आहे.दि.७ मार्च २०२६ रोजी किनी, दि.१४ मार्च २०२६ रोजी भोसी, दि.१० एप्रिल २०२६ रोजी मोघाळी,दि.१७ एप्रिल २०२६ रोजी मातूळ व दि.८ मे २०२६ रोजी भोकर येथे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात नागरिकांच्या दैनंदिन महसूल विषयक तक्रारी व प्रलंबित कामांचा तत्काळ निपटारा केला जाणार आहे.
या अभियानाअंतर्गत महसूल विभागासोबत ग्रामविकास विभाग,महिला व बालकल्याण विभाग,सामाजिक न्याय विभाग,पशुसंवर्धन विभाग,दुय्यम निबंधक कार्यालय,तसेच पोलीस विभाग यांचा समन्वय साधून बहुविभागीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ‘सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’ व ‘सिंगल विंडो प्रणाली’चा अवलंब करून अर्ज स्वीकृती,पडताळणी व सेवा वितरणाची कार्यवाही करण्यात येणार आहे.
सदरील अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट :-
*लोकाभिमुख प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी
*नागरिकांच्या महसूल विषयक तक्रारींचे तत्काळ निराकरण
*डिजिटल सातबारा, ८-अ उतारे व इतर सेवांचा जलद पुरवठा
*एकाच ठिकाणी विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ
शिबिरातील उपलब्ध सेवा पुढील प्रमाणे…
महसूल दस्तऐवज :-
प्रलंबित फेरफार निकाली काढणे,सातबारा दुरुस्ती, डिजिटल सातबारा व ८-अ उतारा वितरण,ई-मोजणी अर्ज,घरकुल प्रकरणे,अतिक्रमण विषयक कार्यवाही इत्यादी.
प्रमाणपत्र सेवा :-
उत्पन्न,रहिवासी,जात व नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्रे.
शेती व सामाजिक योजना :-
पीएम किसान,संजय गांधी निराधार योजना,सामाजिक अर्थसहाय्य योजना आदींबाबत मार्गदर्शन व लाभ.
इतर विभागीय सेवा :-
*ग्रामविकास विभागामार्फत ग्रामपंचायत विषयक प्रकरणे
*महिला व बालकल्याण विभागाच्या योजना
*सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती व अनुदान योजना
*पशुसंवर्धन विभागाच्या सेवा
*दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत नोंदणी संदर्भातील मार्गदर्शन
*पोलीस विभागाकडून आवश्यक कागदपत्रांबाबत सहाय्य
प्रशासनाची झाली तयारी …
अभियानाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार विनोद गुंडमवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक घेण्यात आली व सदरील बैठकीला ग्रामविकास विभाग,कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग,भूमी अभिलेख विभाग,पाणीपुरवठा, महावितरण,पुरवठा विभाग तसेच पोलीस विभागाचे अधिकारी यांसह आदी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.यावेळी सादर प्रकरणे शिबिराच्या दिवशीच प्राधान्याने निकाली काढण्याच्या सूचना तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी दिल्या असून,प्रलंबित अर्जांची छाननी करून आवश्यक कागदपत्रांसह नागरिकांनी उपस्थित राहावे व या शिबिरांचा लाभ घ्यावा,असे आवाहन ही त्यांनी केले आहे.याचबरोबर हा प्रशासनाचा पारदर्शक व लोकाभिमुख उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे,असे निर्देश ही त्यांनी दिले आहेत.तसेच भोकर तालुक्यातील नागरिकांसाठी या शिबिरांतून ‘एकाच दिवशी,एकाच ठिकाणी’ विविध शासकीय सेवा मिळविण्याची सुवर्णसंधी प्राप्त होणार असल्याने अधिकाधिक लाभ घेतलाच पाहिजे असे बोलल्या जात आहे.



