Tue. May 21st, 2024

भोकर येथील बैल बाजाराचा २१ मार्च रोजी उत्साहात झाला शुभारंभ…

Spread the love

भोकरच्या बैल बाजारात खरेदी -विक्रीचे दाखले,पाणी यांसह आदी सोयी सुविधा व साधने उपलब्ध करुन देऊ-प्र.मु.मारोती जगताप

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर येथे बैल बाजार सुरु व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची मागणी होती.सदरील मागणीस दि.२१ मार्च रोजी मुहूर्त लाभला असून मोठ्या उत्साहात शुभारंभ झालेल्या पहिल्याच दिनी बाजारात आपले गोवंशधन विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी खरेदी-विक्री चे दाखले,पाणी व आदी सोयी,सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.याविषयी भोकर नगर परिषदेचे प्र. मुख्याधिकारी मारोती जगताप यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की,पुढील बाजार दिनी भोकर नगर परिषदेच्या वतीने खरेदी-विक्रीचे दाखले देण्याची व पाणी यांसह आदी सुविधा उपलब्ध करुन देऊ.तरी  पुढील बाजार दिनी अधिकाधिक शेतकरी व व्यापाऱ्यांनी आपापले गोवंशधन बाजारात घेऊन यावेत,असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
भोकर तालुका व शहर हे तेलंगणा राज्य सिमेवरील मोठ्या व्यापार पेठेचे ठिकाण आहे.परंतू बैल(गुरांचा) बाजार भरत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून येथे बाजार भरावा अशी मागणी शेतकऱ्यांसह अनेकांतून होत होती.यामुळे नगर परिषदेच्या माध्यमातून येथील ऐतिहासिक महादेव मंदींराच्या प्रांगणात गुरांचा बाजार भरविण्याचा प्रयत्न केला गेला.परंतू केवळ एकच दिवस बाजार भरला व त्यांनतर भरलाच नसल्याने तो प्रयत्न अयशस्वी ठरला.यामुळे तालुक्यातील शेतकरी व व्यापारी यांना आपले गोवंशधन विक्रीसाठी दुसऱ्या तालुक्याच्या बाजारपेठेत न्यावे लागत होती.त्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांना आर्थिक भुरदंडासह नाहक त्रास सहन करावा लागत होता.याअनुषंगाने पुनश्च भोकर येथे गुरांचा बाजार भरविण्यात यावा अशी मागणी सातत्याने होत होती.याची दखल घेऊन यावर्षी संपन्न झालेल्या महाशिवरात्रीच्या यात्रे दरम्यान यात्रा समितीचे अध्यक्ष नागनाथ घिसेवाड,माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील,सभापती जगदीश पाटील भोसीकर यांसह आदींनी भोकर उपविभागीय अधिकारी तथा नगर परिषदेचे प्रशासक प्रविण मेंगशेट्टी,तहसिलदार सुरेश घोळवे यांच्या उपस्थितीत तेथे गुरांचा बाजार लवकरच भरविला जाईल अशी घोषणा केली.

महाशिवरात्री यात्रेत घोषणा केल्या प्रमाणे ऐतिहासिक महादेव मंदींराच्या प्रांगणात गुरांचा बाजार भरविण्यासाठी अखेर दि.२१ मार्च २०२४ रोजी मुहूर्त लाभला व बाजारास शुभारंभ झाला.या शुभारंभदिनी पशूपालक,शेतकरी व व्यापाऱ्यांनी जवळपास ८८ गोवंशधन खरेदी -विक्रीसाठी आणले होते.यात दोन गाय,८ गोरे,७८ बैलांच्या समावेश आहे.७८ बैल अर्थातच ३९ बैलजोडी विक्रीसाठी आली होती.गुलाल उधळून बाजाराचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला.यावेळी ९० हजार रुपये ते १ लाख २० हजार रुपये किमतीच्या ४ बैलजोडीची खरेदी विक्री यावेळी झाली.बाजाराच्या पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला,परंतू यावेळी त्या बैलांच्या खरेदी -विक्रीचे दाखले भोकर नगर परिषदेकडून देण्यात आली नाहीत.तसेच गुरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले नाही. याबाबद बाजारात आलेल्या पशूधन पालक,शेतकरी व व्यापाऱ्यांनी खंत व्यक्त केली.
सदरील सोयी,सुविधा व साधनांच्या अभावा विषयी नायब तहसिलदार तथा भोकर नगर परिषदेचे प्र.मुख्याधिकारी मारोती जगताप यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की,बाजारात विक्रीसाठी आलेल्विया व विक्री झालेल्या बैलजोडी ची आम्ही नोंद घेतली असून दाखले पुस्तक नगर परिषदेकडे उपलब्ध नव्हते.त्याची छपाई लवकरच करण्यात येणार असून येत्या बाजारदिनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांसह ते बाजारस्थानी उपलब्ध करून देण्यात येईल.महादेव मंदिर परिसरात एक मोठा हौद व पाण्याची टाकी उपलब्ध आहे. विद्युत विंधन विहिरींची मोटार नादुरुस्त झाली आहे.ती दुरुस्त करून पाणी देखील उपलब्ध करून देऊ.तसेच यापुढे गरजेप्रमाणे अजून एक हौद बांधून मुबलक पाणी पुरवठा आम्ही करणार आहेत.याच बरोबर सदरील बाजारा संबंधीत सर्व सोयी,सुविधा व साधने उपलब्ध करून देण्यासाठी भोकर नगर परिषद प्रयत्नशील राहणार आहे.असे आश्वस्त ही त्यांनी केले असून पशूपालक,शेतकरी,व्यापारी यांनी आपापले अधिकाधिक गोवंशधन खरेदी-विक्रीसाठी भोकर च्या गुरांच्या बाजारात घेऊन यावेत,असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले आहे.तर भोकर च्या बाजारपेठ वैभवात ही अजून एक भर पडल्याने पशूपालक, शेतकरी व व्यापाऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !