आपलं नांदेडनांदेड जिल्हाबिझनेसभोकरमराठवाडाराजकिय

भोकर एमआयडीसीमध्ये उद्योग सुरू करून स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा!

महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना संचालक इंजि.विश्वंभर पवार यांनी दिले मागणीपत्र

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरात नवीन उद्योग सुरू करून स्थानिक युवकांना रोजगाराच्या मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करून द्याव्यात,अशी मागणी स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर चे संचालक तथा शिवसैनिक इंजि.विश्वंभर पवार यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नुकताच नांदेड येथे दौरा केला होता.यादरम्यान स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर चे संचालक,जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य व मराठवाडा जनता विकास परिषदेचे नांदेड जिल्हाध्यक्ष तथा शिवसैनिक इंजि.विश्वंभर पवार यांनी शिवसैनिकांच्या एका शिष्टमंडळासह त्यांची भेट घेतली आणि औद्योगिक विकास महामंडळ भोकर येथे लघु व मध्यम उद्योग तात्काळ उभारावेत यासह काही विशेष मागण्यांचे निवेदन त्यांना दिले.त्यात भोकर येथील औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात तातडीने नवीन उद्योग सुरू करण्यासाठी विशेष धोरण राबविणे,गुंतवणूकदारांना आकर्षित करणे,उद्योगांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे,तसेच स्थानिक युवकांना रोजगारामध्ये प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच त्यात इंजि.विश्वंभर पवार यांनी नमुद केले आहे की, भोकर तालुका हा कृषिप्रधान असून येथे कापूस, हळद, सोयाबीन,तूर,हरभरा यांसह आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.या उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ मिळेल आणि हजारो युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार ही उपलब्ध होईल.त्यासाठी औद्योगिक विकास महामंडळ भोकर च्या क्षेत्रातील रिक्त भूखंडांचे सर्वेक्षण व्हावे,उद्योगासाठी गुंतवणूकदार मिळावेत,एमएसएमई उद्योगांना प्रोत्साहन मिळावे,कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र तसेच उद्योगांसाठी आवश्यक वीज,पाणी,रस्ते आणि इतर सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी देखील त्यात करण्यात आली आहे.

“औद्योगिक विकास महामंडळ भोकर चा विकास हा केवळ औद्योगिक विकास नसून तो हजारो युवकांच्या भविष्याचा आणि संपूर्ण तालुक्याच्या आर्थिक प्रगतीचा प्रश्न आहे. त्यामुळे शासनाने या विषयावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा,” असे विनंतीपर आवाहन ही इंजि.विश्वंभर पवार यांनी या मागणीपत्राद्वारे केली आहे.

औद्योगिक विकास महामंडळ भोकर च्या क्षेत्रात अनेक भूखंड उपलब्ध असूनही अपेक्षित असा कोणताही औद्योगिक विकास झालेला नाही.त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगारासाठी इतर शहरांकडे स्थलांतर करावे लागत आहे.या पार्श्वभूमीवर उद्योगांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून नवीन उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे ही इंजि.पवार यांनी त्यात नमूद केले असून लघु व मध्यम उद्योगांना प्राधान्य देऊन गुंतवणूक वाढवावी, स्थानिक युवकांना कौशल्याधारित रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि औद्योगिक विकासाला गती द्यावी, असे ही म्हटले आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत यांना अशा प्रकारे सविस्तर असे मागणीपत्र सादर करण्यात आले असून या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास भोकर तालुक्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close