राहुल गांधींच्या बिना बोगीचे इंजिन असलेल्या गाडीला मतदान करून फायदा नाही- देवेंद्र फडणवीस
{ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसारखे सर्वव्यापी विकासाच्या सक्षम इंजिनला जोडलेल्या डब्यांच्या गाडीत बसण्यासाठी महायुतीचे उमेदवार खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मतदान करण्याचे त्यांनी केले आवाहन! }
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : राहुल गांधी सारख्या बिना बोगीच्या दिशाहिन अनेक इंजिन जोडलेल्या इंडिया आघाडीच्या गाडीला मतदान करून फायदा नाही,कारण त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा चेहराच नाही.तर विकास पुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसारखे सक्षम व सर्वव्यापी विकासाच्या अनेक बोगी जोडलेल्या आणि त्यात सर्वाना सामावून घेणाऱ्या गाडीत बसून देशासह आपल्या मतदार संघाचा विकास करुन घेण्यासाठी या गाडीतील महायुतीचे १६-नांदेड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे,असे आवाहन महायुतीचे स्टार प्रचारक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि.२२ एप्रिल रोजी भोकर येथे संपन्न झालेल्या प्रचार सभेत केले.
१८-व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या दुसऱ्या टप्यातील मतदार संघातील निवडणूक रणांगणातील प्रचाराच्या तोफा दि.२४ एप्रिल २०२४ रोजी थंड होणार असून मतदान प्रक्रियेला अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत.१६-नांदेड लोकसभा मतदार संघातील निवडणूक रणांगणातील प्रचार अंतिम टप्प्यात असून दि.२२ एप्रिल २०२४ रोजी भोकर येथील नवा मोंढा मैदानावर महायुतीचे उमेदवार खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ स्टार प्रचारक तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.या प्रचार सभेला केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड,माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण,खा.डॉ. अजित गोपछडे,नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, आ.रमेश पाटील,आ.भीमराव केराम,माजी मंत्री डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर,माजी आमदार अमरनाथ राजूरकर,मा. आ.ओमप्रकाश पोकर्णा,माजी जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबूलगेकर,श्रीजया चव्हाण,संतुकराव हंबर्डे,सुरेश आंबूलगेकर, प्रकाश मामा कोंडलवार,नामदेव आयलवाड,राजा खंडेराव देशमुख,प्रविण गायकवाड यासाह महायुतीच्या अनेक मान्यवरांची उपास्थिती होती.
या जाहीर सभेत प्रविण गायकवाड,सुरेश अंबुलगेकर,आ.रमेश पाटील,डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर यांनी प्रचारास अनुसरून मनोगत व्यक्त केले.तर उपस्थितांना संबोधित करताना खा.डॉ.अजित गोपछडे म्हणले की,देशाचे विकास पुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला राज्यसभेची संधी दिली. त्यामुळे खासदार अशोक चव्हाण व खा.प्रतापराव पाटील चिखलीकर या दोन राजकीय विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नांदेडसह मराठवाड्याच्या विकासासाठी मला काम करण्याची संधी मिळाली असून ती विकास कामे करण्यासाठी मी कटीबद्ध राहील.तर उमेदवार खा.प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की,ही निवडणूक सामान्य नसून देशाचा नेता ठरवणारी आहे व पुढील ५ वर्ष हा देश कोणाच्या हाती द्यायचा ? महत्वपुर्ण निर्णय घेण्याची आहे.त्यामुळे ज्यांच्या हाती देशाचा कारभार आपणास द्यावयाचे आहे ते नेतृत्व सक्षम असले पाहिजे,असे सक्षम नेतृत्व विकासपुरुष नरेंद्र मोदी यांच्या रुपाने आपणास लाभले आहे.त्यामुळे त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण मला येत्या दि.२६ एप्रिल २०२४ रोजी कमळ या चिन्हावर मतदान करुन मला प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे,अशी विनंती करतो,तसेच मागिल काळात जे मला करता आले व राहिलेली विकास कामे पुढील ५ वर्षात प्रामाणिकपणे पुर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन,असे ही ते म्हणाले.
तसेच खा.अशोक चव्हाण म्हणाले की,नाना पटोले बेजबाबदार माणूस असून विधानसभेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याच्या गंभीर चुकीमुळेच राज्यातील सत्ता गमवावी लागली आहे.मा.सर्वोच्च न्यायालयाने देशाचे संविधानात बदलता येणार नाही असे स्पष्ट मत व्यक्त केलेले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण बहुमत असलेल्या केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षात संविधानाचे पावित्र्य जपले आहे.परंतू विरोधक हे वारंवार संविधान बदलणार असल्याच्या वलग्ना करून नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचे राजकीय षडयंत्र रचत आहेत.ते षडयंत्र हाणून पाडावे व खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे.त्यांनी निवडून आणण्याची जबाबदारी माझी व आपल्या सर्वांची आहे,असे ही ते म्हणाले.
तर सभेचे मुख्य मार्गदर्शक राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करतांना पुढे म्हणाले की,काँग्रेस व इंडिया गठबंधन आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहराच नाही.ते मित्रपक्षातील एकमेकांचे पाय ओढण्यात गुंतले आहेत.केवळ राहुल गांधी हे एकच इंजिन असून,मागे एकही डबा जोडला नसल्याने तुम्हाला बसण्यासाठी जागाच नाही.तसेत यातील सर्व नेते स्वतःलाच मुख्य इंजिन समजून आपापल्या राज्याच्या दिशेने भरकटत निघाले आहेत.ते सर्व इंजिन दिशाहीन आहेत. तर आमच्याकडील पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी या विकास इंजिनला शिवसेना (एकनाथ शिंदे गट),राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मनसेसह अन्य मित्र पक्षांचे आणि आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाची बोगी जोडली आहे.तुम्हा सर्वांना त्यात सोबत घेऊन विकास साध्य करावयाचा आहे.रस्ते,पाणी,सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न झाले आहेत.आता पहिल्यानंदाच अशोक चव्हाण यांच्या सारखा विकासाची दूरदृष्टी असलेला नेता भाजपाला मिळाला असून त्यांच्या येण्यामुळे नांदेड व मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी त्यांच्या अनुभवाची मदत होईल.सामाजातील प्रत्येक घटकाला बळ देऊन उभे करण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले असून विकासाचा तो चढता आलेख कायम ठेवण्यासाठी १६-नांदेड लोकसभा मतदार संघांचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावेत,असे आवाहन ही यावेळी त्यांनी केले आहे.
उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या सदरील जाहीर सभेचे सुरेख असे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन भाजपाचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष ॲड.किशोर देशमुख यांनी केले.तर या सभेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा उपाध्यक्ष किशोर पाटील लगळूदकर, प्र.का.स.दिलीप सोनटक्के,तालुकाध्यक्ष गणेश पाटील कापसे, भगवान दंडवे,जगदीश पाटील भोशीकर,बाळा साकळकर, संतोष मारकवार,विजया घिसेवाड,गणपत पिट्टेवाड,विशाल माने,वेणू कोंडलवार यांसह आदींनी परिश्रम घेतले.तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही प्रचार सभे दरम्यान कायदा व सुव्यवस्थेसाठी भोकर चे अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
“महायुतीतील मित्र पक्ष पदाधिकाऱ्यांनी जाहीर सभेकडे फिरवली पाठ”
भाजपा, शिवसेना(शिंदे गट),राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट),रिपाई (आठवले गट),रासपा,मनसे यासह अन्य काही पक्षांची महायुती असून होऊ घातलेली निवडणूक महायुती म्हणून लढाविली जात आहे.परंतू भोकर येथे महायुतीचे उमेदवार खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ संपन्न झालेल्या जाहीर सभेत महायुतीचे मुख्यघटकपक्ष असलेल्या उपरोक्त पक्षांचे वरीष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष किंवा अन्य कोणत्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांची व्यासपीठावर उपस्थिती दिसून आली नाही.नव्हे तर उपरोक्त पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा नामोल्लेख ही केला गेला नाही.यावरून असे दिसते की,भाजपाने ‘अकेला चलोचा’ मार्ग निवडला आहे.तर अनुपस्थित असलेल्या त्यातील काही स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी म्हटले की,भाजपा ने आम्हाला आतापर्यंत कसलीही सन्मानाची वागणूक दिली नाही व या सभेस येण्यासाठी बोलावले नसल्याने आम्ही अनुपस्थित राहिलो आहोत.