Sun. May 12th, 2024

‘नाहीस तू खेळणी,तू तर या विश्वाची जननी!’- कवयित्री सीता कुदळे

Spread the love

अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात रंगले सावित्रीच्या लेकींचे कवी संमेलन..!

अंबुज प्रहार प्रतिनिधी,अहमदपूर
‘साऊ तुझ्या पाऊलांचीच नित्य करीत असे पूजा…स्त्रीशक्तीचे ज्ञानपीठ नाही कुणी अन्य दुजा…!’
‘नाहीस तू खेळणी…तू तर या विश्वाची जननी..!’
या कवयित्री सीता कुदळे यांच्या कवितेसह अनेक दर्जेदार व रसिकांना खिळवून ठेवणा-या महिलांच्या कवितांनी कविसंमेलन रंगले.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक,समीक्षक तथा महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांच्या संकल्पनेतून मकरसंक्रांतीच्या निमित्ताने येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने महाविद्यालय सभागृहात सावित्रीच्या लेकींचे भव्य महिला कवी संमेलन चांगलेच रंगले..!
याबाबत अधिक माहिती अशी की येथील महात्मा फुले महाविद्यालयात मकरसंक्रांतीच्या निमित्ताने महिलांचे खास कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील,उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी यांची उपस्थित होती.तर कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान महात्मा फुले महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ.सीमा उप्पलवार यांनी भूषविले. या कवी संमेलनासाठी खास नांदेडहून ज्येष्ठ कवयित्री छायाताई बेले,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिलका येथील मुख्याध्यापक सीता कुदळे,संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मीना तोवर,यशवंत विद्यालयाच्या सहशिक्षिका तथा ज्येष्ठ कवयित्री वर्षा लगडे,अहमदपूर येथील गट साधन केंद्राच्या कामाक्षी पवार,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थिनी वनिता नरवटे,प्रतीक्षा राठोड, रवींद्रनाथ टागोर विद्यालयाची नवोदित कवयित्री ऐश्वर्या बारोळे, जिल्हा परिषद शाळा रुई (द.)विद्यार्थिनी समृद्धी मुंगरे,वैष्णवी देवकते,तंजीला शेख,चंद्रभागा बैनवाड,विमलाबाई देशमुख शाळेची विद्यार्थिनी कवियत्री आरुषी बोईनवाड तसेच महात्मा फुले महाविद्यालयातील राज्यशास्त्राच्या प्रा.प्रतीक्षा मंडोळे, विद्यार्थिनी वैष्णवी मुंढे,सत्यशीला स्वामी यांच्यासह इतर मुलींनीही या कवी संमेलनात सहभाग घेऊन कवी संमेलनाची रंगत वाढविली.
या कवी संमेलनाची सुरुवात वर्षा लगडे यांच्या ‘सावित्रीमाई आमच्यासाठी वेळ जरा काढा’ या कवितेने झाली.त्यानंतर मीना तोवर यांनी मराठवाड्यातील दुष्काळाचे जिवंत चित्र आपल्या कवितेतून उभे केले.तर कामाक्षी यांनी कवि मन काय असतं ? ते आपल्या कवितेतून विशद केले.

“कसं सांगू तुला गाव माझा कसा होता” या कवितेतून वनिता नरवटे यांनी सद्यस्थितीतील बदलत्या ग्रामवास्तवाचे उत्कट दर्शन घडविले.तर प्रतीक्षा राठोड यांनी ‘एक नातं: बाप आणि लेकीचं’ या कवितेतून बाप आणि मुलीच्या नात्याची सुंदर गुंफण सादर केली.वैष्णवी मुंडे या विद्यार्थिनीने ‘एक जीबी माणुसकी‘ ही सद्यस्थितीतील मोबाईल वरील कविता सादर केली.तर ऐश्वर्या बारोळे या विद्यार्थिनीने ग्रामीण भागातील मुलींची होणारी परवड आपल्या ‘मुलगी’ या कवितेतून दाखवून दिली.
कवी संमेलनात सहभागी सर्वात कमी वयाची कवयित्री म्हणून आरुषी सूर्यकांत बोईनवाड या विद्यार्थिनीने ‘माय आणि लेकीची माया’ कशी असते ते आपल्या कवितेतून दाखवून दिले.नांदेड येथील ज्येष्ठ कवयित्री छायाताई बेले यांनी आपल्या कवितांतून समकालीन समाज व्यवस्थेतील स्त्रियांचे स्थान अधोरेखित करणाऱ्या दोन गंभीर कविता सादर करून रसिकांना स्त्रियांच्या प्रश्नाविषयी चिंतन करावयास भाग पाडले. तर सीता कुदळे यांनी ‘नाहीस तू खेळणी तू,तर या विश्वाची स्वामिनी’ ही कविता सादर करून संमेलनाला उंची प्राप्त करून दिली.सावित्रीबाईंच्या कर्तृत्वाची नोंद घेत…
“साऊ तुझ्या पावलांची करीत असे नित्य पूजा,          स्त्रिशक्तीचे ज्ञानपीठ अन्य नाही कुणी दूजा,            क्रांतीज्योती ज्योतिबाच्या तूच लेखणीची शाई.                साऊ तुझ्या कर्तृत्वाचे गीत सारे विश्व गाई “

या कवितेने कवी संमेलनाची सांगता झाली.
या कविसंमेलनाचे प्रास्ताविक डॉ.मारोती कसाब यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.कल्पना कदम यांनी केले,तर उपस्थितांचे आभार ह.भ.प.डाॅ.अनिल मुंढे यांनी मानले.यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,कर्मचारी,विद्यार्थी,तसेच शहरातील काव्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !