Fri. Dec 20th, 2024

खा.अशोक चव्हाण यांच्या ‘होमपिचवर’ आज होणार नाना पटोलेंची ‘बॅटिंग’

Spread the love

१६-नांदेड लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण यांच्या प्रचारार्थ भोकर येथे जाहीर सभेचे आयोजन

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : १६-नांदेड लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांचा अंतिम टप्प्यातील प्रचार शिगेला पोहचला असून भाजपाचे खा. अशोक चव्हाण यांच्या भोकर येथील ‘होमपिचवर’ आज दि.२१ एप्रिल रोजी एस.बी. आय.च्या मागे,आयटीआय समोरील प्रांगणात सकाळी ११:०० वाजता महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत बळवंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा स्टार प्रचारक नाना पटोले यांची जाहीर होणार आहे.माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोक चव्हाण व नाना पटोले यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाचे नाते ‘विळा भोपळ्याचे असल्याचे सर्वज्ञात असल्याने खा.अशोक चव्हाण यांच्या होमपिचवर नाना पटोले हे कशा प्रकारची ‘बॅटिंग’ करतील? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

होऊ घातलेल्या १८-व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील मतदार संघातील उमेदवारांसाठी पहिल्या टप्प्यातील  मतदान दि.१९ एप्रिल रोजी झाले आहे.तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान दि.२६ एप्रिल रोजी होणार आहे.दुसऱ्या टप्प्यातील मतदार संघातील उमेदवारांसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून १६-नांदेड लोकसभा मतदार संघातील मसाविकास आघाडीचे उमेदवार वसंत बळवंतराव चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस व महाविका आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.तर भाजपा तथा महायुतीचे उमेदवार खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांना निवडून आणण्यासाठी भाजपाचे खा.अशोक चव्हाण व घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.त्यांना प्रतिउत्तर देण्यासाठी व उमेदवार वसंत बळवंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदार संघातील भोकर येथे अर्थातच ‘होमपिचवर’ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी आ.माधवराव पाटील जवळगावकर,काँग्रेसचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष बि.आर.कदम जिल्हा अध्यक्ष उतर,नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष माजी आ. हनंमत पाटील बेटमोगरेकर,काँग्रेसचे नांदेड महानगर  अध्यक्ष अब्दुल सत्तार,शमीम अब्दुला,ॲड.सुरेंद्र घोडजकर,शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नांदेड जिल्हा प्रमुख बबन बारसे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे(शरद पवार) डॉ.सुनील कदम यांसह आदींची उपस्थिती राहणार आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भोकर विधानसभा मतदार संघाच्या आमदारकीचा व काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आणि ते राज्यसभेचे खासदार झाले.यावेळी व नंतर ही त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अनेक आरोप केले.तर त्या आरोपांच्या प्रतिउत्तरार्थ नाना पटोले यांनी देखील त्यांच्या विरुद्ध प्रत्यारोप केले.या दोघांत परस्पर विरोधी आरोप-प्रत्यारोपाचे अनेक ‘चेंडू’ फेकल्या गेलेत व अद्यापही तो सामना सुरुच आहे.तसेच खा. अशोक चव्हाण यांच्या ‘होमपिचवर’ भोकर येथे आज नाना पटोले हे भाषणरुपी धुवांधार बॅटिंग करणार आहेत,असे बोलल्या जात आहे.त्यामुळे नाना पटोले हे लोकसभेच्या निवडणूक सामन्यात कशा प्रकारे ‘बॅटिंग’ करतील याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.तर सदरील सभेच्या यशस्वीतेसाठी काँग्रेसचे भोकर तालुका अध्यक्ष गोविंद बाबागौड पाटील,माजी जि.प.सभापती प्रकाश देशमुख भोसीकर,काँग्रेसचे उत्तर नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष तथा माजी जि.प.सभापणी बाळासाहेब पाटील रावणगावकर,काँग्रेसचे नांदेड उत्तर जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ वर्षेवार,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भोकर तालुका प्रमुख संतोष आलेवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार) तालुका अध्यक्ष ॲड.शिवाजी कदम,काँग्रेसचे भोकर शहराध्यक्ष तौसिफ इनामदार यांसह आदीजण परिश्रम घेत असून होणार असलेल्या सभेसाठी नागरिकांना बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

संचालक सुभाष पाटील किन्हाळकर यांसह अनेकांचा होणार काँग्रेस पक्षात प्रवेश!

स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर चे संचालक सुभाष पाटील किन्हाळकर यांनी भाजपाला अखेरचा राम राम ठोकून आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून आज भोकर येथे होत असलेल्या जाहीर प्रचार सभेत त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे.याचबरोबर त्यांच्या समवेत इतर ही काही मान्यवर नेत्यांचा प्रवेश होणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष गोविंद बाबागौड पाटील यांनी दिली आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !