सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या एकास भोकर जिल्हासत्र न्यायालयाने दिली जन्मठेपेची शिक्षा
शेतीच्या धुऱ्याच्या वादातून झाला हा गंभीर गुन्हा ; पुतण्यास ही केले होते गंभीर जखमी ; १५ हजार रुपये अतिरिक्त दंडाची ही सुनावली शिक्षा

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : शेताचा धुरा फोडल्याचा वाद घालून पोटात विळ्याने प्राणघातक वार करुन सख्ख्या भावाचा खून व पुतण्यास गंभीररित्या जखमी करणाऱ्या बोळसा ता.उमरी येथील एकास दि.९ ऑक्टोबर रोजी भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश मोहम्मद नासिर मोहम्मद सलीम यांनी जन्मठेप व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सदरील गुन्ह्या संदर्भात असे की,धाराजी गंगाराम चिकटवाड व त्यांचा सख्खा भाऊ माधव गंगाराम चिकटवाड,दोघेही रा.बोळसा ता.उमरी,जि.नांदेड या शेतकऱ्यांची धर्माबाद तालुका हद्दीत शेती आहे.या शेतीचा धुरा फोडल्याच्या किरकोळ कारणावरून धाराजी चिकटवाड यांच्या समवेत त्यांचा भाऊ माधव चिकटवाड याने दि.१ ऑगस्ट २०२० रोजी वाद घातला व या वादात धाराजी चिकटवाड यांच्या जवळ असलेला विळा माधव चिकटवाड याने घेतला आणि सख्ख्या भावाच्या पोटात गंभीर वार केले.तसेच हे भांडण सोडविण्यासाठी गेलेला पुतण्या दिपक धाराजी चिकटवाड यांच्या डोक्यात दगडाने मारुन त्यांसही गंभीर जखमी केले.यावेळी गंभीर जखमी झालेल्या धाराजी चिकटवाड यांचा यात मृत्यू झाला. याप्रकरणी गंभीर जखमी झालेला पुतण्या दिपक चिकटवाड यांनी धर्माबाद जि.नांदेड पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दिली.यावरुन माधव चिकटवाड विरुद्ध गुरनं.१५५/ २०२० कलम ३०२ व ३०७ भा.द.वि.प्रमाणे खून केल्याचा व खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला.
धर्माबाद पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी सदरील गुन्ह्याचा तपास पुर्ण करून भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.दरम्यानच्या काळात न्यायालयाने १० साक्षिदार तपासले.तर अतिरीक्त सरकारी अभियोक्ता ॲड.सौ. अनुराधा डावकरे (रेडडी) व आरोपीचे वकील यांच्यात झालेल्या युक्तीवादाअंती जखमी फिर्यादी दिपक चिकटवाड यांची साक्ष व वैद्यकीय अहवालाचा पुरावा महत्वाचा असल्याने तो सबळ पुरावा ठरला.यावरुन माधव चिकटवाड हा दोषी व शिक्षेस पात्र ठरल्याने ॲड.सौ.अनुराधा डावखरे (रेड्डी) यांनी त्यास कठोर शिक्षा देण्याची विनंती मा. न्यायालयास केली.यावरुन भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश मोहम्मद नासिर मोहम्मद सलीम यांनी सरकार पक्षाच्या वतीने प्रस्तुत केलेला पुरावा, जखमी फिर्यादीची साक्ष व वैद्यकीय पुरावा गाह्य धरून आरोपी माधव चिकटवाड यास कलम ३०२ अंतर्गत अजन्म कारावास अर्थातच जन्मठेप,तसेच १००००/- रूपये दंड याच बरोबर कलम ३०७ अंतर्गत ३ वर्ष सश्रम कारावास व ५०००/- रूपये दंडाची शिक्षा दि.९ ऑक्टोबर २०२५ रोजी सुनावली आहे.न्यायालयीन सुनावणी दरम्यानच्या काळात तत्कालीन पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांनी,तर आताच्या काळात नांदेड चे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार व भोकर च्या अप्पर पोलीस अधीक्षक सौ.अर्चना पाटील यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य करणारे पैरवी अधिकारी जमादार फिरोजखान पठाण आणि पो.ना.श्रीनीवास दत्ता नाईनवाड यांना मार्गदर्शन केले.



