अनुसूचित जमाती आरक्षणाच्या न्यायीक मागणीसाठी बंजारा समाजाचा ‘भुतो न भविष्यती’ असा महा एल्गार मोर्चा होणार-डॉ.यु.एल.जाधव
नांदेड येथील उद्याच्या एल्गार मोर्चाच्या सेवेसाठी किनवटच्या बंजारा स्वयंसेवाकांचा जथ्था पायी रवाना

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : हैद्राबाद गॅझेटियर च्या नोंदीनुसार बंजारा समाज देखील अनुसूचित जमाती(एस.टी.) प्रवर्गात असल्याने राज्य शासनाने बंजारा समाजास या आरक्षण प्रवर्गात समाविष्ट करावे,या मागणीसाठी नांदेड जिल्हा बंजारा समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने नांदेड येथे दि. २९ सप्टेंबर रोजी ‘बंजारा महा एल्गार मोर्चाचे’ आयोजन करण्यात आले असून सदरील मोर्चात लाखो समाज बांधव सहभागी होणार असल्याने हा मोर्चा ‘भुतो न भविष्यती’ असा ऐतिहासिक होणार आहे,असा विश्वास भोकर येथील संत सेवालाल महाराज नंगारा भवन स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ.यु.एल.जाधव यांनी व्यक्त केला आहे. भोकर येथे दि.२८ सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या आढावा बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीनुसार बंजारा समाजास अनुसूचित जमाती आरक्षण (एस.टी.) प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे,या मागणीसाठी संबंध महाराष्ट्र राज्यात भव्य मोर्चे व विविध आंदोलने केली जात आहेत.याच मागणीसाठी नांदेड जिल्हा बंजारा समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने नांदेड येथे दि.२९ सप्टेंबर २०२५ रोजी ‘बंजारा महा एल्गार मोर्चाचे’ आयोजन करण्यात आले आहे.सदरील मोर्चाच्या पुर्वतयारीसाठी भोकर तालुका बंजारा समाज आरक्षण कृती समितीच्या माध्यमातून समितीचे अध्यक्ष रमेश राठोड,सचिव सखाराम राठोड, तसेच वरिष्ठ सल्लागार डॉ.यु.एल.जाधव,डॉ.राम नाईक, उद्योजक बंटी भाऊ राठोड,बालाजी जाधव,दिलीप जाधव, विशाल जाधव,मनोजकुमार राठोड,धोंडू राठोड,किशोर जाधव,प्रफुल राठोड,ज्ञानेश्वर राठोड यांसह आदी समाज बांधव व भगीनी गेल्या १५ दिवसांपासून तालुक्यातील वाडी तांड्यावर अथक परिश्रमातून जनजागृती करत आहेत.
याच अनुषंगाने डॉ.राम नाईक यांच्या विमल इंग्लिश स्कूल भोकर येथे भोकर तालुका बंजारा समाज आरक्षण कृती समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपुर्ण आढावा बैठक दि.२८ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्यात आली.यावेळी मोर्चात शिस्तबद्धपणे कसे सहभागी होता येईल यासाठीचे नियोजनपर मार्गदर्शन डॉ.राम नाईक,रमेश राठोड,बंटी भाऊ राठोड यांसह आदींनी केले.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना डॉ.यु.एल.जाधव पुढे म्हणाले की,समाजाच्या न्याय हक्कासाठी हा महत्त्वपुर्ण लढा असून या लढ्या दरम्यान कसलाही अनुचित प्रकार होऊ नये व अन्य कोणत्याही समाजाच्या भावना दुखतील असे वर्तन मोर्चेकऱ्यांनी करु नये.तसेच मोर्चातील सहभागी वयोवृद्धांची तरुण स्वयंसेवकांनी काळजी घ्यावी व मोर्चा यशस्वी करावा,असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
नांदेड येथील उद्याच्या एल्गार मोर्चाच्या सेवेसाठी किनवटच्या बंजारा स्वयंसेवाकांचा जथ्था पायी रवाना..
होऊ घातलेल्या बंजारा एल्गार मोर्चातील सहभागींच्या सेवेसाठी समाजसेवक बंटी आडे यांच्या नेतृत्वाखाली किनवट येथून नांदेडकडे पायी निघालेल्या शंभराहून अधिक बंजारा तरुण स्वयंसेवकांचा जथ्था भोकर येथे आला असता भोकर तालुका बंजारा समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने या जथ्थ्याचे यथोचित स्वागत करण्यात आले.तसेच या सर्वांच्या उपस्थित भारत मातेचे थोर सुपूत्र शहीद भगतसिंग यांच्या जयंतीच्या औचित्याने अभिवादन सभा घेण्यात आली व स्नेह भोजनानंतर डॉ.यु.एल.जाधव, डॉ.राम नाईक,रमेश राठोड,बंटी भाऊ राठोड, मनोजकुमार राठोड, विशाल जाधव,सखाराम राठोड यांसह आदींनी या जथ्थ्याची नांदेडला रवानगी केली.



