Fri. May 17th, 2024
Spread the love

रशियात गेलेल्या नेत्यांनों परत येण्यापूर्वी ‘अण्णा भाऊ साठेंच्या’ त्या पुतळ्यासमोर शपथ घ्या की…त्यांच्या जन्मभूमीत,कर्मभूमीत भव्य पुतळे व स्मारक उभारु आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित ही करु…!!

संपादकीय…

१४ सप्टेंबर हा रशियासाठी व भारतासाठी एक महत्वपुर्ण ऐतिहासिक दिवस आहे.१४ सप्टेंबर १९१७ रोजी रशियाने स्वतःला प्रजासत्ताक देश म्हणून घोषित केले होते.अशा ऐतिहासिक दिनी मास्कोत महान साहित्यिक विश्व साहित्य भुषण भारताचे…’मॅक्झिम गॉर्की अण्णा भाऊ साठे’ यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे व तैलचित्राचे लोकार्पण होत आहे.त्या अनुशंगाने रशियन सरकार व जनतेचे आणि भारतातून रशियात गेलेल्या सर्वांचे अगदी मनापासून अभिनंदन आणि आभार ही…
🌹🙏🌹
“जनता अमर आहे,तिचा विजय निश्चित आहे,हे सारे विश्व तिच्या हातावर तरले आहे,ती जनता माझ्या कथेला लागणारी सारी सामुग्री पुरवते.परंतु त्या सामुग्रीचा वापर आपल्यां लेखणीने आपल्या जनतेचा उपमर्द होऊ नये याची मी फार काळजी घेतो. कल्पनेच्या भराऱ्या मला मारता येत नाहीत.त्याबाबतीत मी तळ्यातला बेडूक आहे.मी जे जगलो,जे अनुभवलं, तेच मी लिहितो.- अण्णा भाऊ साठे”

जे जगलं,जे अनुभवलं,कटू प्रसंगांना सामोरे जावे लागलं, तेच वास्तव लिखान महान रशियन साहित्यिक अलेक्से‌ई मॅक्झिमोविच पेश्कोव्ह उर्फ ‘मॅक्झिम गॉर्की’ यांनी केलं. त्याच प्रकारे लिखान करणारे दुसरे भारतीय लेखक, साहित्यिक म्हणजेच तुकाराम भाऊराव साठे उर्फ ‘अण्णा भाऊ साठे’ हे होत.गॉर्की या शब्दाचा अर्थ ‘कटू’ असा आहे.आणि कटू प्रसंगांना सामोरे जाणारे हे दोन्ही महान साहित्यिक असल्याने या दोघांनाही ‘गॉर्की’ हे टोपण नाव लागू पडते.ज्येष्ठ साहित्यक बाबुराव बागूल यांनी अण्णा भाऊ साठेंची तुलना सुप्रसिद्ध रशियन साहित्यिक मॅक्झिम गॉर्की यांच्याशी करतांना ‘महाराष्ट्राचा मॅक्झिम गॉर्की’ असं म्हटलं आहे.परंतू आज घडीला अण्णा भाऊ साठे व त्यांचे साहित्य महाराष्ट्रा पुरते मर्यादित राहिले नसून जागतिक पातळीवरचे ठरले आहे आणि त्यांची ओळख महाराष्ट्रीयन साहित्यिक म्हणून नव्हे तर भारतीय साहित्यिक म्हणून झाली आहे.त्यामुळे आता त्यांना ‘भारताचे मॅक्झिम गॉर्की’ म्हणून संबोधलं पाहिजे. रशियातील मास्को शहरात या भारताच्या गॉर्की चा अर्धाकृती पुतळा उभारुन आज जागतिक पातळीवर सन्मान केला जात आहे ही बाब भारतासाठी व महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे.त्यामुळे अण्णा भाऊ साठे यांचा विचार अनुयायी म्हणून मला खुप आनंद होतोय…

विश्वव्यापी कामगार नेते,विश्वभुषणीय साहित्यिक, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा सन्मान रशिया आजच करत आहे असे नाही,तर त्यांच्या हयातीत ही एवढाच सन्मान केलेला आहे व यापुढे करतच राहिल.थोर रशियन चित्रपट निर्माते मॅगव्हेन्से म्हणाले होते,”ज्या देशात जवाहरलाल नेहरू,लाल बहादुर शास्त्री,अण्णाभाऊ साठे व राज कपूर सारखी देवमाणसं जन्मली आहेत तो देश गरीब कसा होऊ शकतो ? एकट्या राज कपूरच्या बदल्यात रशियातील सर्व वैभव आम्ही भारताला देण्यासाठी तयार आहोत.आणि हे सारे देव माणसं जर मिळाली तर आमच्याकडे देण्यासाठी काहीच राहिलं नाही तरी चालेल!” थोर रशियन चित्रपट निर्माते मॅगव्हेन्से यांनी यातून खुप महत्वाचा संदेश दिला आहे. परंतू अजूनही आमच्या भारतीय सत्ताधिशांना अण्णा भाऊ साठे पुर्णत: समजलेच नाहीत असे वाटते.म्हणूनच हे सत्ताधिश ‘अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर ही भारतरत्न पुरस्कार ‘ देण्यास तयार नाहीत ? तर महाराष्ट्रातील सत्ताधीश हे त्यांच्या जन्मभूमीत व कर्मभूमीत भव्य पुतळा आणि स्मारके उभारु शकले नाहीत.

क्रांतिकारी “स्टॅलिनग्राडचा पोवाडा ” कामगार नेते अण्णा भाऊ साठे यांच्या हातून जन्माला आला.मोठमोठे नेते जे एका तासाच्या भाषणात सांगत तेच कॉ.अण्णा भाऊ साठे एका पोवाड्यात सांगत.शब्द सुरांच्या त्या मजबूत साखळीचा खळाळता आवाज कामगार वर्गाला झपाटून टाकत असे.अण्णा भाऊ साठेंच्या उडत्या चालीच्या खणखणीत गीतांनी कामगारांना वेड लावले होते.तो आवाज पार रशिया पर्यंत केंव्हाच जाऊन पोहचला होता.तर साहित्य विश्वात अण्णा भाऊ साठेंनी हिमालया पेक्षा ही उंचावर प्रतिभाशाली साहित्याची झेप घेतली होती. अण्णा भाऊंनी साहित्य क्षेत्रातही प्रचंड भरारी मारली आहे.त्यांच्या अनेक साहित्यकृती चौदा भारतीय भाषेत प्रसिद्ध झाल्या;तर याशिवाय झेक,पोलीश,जर्मन,फ्रेंच,स्लोव्हॉक,इंग्रजी आणि रशियन भाषेतही रूपांतरित झाल्या आहेत.त्यांच्या अजरामर अशा फकिरा,चित्रा,डोंगरची मैना,वैजयंता, वारणेचा वाघ,टिळा लावते मी रक्ताचा,अशी ही साताऱ्याची तऱ्हा,मुरळी मल्हारी रायाची व चंदन या कथा आणि कादंबऱ्यांवर नऊ चित्रपट निघाले.अण्णा भाऊंच्या चित्रपट क्षेत्रातला प्रवासही मोठा दिमाखदार आहे.फकिरा व अन्य काही चित्रपटात त्यांनी अभिनय ही केला आहे व अनेक चित्रपटांतील काही सीनचे दिग्दर्शनही अण्णा भाऊंनी केले आहे.अण्णा भाऊंचे बहुतेक चित्रपट अतिशय चांगले चालले.या क्षेत्रातही अण्णा भाऊ साठेंनी आपली प्रतिभा दाखविली आहे.अण्णा भाऊ साठे ज्या क्षेत्रात गेले त्या क्षेत्रात त्यांनी त्यांचे नाव अक्षरश: सुवर्णाक्षरांनी कोरुन ठेवले आहे.अण्णा भाऊ साठेंच्या अफलातून व्यक्तिमत्त्वामुळे चित्रपट क्षेत्रातही त्यांना चांगले मित्र मिळाले.जसे की,शंकर, शैलेंद्र,कैफी आजमी,बलराज सहानी,राज कपूर,नर्गिस दत्त, डेव्हीड,नाना पळशीकर,गुरुदत्त,ए.के.हंगल,के.ए.अब्बास, उत्पल दत्त,रमेश देव,राजशेखर,चंद्रकांत, सुलोचना,दादा साळवी,दत्ता माने,अनंत माने,रत्नमाला,अरुण सरनाईक, भालजी पेंढारकर.तर राज कपूर आणि भालजी पेंढारकर यांना सिनेमा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट व सर्वात मोठा मानाचा असलेला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देऊन राष्ट्रपतींनी गौरविले आहे.अशी अफाट कर्तुत्ववान माणसे अण्णा भाऊंच्या सहवासात आली होती.अण्णा भाऊंची मित्र बनली होती.

एक कामगार नेता,शाहीर,कलावंत आणि उच्च प्रतिभेचे साहित्यीक या रुपाने अण्णा भाऊ साठे या नावाचं थोर व्यक्तीमत्व भारताच्या सिमा ओलांडून साता समुद्रापार
रशियात पोहचले होते.यामुळेच तर १९४८ साली अण्णा भाऊंना परदेशगमनाचा योग आला होता.युरोपातील फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस या ठिकाणी भरणाऱ्या शांतता परिषदेसाठी अण्णा भाऊंना रितसर निमंत्रण आले होते.अण्णा भाऊंचे परममित्र आणि त्या काळातील एक सुप्रसिद्ध सिने अभिनेते बलराज साहनी यांनी अण्णा भाऊ साठेंची पॅरिसपर्यंतची तिकिटेही काढली होती.परंतू यावेळी अण्णा भाऊ साठेंना पॅरिसला जाता आले नाही.कारण तत्कालीन काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी अण्णा भाऊ साठेंच्या परदेशगमनावर आडकाठी आणली होती.अण्णा भाऊ साठेंनी रितसर दोनवेळा पासपोर्ट काढला होता.परंतू त्यात ही त्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या हस्तकांकरवी काही त्रुट्या काढून कायदेशीर अडथळा निर्माण केला.यामुळे त्यांना जाता आले नाही.म्हणून मित्र बलराज साहनी हे अण्णा भाऊ साठे यांच्या विनाच गेले होते.याची खंत त्यांनी तेथील व्यासपीठावर व्यक्त केली होती.पुढे सन १९६१ मध्ये अण्णा भाऊ साठेंच्या अजरामर ‘फकिरास’ राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आणि भारत-रशिया या दोन मित्र राष्ट्रांत सांस्कृतिक संबंध प्रस्थापित होण्यासाठी एक संमेलन रशियात आयाेजित करण्यात आले असल्याने “इंडो सोव्हिएट कल्चरल सोसायटीने” अण्णा भाऊ साठेंना या संमेलनासाठी सन्मानपुर्वक रशियाला बोलावले होते.अण्णा भाऊ साठे हे सन्मानाने रशियाला गेले.त्या ४० दिवसाच्या प्रवासाबाबद त्यांनी “माझा रशियाचा प्रवास” यात सविस्तर वर्णन केले आहे.

रशियन लोकांच्या मनात कलावंत आणि कामगारांविषयी अतिशय जिव्हाळा आहे.कलावंत म्हणजे देव व कामगार म्हणजे सृष्टीचा चालक अशी येथील लोकांची पवित्र भावना आहे.अशा देशात अण्णा भाऊ साठे जेंव्हा आपला परिचय देतात तेंव्हा ते म्हणतात…मी ज्या पवित्र भूमीतून आलो आहे,त्या भूमीत पराक्रमी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आहे.अण्णा भाऊ साठे यांनी स्व परिचया पेक्षा भारतभूमी ही नररत्नांची खान आहे हे जागतिक व्यासपीठावर ठणकाऊन सांगीतल्याच दिसत आहे.याची महती पुढे पहावयास मिळाली.प्रसिद्ध हिंदी चित्रपट निर्माते,अभिनेते राज कपूर यांना जागतिक चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने रशियात जाण्याचा योग आला. रशियन संस्कृती व कला,भारतीय संस्कृती व कला यात साम्य असलेल्या त्या महोत्सवाच्या प्रारंभी निवेदकाने राज कपूर यांना कॉम्रेड म्हणून संबोधले.यावेळी कॉ.राज कपूर बोलतांना म्हणाले की,”आम्ही गरीब देशातील माणसं असलो तरी कलेनं समृद्ध आहोत !”
यावर तेथे उपस्थित असलेले थोर रशियन चित्रपट निर्माते मॅगव्हेन्से म्हणाले होते की,”ज्या देशात जवाहरलाल नेहरू, लाल बहादुर शास्त्री,अण्णा भाऊ साठे व राज कपूर सारखी देवमाणसं जन्मली आहेत तो देश गरीब कसा होऊ शकतो ? एकट्या राज कपूरच्या बदल्यात रशियातील सर्व वैभव आम्ही भारताला देण्यासाठी तयार आहोत.आणि हे सारे देव माणसं जर मिळाली तर आमच्याकडे देण्यासाठी काहीच राहिलं नाही तरी चालेल!” मॅगव्हेन्सेच्या या वक्तव्याने रशियाच्या त्या संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला होता. अर्थातच अण्णा भाऊ साठे हे व्यक्तीमत्व किती मोठे आहे हे जागतिक व्यासपीठावरुन भारताने सांगण्याच्या किती तरी अगोदर सांगीतल्या गेले आहे.अण्णा भाऊ साठे यांची थोरवी रशियास भारताच्या खुप अगोदर समजली आहे.परंतू दुर्दैव असे की,रशियात गेलेल्या भारताच्या तत्कालीन पंतप्रधानांना व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अण्णा भाऊ साठे यांची थोरवी समजली नव्हती.आणि आजही भारताच्या व महाराष्ट्राच्या मुख्य सत्ताधिशांची तिच आवस्था आहे.थोर रशियन चित्रपट निर्माते मॅगव्हेन्से यांनी म्हटल्या प्रमाणे रशियन लोकांना व तेथील सत्ताधिशांना जर आजही अण्णा भाऊ साठे यांना सन्मानित करावे,गौरव करावा अशी मागणी केली असती तर त्यांनी तो सन्मान केंव्हाच दिला असता,गौरव ही केला असता.याचा प्रत्यय दि.१४ सप्टेंबर २०२२ रोजी रशियातील मास्को शहरातील मार्गारिटा रुडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर’ नावाच्या संस्थेच्या प्रांगणात उभारलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरणातून दिसून येत आहे.

मुंबई विद्यापीठातील रशियन भाषा विभागाचे प्रमुख डॉ. संजय देशपांडे यांच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठ,महाराष्ट्र सरकार व मातंग ग्रुप डेव्हलपमेंट संघटनेने अण्णा भाऊंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान व्हावा या उद्देशाने मॉस्कोतल्या ‘रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज स्टडी’ या संस्थेस व रशिया सरकार कडे पुतळा उभारण्याची व तैलचित्र लावण्याची मागणी केली होती.या मागणीस मान्यता मिळाली आहे. यावरुन रशियन सरकार व तेथील जनतेने अण्णा भाऊ साठे यांच्या थोरवीस स्विकारल्याचे,सन्मान आणि गौरव केल्याचे निदर्शनास येत आहे.अण्णा भाऊ साठे हे रशियातील ‘हॉटेल सोव्हिएतस्काय’ या हॉटेलमध्ये राहिले होते.त्या हॉटेलात इंदिरा गांधी,मार्गारेट थॅचर,फिडेल कॅस्ट्रो यांच्यासह जगभरातील अनेक राजकारणी नेत्यांनी भेटी दिल्यात, त्यांची तैलचित्रे या हॉटेलात लावण्यात आली आहेत.या हॉटेलात अण्णा भाऊंचंही चित्र असावं म्हणून लेखी प्रस्ताव, त्यांची माहिती आणि वास्तव्याविषयीची माहिती हॉटेल मालकाला दिली होती.त्यामुळे त्या प्रस्तावास हॉटेल मालक व सरकारने मान्यता दिल्यामुळे नांदेडहून खास बनवून घेतलेलं अण्णा भाऊ साठे यांचे तैलचित्र हॉटेल सोव्हिएतस्कायमध्ये लावलेलं आहे.तर रशियामध्ये ‘मार्गारिटा रुडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर’ नावाच्या लायब्ररीच्या बाहेरील प्रांगणात अनेक नेत्यांचे पुतळे आहेत.त्यात महात्मा गांधीं,रविंद्रनाथ टागोर यांचे पुतळे ही आहेत. आता भारतीय तिसरे महापुरुष अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचा यात समावेश झाला आहे.ही सर्व महाराष्ट्रीयन व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.

रशियन साहित्यिक अलेक्से‌ई मॅक्झिमोविच पेश्कोव्ह उर्फ ‘मॅक्झिम गॉर्की’ यांना ‘विनाभिंतीचं विद्यापीठ’ म्हटलं गेलं आहे.यातही ते व महान साहित्यिक भारताचे मॅक्झिम गॉर्की अण्णा भाऊ साठे यांच्यात खुप साम्यता आहे.ज्या व्यक्तीमत्वाने चार भिंतीच्या आतील शाळा,महाविद्यालय कधीही पाहिलेलं नाही,तेथे शिक्षण घेतलेलं नाही,त्या व्यक्तीमत्वाने साहित्यजगतात व अभ्यासकांपुढे एक आव्हान उभे केले आहे.जागतिक स्तरावर अण्णा भाऊ साठे व त्यांच्या साहित्यास कुठल्याही भिंतीत बंदिस्त करणे अशक्य आहे.अण्णा भाऊ साठे नावाचं हे विनाभिंतीचं विद्यापीठ व त्यांच्या साहित्याचे अतुलनीय दालन विद्या वाचस्पतींसाठी रशियातील मास्को शहरामध्ये ‘मार्गारिटा रुडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर’ नावाच्या लायब्ररीच्या बाहेरील प्रांगणात अर्धाकृती पुतळ्याच्या रुपाने आता उभे राहिले आहे.गॉर्की अर्थात कटू व कटूप्रसंगांना सामोरे जाऊन कटूसत्य लिखान करणारे सत्यशोधक साहित्यिक अण्णा भाऊ साठे  यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे लोकार्पण व तैलचित्राचे अनावरण दि.१४ सप्टेंबर २०२२ रोजी रशियात होत आहे.या ऐतिहासिक सोहळ्यांना उपस्थित राहण्याचे व अनावरण करण्याचे भाग्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ए.नारायण स्वामी,महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड.राहुल नार्वेकर,भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे,मुंबई विद्यापीठाचे उप कुलगुरू प्रा.दिगांबर शिरके,डॉ.संजय देशपांडे,भोकरचे भुमिपुत्र डॉ.बळीराम गायकवाड,सुनील वारे,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, माजी आमदार सुधाकर भालेराव,यांसह मातंग ग्रुप डेव्हलपमेंट संघटनेचे जवळपास १०० च्या वरील पदाधिकारी यांना लाभले आहे.भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद लोमोनोसोव्ह मॉस्को युनिव्हर्सिटी,द इन्स्टिट्यूट ऑफ ओरिएंटल स्टडिज ऑफ द रशियन अ‍ॅकडमी ऑफ सायन्स, रशियन स्टेट युनिव्हर्सिटी फॉर द ह्युमॅनिटीज, पुश्किन रशियन लँगवेज इन्स्टिट्युट,सेंट पिटसबर्ग युनिव्हर्सिटी अशा अनेक संस्था या आयोजनात सहभागी झालेल्या असून हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

जागतिक पातळीवर अण्णा भाऊ साठे यांचा व त्यांच्या गौरवशाली कार्यकर्तुत्वाचा यातून रशियन सरकार आणि रशियन जनता सन्मान करत आहे.त्याबद्दल अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्यच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सतिश कावडे,प्रदेशाध्यक्ष उत्तम बाबळे,प्रदेश उपाध्यक्ष परमेश्वर बंडेवार,मराठवाडा अध्यक्ष पिराजी गाडेकर,जिल्हाध्यक्ष शिवाजी नुरुंदे व सर्व पदाधिकारी रशियन सरकार,रशियन जनता,महाराष्ट्र आणि भारतातून गेलेले सर्व उपरोक्त नेते,मान्यवरांचे अगदी मनापासून अभिनंदन करत आहेत.शुभेच्छा देत आहेत व आभार ही मानत आहेत.रशियाने ‘अण्णा भाऊ साठेंना’ समजून घेतलं आहे.लेनिन,मार्क्स व गॉर्की यांच्या प्रमाणेच अण्णा भाऊ साठे यांचे गौरवशाली कार्यकर्तुत्व स्विकारले आहे.परंतू अद्यापही महाराष्ट्राने,महाराष्ट्र सरकारने,भारताने,भारत सरकारने अण्णा भाऊ साठे व त्यांच्या हिमालयापेक्षाही उंच असलेल्या प्रतिभेला आणि गौरवशाली कार्यकर्तुत्वाला पुर्णतः स्विकारलेलं दिसत नाही.जसे की,अण्णा भाऊ साठे यांची जन्मभूमी वाटेगाव जि.सांगली व कर्मभूमी चिरागनगर घाटकोपर,मुंबई येथे पुर्णाकृती भव्य पुतळा उभारु शकले नाहीत आणि प्रेरणादायी स्मारक ही उभारु शकले नाहीत. ज्ञानपीठ,महाराष्ट्र भुषण व भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान ही करु शकले नाहीत.नव्हे तर अण्णा भाऊ साठे प्रेमी, विचार अनुयायी आणि समाज बांधव यांच्यावरील होणारे अन्याय अत्याचार कमी करु शकले नाहीत किंवा त्यांच्या उन्नतीसाठी काही ठोस उपक्रम राबवू शकले नाहीत. अशा परिस्थितीत जर या कार्यक्रम प्रसंगी अण्णा भाऊ साठे प्रेमी रशियन नागरिकाने अण्णा भाऊ साठे यांच्या विषयी भारतात व महाराष्ट्रात आपण काय केलात आणि काय करणार आहात ? म्हणून प्रश्न विचारला तर या सोहळ्यासाठी रशियात गेलेल्या नेत्यांनों,मान्यवरांनो तुम्ही काय उत्तर देणार आहात ? किंवा त्या रशियन नागरिकाने भारतात येऊन पहायचय म्हटलं तर काय दाखविणार आहात ? तुम्ही काहीही उत्तर देऊ शकणार नाहीत व काहीही दाखवू पण शकणार नाहीत.याची नक्कीच खंत वाटते.या सोहळ्यासाठी तुम्ही महाराष्ट्र व केंद्रात सत्ता असलेल्या एकाच पक्षाचे लोक गेलेले आहात.इतर पक्षाचे लोक,साहित्यिक,विचारवंत,अण्णा भाऊ साठेंचे कुटूंबिय किंवा अन्य कोणीही गेलेलं नाही व आपण नेलेलं ही नाही. त्यामुळे या दौऱ्यास राजकीय गंध लागल्याचे निदर्शनास येत असल्याने त्याचे उत्तर ही तुम्हासच द्यावे लागणार आहे. म्हणून आपणास विनंती करतो…अण्णा भाऊ साठे यांच्या ‘त्या’ पुतळ्यासमोर शपथ घ्या की रशियातून परतल्यावर पहिलं काम म्हणजे त्यांच्या जन्मभूमीत व कर्मभूमीत भव्य पुतळे,स्मारक उभारणार आणि त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करणार,मुंबई विद्यापीठाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव देणार, तसेच समाजोन्नतीसाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ सुरु करुन विकास निधिचा प्रलंबित अनुशेष भरुन काढणार,होणारे अन्याय अत्याचार थांबविण्याचा प्रयत्न करु,अनुसूचित जाती आरक्षणाचे अ,ब,क,ड प्रमाणे वर्गीकरण करुन समानतेचा लाभ देणार. अण्णा भाऊ साठे यांचे समग्र साहित्य शासना तर्फे प्रकाशित करुन जागतिक पातळीवर ते उपलब्ध करुन देणार आहात…तुम्ही हे सारं जर करु शकला नाहीत तर त्या रशियन प्रश्नकर्त्या नागरिकापुढे व या सोहळ्यास येऊ न शकलेल्या भारतीयांपुढे तुम्हांला शरमेने मान खाली घालावी लागेल असे वाटते.आणि असे होऊ नये म्हणून तुम्ही वरील प्रमाणे शपथ घ्याल अशी अपेक्षा ठेवतो.तसेच पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचे अभिनंदन करुन पुतळा व तैलचित्र लोकार्पण सोहळ्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो.

तर चला मग या जागतिक पातळीवरच्या अण्णा भाऊ साठे यांच्या सन्मान सोहळ्यात सहभागी होऊयात व जयघोष करुयात…
भारताचे ‘मॅक्झिम गॉर्की अण्णा भाऊ साठे’ यांना कोटी कोटी त्रिवार वंदन !
🌹🙏🌹
उत्तम बाबळे,संपादक
साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान भुषण
प्रदेशाध्यक्ष-अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्य आणि सर्व पदाधिकारी…


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !