चव्हाण-गोरठेकर-किन्हाळकर…या परिघाच्या बाहेरील आमदार भोकरला कधी मिळणार ?
श्रीजया अशोकराव चव्हाण-२०२४ मध्ये भोकर च्या आमदार होणार ? असे सुतोवाच होत असल्याने संयुक्त महाराष्ट्र निर्मिती पासून आजपर्यंत आमदारकी उपभोगलेल्या उपरोक्त ‘राजकीय घराणेशाही’ वर्तुळ परिघाच्या बाहेरील आमदार भोकरला कधी मिळणार ? असा सवाल सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.
संपादकीय – उत्तम बाबळे,संपादक
संयुक्त महाराष्ट्र निर्मिती पुर्वी मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील भोकर चे भूमिपुत्र जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी दिगांबरराव बिंदू यांनी निजामाच्या हैद्राबाद सरकारमध्ये पहिले गृहमंत्री म्हणून राजकीय पद भुषविले.तर संयुक्त महाराष्ट्र निर्मिती नंतर मराठवाडा महाराष्ट्रात विलीन झाला,तेंव्हापासून झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतून भोकर(धर्माबाद-सुरुवातीला भोकर याच मतदार संघात होते.) विधानसभा मतदार संघातून स्व.डॉ.शंकरराव चव्हाण,स्व.बाबासाहेब देशमुख गोरठेकर,डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर,स्व.बापूसाहेब देशमुख गोरठेकर अर्थात चव्हाण-गोरठेकर-किन्हाळकर-गोरठेकर-चव्हाण याच परिवारातील व्यक्तींनी आमदारकी, मंत्री,मुख्यमंत्री अशी पदे उपभोगली.तर आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चव्हाण कुटूंबातील ‘श्रीजया अशोकराव चव्हाण’ यांचे नाव भोकर विधानसभा मतदार संघाच्या भावी उमेदवार तथा आमदार म्हणून पूढे येत असल्याने चव्हाण-गोरठेकर-किन्हाळकर-चव्हाण या ‘राजकीय घराणेशाही’ वर्तुळ परिघाच्या बाहेरील आमदार भोकरला कधी मिळणार ? असा सवाल सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.
पुर्वी राजा-राणीच्या पोटी जन्म घेणाऱ्यास परंपरागत येथील ‘राजा’ केल्या जायचे.परंतू देश स्वातंत्र्यानंतर लोकशाहीत वंदनिय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वारसाने व घराणेशाहीने मिळणारी ही राजेशाही संविधानातून संपुष्टात आणली.तसेच गरीब असो का श्रीमंत दोघांनाही एकच मतदान करण्याचा व निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार प्राप्त करून दिला.त्यांच्या मते घराणेशाही संपविल्याखेरीज लोकशाही सुदृढ होणार नाही व लोकशाहीची फळे सर्वसामान्य माणसाला चाखावयास मिळणार नाहीत.परंतू लोकशाहीत ‘राज घराणेशाही’ संपुष्टात आली आणि ‘राजकीय घराणेशाही’ उदयास आली.भारतीय राजकारणाचा प्रवास लोकशाही नामक गोंडस नावाखाली सुरु असून येथील मतदारांच्या नाड्या मात्र काही मोजक्या घराण्यांच्याच ताब्यात आहेत.गल्ली पासून दिल्ली पर्यंत,राज्य व देशपातळीवर ‘राजकीय घराणेशाही’ ची अनेक उदाहरणे अस्तित्वात आहेत.लोकशाहीतली घराणेशाही अद्याप तरी संपलेली नाही हे वास्तव नाकारता येणार नाही. यातून नांदेड जिल्हा व भोकर विधानसभा मतदार संघ देखील वेगळा किंवा अपवाद आहे असे ही म्हणता येणार नाही. राजकारणात प्रस्थापित अशा मोजक्या कुटुंबांची सरशी होत राहिली आहे व सत्तास्थानी असलेल्या या कुटुंबांतील केवळ पहिली नावे बदलत गेली आणि दुसरी नावे येत राहिली.यासच ‘राजकीय कुटुंब’ किंवा ‘राजकीय घराणेशाही’ असे ‘अर्थपुर्ण’ नाव दिल्या गेले आहे.या ‘राजकीय घराणेशाही’ च्या वर्तुळात नांदेड जिल्हा व भोकर विधानसभा मतदार संघ ही अडकलेला आहे.
रांजणगाव जिल्हा अहमदनगर येथील सौ.लक्ष्मीबाई भाऊराव चव्हाण हे दांपत्य अल्प शेतीमुळे आर्थिक परिस्थिती खालावल्याने तेथून स्थलांतरित होऊन पैठण जिल्हा औरंगाबाद(छत्रपती संभाजी नगर) येथे स्थायिक झाले.तेथे बांधकाम व्यवसाय करु लागल्याने तेथील लोक त्यांना ‘दगडफोडे’ म्हणून संबोधू लागले.सौ.लक्ष्मीबाई भाऊराव चव्हाण ‘दगडफोडे’ दांपत्याच्या पोटी जन्मलेले चौथे अपत्य म्हणजेच लोकनेते स्व.डॉ.शंकरराव भाऊराव चव्हाण हे होत. उस्मानिया विद्यापीठ हैद्राबाद (निजाम राज्य) येथून शंकरराव चव्हाण हे कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले.याच दरम्यान आखाडा बाळापूर जिल्हा परभणी येथील माधवराव पाटील यांच्या कन्या कुसूम यांच्याशी त्यांचा विवाह झाला.लग्नानंतर काही काळ हैदराबाद मध्ये या दांपत्याने वास्तव्य केले.त्यांचे पुढील शिक्षण तेथे चालू होते.परंतू हलाखीची परिस्थिती असल्यामुळे त्यांनी पुढे नांदेड येथे वास्तव्यास राहण्याचा निर्णय घेतला व ते कायमचे नांदेड जिल्ह्याचे झाले.देश स्वातंत्र्य,संयुक्त महाराष्ट्र तथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात मोठे योगदान असलेल्या जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी शंकरराव चव्हाण यांच्या जीवनातील राजकीय क्षेत्राच्या प्रवासाचा आरंभ नांदेड येथूनच सुरू झाला व राज्य आणि देशाच्या उच्च पदावर जाण्याचा मुख्य मार्ग भोकर हे ठरले.सन १९४९ साली शंकरराव चव्हाण हे नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस झाले आणि सन १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी हदगाव विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली,यात ते पराभूत झाले.परंतू न खचता सन १९५३ मध्ये नांदेड नगरपालिकेची निवडणूक लढवून ते नगरसेवक पदी विजयी होऊन नगराध्यक्ष झाले.या काळात सासऱ्याने दिलेल्या सायकल वरुन ते नगरपालिकेत जायचे व सायकल वरुन प्रवास करणाऱ्या शंकरराव चव्हाण यांचा पुढील राजकीय प्रवास गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत सुरु झाला.तो यशस्वी प्रवास शेवटच्या क्षणापर्यंत थांबला नाही…
१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली व यानंतर राज्यात सन १९६२ झालेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत धर्माबाद विधानसभा मतदार संघातून (यावेळी भोकर तालुका याच मतदार संघात होता) शंकरराव चव्हाण यांनी निवडणूक लढविली व विजयी झाल्याने तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्याकडे पाटबंधारे आणि वीज खात्याचा कारभार दिला.विधानसभा मतदार संघाची पुनर्रचना झाली व भोकर विधानसभा मतदार संघात उमरी,धर्माबाद तालुका समाविष्ट झाला.भोकर विधानसभा मतदार संघ हा पुढे ‘चव्हाण’ या राजकीय घराण्याचा पारंपरिक मतदार संघ झाला.शंकरराव चव्हाण यांनी १६०-भोकर विधानसभा मतदार संघातून सन १९६७ व १९७२ मध्ये भा.रा. काँ.चे उमेदवार म्हणून २ वेळा आणि सन १९७८ मध्ये १७२-भोकर विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून १ वेळ,अशा प्रकारे ३ वेळा निवडणूक लढविली.यावेळी येथील मतदारांनी त्यांना विजयी केले.यामुळेच ते मंत्रिमंडळात जवळजवळ कायमच राहिले होते.याच मतदार संघातून निवडून गेलेल्या शंकरराव चव्हाण यांनी सन १९७५ ते १९७७ आणि आणि दि.१३ मार्च १९८६ ते दि.२४ जून १९८८ या कालावधीत २ वेळा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. यानंतर त्यांना केंद्रात सेवा करण्याची संधी मिळाली.शंकरराव चव्हाण यांनी १९८७ ते १९९० या ३ वर्षात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून कारभार पाहिला.तसेच पी.व्ही.नरसिंहराव आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणूनही केंद्रात यशस्वी कामाची छाप सोडली.
याच दरम्यान शंकरराव चव्हाण यांच्या विरुद्ध पराभूत झालेले गोरठा ता.भोकर(सद्याचा तालुका उमरी) येथील बालाजीराव गोपाळराव देशमुख उर्फ बाबासाहेब देशमुख गोरठेकर यांना भोकर विधानसभा मतदार संघाने संधी दिली.त्यांनी सन १९८० व १९८५ मध्ये १७२-भोकर विधानसभा मतदार संघातून भा.रा. काँ,आय.चे उमेदवार म्हणून २ वेळा आणि सन १९९९ मध्ये १ वेळ (अपक्ष) अशा प्रकारे ३ वेळा निवडणूक लढविली.यावेळी येथील मतदारांनी त्यांना विजयी करुन विधानसभेचे प्रतिनिधित्व दिले.यानंतर एक अभ्यासू, प्रखंड वक्ते म्हणून परिचित असलेले भोकर येथील जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी जि.प.सभापती भुजंगराव पाटील किन्हाळकर यांचे चिरंजीव डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर यांची भोकर विधानसभा मतदार संघात एन्ट्री झाली.१७२-भोकर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सन १९९० व सन १९९५ मध्ये निवडणूक लढविली आणि या दोन्ही निवडणुकीत ते विजयी झाले.यानंतर मात्र पुढे त्यांना यश आले नाही.तर सन २००४ मध्ये १७२-भोकर विधानसभा मतदार संघातून श्रीनिवास बालाजीराव देशमुख उर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. यात त्यांना विजयश्री प्राप्त झाली. परंतू पुढील निवडणुकीत मतदार संघाची पुनर्रचना झाली व ८५-भोकर विधानसभा मतदार संघात मुदखेड व अर्धापूर तालुक्यांचा समावेश झाला.मुदखेड मतदार संघाचे तत्कालीन आमदार अशोक शंकरराव चव्हाण यांच्यासाठी हा मतदार संघ सोयीचा झाला व चव्हाण कुटूंबियांच्या परंपरागत भोकर विधानसभा मतदार संघात त्यांची एन्ट्री झाली आणि बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांना नाईलाजास्तव नायगाव विधानसभा मतदार संघात जावे लागले.
सन २००९ मध्ये ८५-भोकर विधानसभा मतदार संघात ‘चव्हाण’ कुटूंबीय परतले.सन २००९ च्या निवडणूकीत अशोक चव्हाण यांना येथील जनतेने विक्रमी मतांनी निवडून दिले व ते राज्याचे मुख्यमंत्री झाले.तर सन २०१४ मध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी अमिता अशोकराव चव्हाण यांना जनतेनी प्रचंड मताचा कौल देऊन विजयी केले.याच वर्षी अशोक चव्हाण हे मोदी लाट असतांनाही नांदेड लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले.ते खासदार व पत्नी आमदार,अशी दोन पदे एकाच वेळी चव्हाण दांपत्याने उपभोगली आहेत. सन २०१९ मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढलेल्या अशोक चव्हाण यांना प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या समोर पराभव पत्करावा लागला असला तरी याच वर्षी ८५-भोकर विधानसभा मतदार संघातील मतदारांनी अशोक चव्हाण यांना पुन्हा निवडणूक दिले व विधानसभेत पाठविले आणि ते मंत्री झाले. पक्षांतर व पक्ष फुटीतून ते सरकार कोसळले व मंत्री पद ही गेले.काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी भाजपाशी हातमिळवणी करुन काँग्रेस पक्ष त्यागला व भाजपाचे कमळ हाती धरून राज्यसभेचे ते खासदार झाले आहेत.त्यामुळे सद्या भोकर विधानसभा मतदार संघ हा आमदार नसलेला मतदार संघ झाला आहे.
श्रीजया अशोकराव चव्हाण-२०२४ मध्ये भोकर च्या आमदार होणार ? तर मग…
चव्हाण-गोरठेकर-किन्हाळकर…या परिघाच्या बाहेरील आमदार भोकरला कधी मिळणार ?
एकूणच असे की,भोकर आणि भोकर विधानसभा मतदार संघाने ‘चव्हाण’ कुटूंबातील पिता-पुत्रास देशाचे अर्थमंत्री, गृहमंत्री व राज्यात प्रत्येकी दोन वेळा मुख्यमंत्री पद व इतर मंत्रीपदे दिली आहेत आणि स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या सूनबाई अमिता अशोकराव चव्हाण यांना आमदार केले आहे. तर ‘किन्हाळकर’ कुटूंबातील जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.भुजंगराव पाटील किन्हाळकर यांना जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती व त्यांचे पुत्र डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर यांना आमदार आणि महसूल व गृह राज्यमंत्री केले आहे.तसेच ‘गोरठेकर’ कुटूंबातील पिता-पुत्रास ही आमदार केले आहे व स्व.बाबासाहेब देशमुख गोरठेकर यांनी आपल्या निस्वार्थ मताने कोसळणारे राज्य सरकार वाचविले आहे.नुकतेच माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार अशोक चव्हाण यांनी पक्षाचा व आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपाचे कमळ हाती धरुन राज्यसभेची खासदारकी प्राप्त केली आहे. त्यामुळे भोकर विधानसभा मतदार संघ सद्या आमदार पदापासून रिक्त असून भावी उमेदवार व आमदार कोण होणार ? याविषयी तर्क वितर्क लावले जात असतांनाच माजी आमदार अमिता अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या कन्या श्रीजया अशोकराव चव्हाण यांचे नाव या मतदार संघासाठी नुकतेच पुढे आणले आहे.हे होतांना उपरोक्त तीन कुटूंबातील नावे वगळता कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या काही व्यक्तींनी उपरोक्तांविरुद्ध मोठी संघर्षमयी लढत दिली आहे.त्यांना ही विसरता येणार नाही.जसे की,स्व.डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या विरुद्ध स्व.नागनाथअप्पा शिवलिंग विभुते उर्फ शाहीर जंगम स्वामी,सन १९९० मध्ये १७२-भोकर विधानसभा मतदार संघातून किशोर भुजंगराव केसराळे,डॉ.उत्तम लच्छमा जाधव,सन १९९५,१९९९, २००४ मध्ये नागनाथ लक्ष्मणराव घिसेवाड,सन २९९५ मध्ये संजयकुमार दत्तात्रय कुलकर्णी,तर २०१९ मध्ये नामदेवराव आयलवाड यांनी येथून लढण्याचे धाडस्य दाखविले आहे.यात किशोर केसराळे आणि नागनाथ घिसेवाड या दोघांचा अगदी अल्प मतांनी निसटता पराभव झालेला आहे.डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर हे सद्या भाजपात आहेत व ते आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचे दावेदार होऊ शकतात.परंतू पराभवाचा त्यांनी उच्चांक गाठला आहे.तसेच त्यांनी येथील जनसंपर्क व जनतेची म्हणावी तशी नाळ जोडून न ठेवल्याने भाजपा त्यांना परत उमेदवारी देईल किंवा नाही ? यावर प्रश्नचिन्ह आहे.म्हणून माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांच्या उमेवारीच्या दावेदारीवर शिक्कामोर्तब होऊ शकतो ? असे ही बोलल्या जात आहे.
लोकशाहीसंपन्न देशात मतदार राजा हा सार्वभौम असून,तो पाच वर्षांत या लोकशाहीचा राजा कोण असणार ? हे ठरवत असला तरी,वर्षानुवर्षे अनेक ‘राजकीय घराणी’ लोकप्रतिनिधीत्वाने सत्ता उपभोगत आहेत.कारण येथील जनतेने ‘लोकशाही स्विकारली आहे,परंतू जिंकून येण्याची क्षमता‘ हा अलिखित निकष ठरविला असून यापुढे मतदार ‘नमो अर्थाय’ झाला आहे.आणि ‘नमो अर्थाय’ चे गणित चांगल्या प्रकारे ‘मॅनेजमेंट गुरु’ म्हणून परिचित असलेले राज्यसभेचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांना सोडविता येते.ते भाजपात गेल्यामुळे त्यांच्या हक्काचे काही, दलित,मुस्लिम व बहुजन मतदार त्यांच्या पासून दुर गेले असले तरी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर व त्यांच्यातील राजकीय वैर संपुष्टात आले असल्याने आणि पक्षांतर्गत ची गटबाजी नष्ट करण्यात मॅनेजमेंट गुरु यशस्वी झाले तर मतदान रुपी बेरजेचे गणित भविष्यात जमेची बाजू ठरणार आहे.तसे पाहता जिल्हा व भोकर विधानसभा मतदार संघात आता प्रबळ विरोधक उरला ही नसल्यागतच आहे.विधानसभा निवडणुकी अगोदर लोकसभेची निवडणूक असून यात खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांची किंवा भाजपाच्या अन्य संभाव्य उमेदवारांची जागा सुरक्षित झालेली आहे.तसेच खा.अशोक चव्हाण हे भाजपा व लोकसभेचे भावी उमेदवार यांना ते किती लाभदायी ठरतात हे लवकरच पहावयास मिळणारच आहे.तर श्रीजया चव्हाण यांच्या रुपाने ‘चव्हाण’ कुटूंबातील तिसरी पिढी त्यांच्या परंपरागत भोकर विधानसभा मतदार संघाच्या राजकीय आखाड्यात उतरणार असल्याने येथील मतदारांना पुन्हा एकदा ‘नमो अर्थाय्’ होण्याची संधी मिळणार आहे.
असे असले तरी वंदनिय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेली ‘राजकीय लोकशाही व संविधानाने दिलेले अधिकार’ सद्य स्थितीत आमलात आहेत काय ? ही एक चिंतनिय बाब आहे.यथार्थ लोकशाही ही प्रत्यक्ष लोकशाहीच असली पाहिजे व ‘लोकांचे’ आणि ‘लोकांनी चालवलेले’ राज्य नसेल,तर ते लोकशाही या संज्ञेस पात्र राहत नाही.साहित्यरत्न सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांनी म्हटले आहे ‘यह आजादी झुठी है,देश की जनता भुखी है!’ नक्कीच हे वास्तव नाकारता येणार नाही.‘भुखी’ चा अर्थ उपाशी असा होतो,परंतू तो अनेकार्थी शब्द असल्याने आपण येथे केवळ ‘वंचित’ असा अर्थ जरी घेतला तरी चालेल.देश स्वातंत्र्यास ७५ वर्ष होऊन गेलेत,परंतू अद्यापही येथील काही मोजकीच ‘राजकीय घराणेशाही’ सत्ता उपभोगत आहे व सर्व सामान्य माणूस केवळ मतदान करण्यापुरताच उरला असून सत्तेच्या खुर्चीपासून वंचित राहत आहे.त्यामुळे त्यास अद्यापही लोकशाहीची फळे चाखता येत नाहीत व त्यांचे सार्वभौमत्वीक हक्क है एक कल्पित वस्तू बनली आहेत.राजकीय लोकशाही हक्क-अधिकारात वारसा,पद,पैसा,प्रतिष्ठा यातून जिंकून येण्याची क्षमता हाच एक निकष ठरल्याने राजकीय घराणेशाहीतून ‘एकाने एकासाठी लादलेली उमेदवारी’ अपरिहार्यपणे मतदारांनी स्विकारली आहे.त्यामुळे ‘चव्हाण’ या राजकीय घराणेशाहीतील तिसरी पिढी श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्या रुपाने सत्तेत येईलच हे नाकारता येणार नाही.तसेच राजकीय पक्षांचे सर्व स्तरांवर होत चाललेले अध:पतन हा एकंदरीत सामाजिक अध:पतनाचाच एक अपरिहार्य भाग बनला आहे,असा दावा ही करता येईल,परंतू विद्यमान काळात ‘राजकीय सुधारणा’ करण्याची नितांत गरज आहे,हे कुणालाही मान्य करावे लागेलच.तरच सामान्य माणसास राजकीय लोकशाहीतला खरा अधिकार प्राप्त होईल. त्यामुळे लोकशाहीची व संविधानाची योग्यवेळी सामान्य जनतेने योग्य बाजू घेतली पाहिजे.राजकीय लोकशाहीमध्ये ‘राजकीय घराणेशाही’ संपली पाहिजे व सत्तांतर होणे गरजेचे असते,म्हणून जनतेने हे केलंच पाहिजे,अन्यथा मतदार हा हुकुमशाहीचा पुरस्कर्ता होईल आणि राजकीय घराणेशाहीच्या वर्तुळ परिघाबाहेरील व्यक्ती कदापिही सत्तेत येणार नाही.भोकर विधानसभा मतदार संघातील मतदारांनी ‘राजकीय घराणेशाही’ स्विकारली आहे यात दुमत नाही.तसे नसेल तर उपरोक्त उल्लेखित ‘राजकीय घराणेशाही’ वर्तुळ परिघाबाहेरील सामान्य व्यक्ती येथील आमदार झाली असती.सद्या तरी हे होणे अशक्य आहे असे वाटत असल्याने संयुक्त महाराष्ट्र निर्मिती पासून आजपर्यंत आमदारकी उपभोगलेल्या उपरोक्त ‘राजकीय घराणेशाही’ वर्तुळ परिघाच्या बाहेरील आमदार भोकरला कधी मिळणार ? सामान्य जनतेतून उपस्थित केल्या जात असलेला हा सवाल सदैव प्रश्नांकितच राहणार आहे! तसे पाहता आजच्या राजकीय क्षेत्रात सामान्य कार्यकर्त्याकडे नारे लावणे व सतरंज्या उचलण्या व्यतिरिक्त काम उरले नसून बहुसंख्य मतदारांनी ही राजकीय घराणेशाहीपुढे मानसिक गुलामी पत्करली असल्याचे निदर्शनास येत आहे.यातून स्वाभिमानी मतदार बाहेर पडला तरच या परिघाबाहेरील व्यक्ती येथील सत्तेत जाईल असे मला वाटते…भविष्यात स्वाभिमानी मतदार घडावा अशी आपेक्षा ठेवतो व थांबतो!उत्तम बाबळे,संपादक