भोकर पोलीसांनी १ पिस्टल व ५ जीवंत काडतुसासह एका तरुणास पकडले
पुढील तपासासाठी भोकर न्यायालयाने 'त्या' तरुणास दिली ५ दिवसांची पोलीस कोठडी

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : रात्रपाळी गस्तीच्या कर्तव्यावर असलेल्या भोकर पोलीसांच्या पथकास गोपनीय माहिती मिळाल्यावरुन त्या पथकाने १ पिस्टल व ५ जीवंत काडतुसासह मौ. शिनगारवाडी ता.भोकर येथील एका तरुणास पकडले असून त्यास भोकर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने पुढील तपासासाठी त्या तरुणास ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
भोकर पोलीस ठाण्यात सेवारत असलेले पो.उप.नि.राम कराड,जमादार संजीव जिंकलवाड,पो.कॉ.जी.एन.आरेवार, पो.कॉ.गिरी,पो.कॉ.माळकोटे यांचे पथक अवैध धंदयाची माहिती काढून गुन्हे दाखल करणे व माली गुन्हयातील आरोपीचा शोधकामी भोकर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात रात्रपाळी गस्तीच्या कर्तव्यावर दि.२ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री गेले असतांना रात्री ८:२० वाजताच्या दरम्यान ते भोकर-बटाळा रस्त्यावर असतांना त्यांना एका गुप्त माहितीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की,भोकर-हिमायतनगर रस्त्यावरील मौ.शिनगारवाडी ता.भोकर परिसरातील महादेव पेट्रोल पंपाजवळ एक तरुण १ पिस्टल व कारतुस घेऊन फिरत आहे.
त्या पोलीस पथकाने ही माहिती पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांना दिली व दोन पंच सोबत घेऊन महादेव पेट्रोल पंप परिसरात गेले आसता तेथे एक तरुण संशयितरित्या फिरत असतांना आढळून आला.त्यास पकडून अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला १ गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व ५ जीवंत काडतुस मिळून आले.त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचे नाव देवदत्त कडाजी तुतुरवाड (वय २० वर्षे)रा. शिनगारवाडी ता.भोकर येथील असल्याचे आणि ती पिस्टल विनापरवाना तो वापरत असल्याचे त्याने सांगितले.सदरील घटनेचा पंचासमक्ष रितसर पंचनामा करण्यात आला व त्या तरुणाजवळील ५० हजार रूपये किमतीची ती गावठी पिस्टल व ५ हजार रुपये किंमतीचे ते ५ जीवंत कारतुस असे एकूण ५५ हजार रुपये किंमतीचे घातक शस्त्र जप्त करण्यात आले.
उपरोक्त आशयानुसार जमादार संजीव जिंकलवाड यांनी भोकर पोलीसात रितसर तक्रार दिली.यावरुन देवदत्त कडाजी तुतुरवाड याच्या विरुद्ध गुरनं ४४२/२०२५ कलम ३/२५,७/२५ भारतीय शस्त्र अधिनियमानुसार भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.तसेच दि.३ सप्टेंबर २०२५ रोजी त्यास भोकर न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश आर.एस.इरले यांनी पुढील तपासासाठी त्यास ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.सदरील तरुणाने ती पिस्टल मध्यप्रदेशातील एका व्यक्तीकडून घेतली असल्याचे सांगण्यात येत असून पो.नि.अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पो.उप.नि.राम कराड हे करत आहेत.



