मतमोजणी नंतर विजयी उमेदवारांसह सर्वांनी कायदा, शांतता व सुव्यवस्थेसाठी सहकार्य करावे-डी.एस.हाके
भोकर पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे आवाहन !

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : होऊ घातलेल्या भोकर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता पार पडलेल्या मतदान प्रक्रिये दरम्यान सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करुन कायदा,शांतता व सुव्यवस्थेसाठी सहकार्य केल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही आणि लोकशाहीने दिलेला मतदानाचा संविधानिक अधिकार निर्भयपणे बजावता आला आहे. आता दि.२० डिसेंबर रोजी प्रभाग क्र.१(ब) करिता मतदान होणार असून दि.२१ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांसाठी मतमोजणी होणार आहे.यावेळी विजयी होणाऱ्या उमेदवारांसह सर्वांनी कायदा,शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलीसांना सहकार्य करुन लोकशाहीचा आनंदोत्सवात विना मिरवणूकीने साजरा करावा,असे आवाहन भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी डी.एस. हाके यांनी केले आहे.ते भोकर पोलीसांच्या वतीने आयोजित बैठकीत मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
भोकर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची मतमोजणी दि.२१ डिसेंबर २०२५ रोजी होत आहे.या अनुषंगाने विजयी उमेदवारांनी व त्यांच्या समर्थकांनी आदर्श आचार संहितेचे पालन करुन कायदा,शांतता व सुव्यवस्थेसाठी सहकार्य करण्यास्तव काही सुचना देण्यासाठी दि.१७ डिसेंबर २०२५ रोजी नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि विविध पक्ष,अपक्ष कार्यकर्त्यांची भोकर पोलीसांच्या वतीने एक बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी आपल्या प्रास्ताविकातून बैठकीची पार्श्वभूमी सविस्तरपणे विषद केली.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना उपविभागीय पोलीस अधिकारी डी.एस. हाके हे पुढे म्हणाले की,मतदान व मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी कायदा,शांतता, सुव्यवस्था ही अबाधित राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर अतिशय काळजीपूर्वक करावा.आचारसंहितेचे पालन व्हावे व कोणत्याही पराजित उमेदवारांच्या किंवा पक्ष अपक्षांच्या भावना दुखतील अशा पोस्ट करु नयेत.तसेच विजयी मिरवणूकीसाठी परवानगी देता येत नसल्याने मिरवणूक काढू नये व कोणाच्या ही भावना दुखतील असे नारे मारु नयेत आणि वक्तव्य ही करु नये.अफवांतून गैरसमज होतात व गैरप्रकार घडतात त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नये आणि अफवा पसरवू नयेत.तसेच प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या सुरक्षात्मक उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली व दरम्यानच्या काळात सर्वांकडून सहकार्य मिळेलच अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी भाजपा,शिवसेना,राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, एम.आय.एम यांसह अन्य पक्ष अपक्षाचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदांचे बहुसंख्य उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते.तर ही बैठक यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक अजित कुंभार,गोपनीय शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर गाडेकर यांसह आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.तसेच उपस्थितांनी देखील कायदा,शांतता व सुव्यवस्था राखण्याची हमी दिली.



