आपलं नांदेडक्राइमनांदेड जिल्हाभोकरमराठवाडाराजकिय

उबाठा शिवसेनेने भोकर मध्ये काढली बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

संतप्त शिवसैनिकांनी फोटोंना जोडे मारुन व्यक्त केला तीव्र जाहीर निषेध!

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : ऑपरेशन टायगर च्या आडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या काही खासदारांनी बंडखोरी करत पक्षांतर केल्याची निषेधार्य बाब समोर आली असल्याने राज्यातील उबाठा शिवसैनिकांत असंतोषाची लाठ पसरली असून भोकर मध्ये २० जून रोजी संतप्त शिवसैनिकांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या खासदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे.असे असतांना त्या बंडखोर खासदारांना ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्यात आली आहे.यामुळे उबाठा शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक अधिकच आक्रमक झालेले पहावयास मिळत आहेत.याच अनुषंगाने त्या बंडखोर खासदारांच्या मतदार संघासह राज्यात विविध ठिकाणी खासदारांचे पुतळे जाळणे,पिंडदान करणे, पोस्टरला जोडे मारणे,प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून श्राद्ध घालणे यासारखी तीव्र निषेध आंदोलने केली जात आहेत. https://youtu.be/rAcPfEhDoXs?si=zzxeNTj3Jq8aoMR4

याचाच एक भाग म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुका भोकर च्या वतीने दि.२० जून २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजताच्या दरम्यान हिंगोली लोकसभा मतदार संघाचे विद्यमान बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची किनवट रोड ने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक भोकर पर्यंत सहवाद्य प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेतील प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन संतप्त शिवसैनिकांनी अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला.तसेच खा.नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह ‘त्या’ अन्य खासदारांचे फोटो असलेल्या पोस्टर ला जोडे मारुन तीव्र निषेध व्यक्त केला.यावेळी तेथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या भोकर पोलीस ठाण्याचे पो.नि.विश्वंभर पल्लेवाड,सहा.पो.नि.शैलेंद्र औटे व पोलीसांनी तो पुतळा शिवसैनिकांकडून ताब्यात घेतला आणि प्रतिकात्मक अंत्यसंस्कार करु दिले नाही.
विशेष म्हणजे या आंदोलन समयी संतप्त शिवसैनिकांनी त्या बंडखोर खासदारांच्या नावानं बोंबाबोंब केली, निषेधार्थ नारेबाजी केली.तर शिवसेना उप-जिल्हा संघटक सुभाष नाईक किनीकर व माजी जि.प.सदस्य सुनील चव्हाण यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हटले की,आज आम्ही या बंडखोर खासदारांचे अंत्यसंस्कार केले आहे.त्यामुळे ते आमच्यासाठी मृत झालेले आहेत.म्हणून आता त्यांनी स्वर्गात तरी सुखी रहावे व तिकडे तरी गद्दारी करू नये. तसेच यापुढे उबाठा शिवसेनेशी जे गद्दारी करतील त्यांच्यासोबत आम्ही बडवा व तुडवाचे चे आंदोलन करु.सदरील आंदोलनात सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी उबाठा शिवसेनेचे भोकर शहरप्रमुख पांडुरंग वर्षेवार,दिव्यांग सेना तालुका प्रमुख विठ्ठलराव देवड,तालुका संघटक नंदकुमार कौठेकर,शहर संघटक राहुल कोंडलवार,उप तालुका प्रमुख मारोती पवार, साहेबराव भोंबे,चेअरमन गंगाधर महादवाड,रमेश महागावकर, माजी उपतालुकाप्रमुख वामण पर्वत,वसंत लगा जाधव, सर्जेराव शिंदे,गोविंद पाटील सानमवाड, सायारेड्डी प्रेमयगार,श्रीनीवास वरटी,तानाजी जाधव, नागभुषन गायकवाड,अविनाश गमेवाड,अजय चव्हाण, कैलास कदम,दत्तु पाटील यांसह आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close