विधीसेवेसह दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु-ॲड.संदिप कुंभेकर
भोकर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय अंतर्गत वकील आणि अभिवक्ता संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड.संदिप कुंभेकर यांनी दिली आश्वस्त प्रतिक्रिया
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय अंतर्गत येणाऱ्या वादातीत शोषित,वंचित,पीडित आणि दुर्बल घटकांना योग्य विधीसेवा देणे हे आमचे कर्तव्य असून त्या सर्वांना विधीसेवेसह न्याय मिळवून देण्यासाठी अभिवक्ता संघ सदैव प्रयत्न करेल,अशी आश्वस्त प्रतिक्रिया भोकर वकील व अभिवक्ता संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड.संदिप कुंभेकर यांनी दिली आहे.दि.१२ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या अभिवक्ता संघाच्या निवडणूक प्रक्रियेनंतर संपर्क साधला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
भोकर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय अंतर्गत वकील आणि अभिवक्ता संघाची द्विवार्षीक निवडणूक -२०२४- २५ ची प्रक्रिया दि.१२ फेब्रुवारी २०२४ रोजी लोकशाही पद्धतीने गुप्त मतदानाने पार पडली.या निवडणूकीचे निर्वाचन अधिकारी म्हणून ॲड.एस.एस.कुंटे,सहाय्यक निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून ॲड.एस.सी.कदम व मदतनीस म्हणून सय्यद आबेद यांनी काम पाहिले. अभिवक्ता संघाच्या कार्यकारिणी पदाधिकारी निवडणूकीत अध्यक्ष पदासाठी ॲड.संदिप कुंभेकर,ॲड.परमेश्वर पांचाळ,ॲड.एस.एन.कादरी हे तिघे रिंगणात होते.तर उपाध्यक्ष पदासाठी-२,सचिव पदासाठी-४ व कोषाध्यक्ष पदासाठी-३ उमेदवार रिंगणात उतरले होते.अनेक वर्षांनंतर ही निवडणूक लोकशाही पद्धतीने गुप्त मतदानाने झाल्याने निवडणुकीत मोठी रंगत भरली होती.नव्हे तर न्यायालय परिसरास राजकीय निवडणूकीच्या प्रांगणाचे स्वरूप आले होते.
अध्यक्ष व सर्वच पदासाठीच्या उमेदवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती. फेब्रुवारी रोजी उपरोक्त पदासाठी ६८ वकील मतदार सदस्यांपैकी ६६ सदस्यांनी गुप्त मतदान केले.यात अध्यक्ष पदासाठीचे उमेदवार ॲड.संदीप कुंभेकर व ॲड.सय्यद एस.एन कादरी या दोघांना प्रत्येकी २५ असे समान मते मिळाली.तर ॲड.परमेश्वर पांचाळ यांना १६ मते मिळाली.तसेच उपाध्यक्ष पदासाठीचे उमेदवार ॲड.मंगेश पेदे यांना ४० मते व सचिव पदासाठीचे उमेदवार ॲड.प्रदिप लोखंडे यांना २६ मते मिळाली.तसेच कोषाध्यक्ष पदासाठीचे उमेदवार ॲड.विशाल दंडवे यांना ४३ मते मिळाल्यावरुन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उपरोक्तांना विजयी घोषित केले.विशेष बाब म्हणजे अध्यक्षपदासाठीच्या ॲड.संदिप कुंभेकर व ॲड.एस. एन.कादरी यांना समान मते मिळाल्याने दोन वर्षांच्या कार्यकाळापैकी प्रत्येकी एक वर्ष अध्यक्षपद भुषविण्याची संधी देण्याकरिता नाणेफेक करण्यात आले.या नाणेफेकीत प्रथम संधीचे भाग्यवान ॲड.संदिप कुंभेकर ठरले.तर या निवडणूकी दरम्यान खालील पदासाठीच्या उमेदवारांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने सहसचिव पदाचे उमेदवार ॲड.प्रकाश मेंडके,विशिष्ट सहायक पदाचे उमेदवार ॲड.निखील देशपांडे व महिला प्रतिनिधी पदाच्या उमेदवार ॲड.सुजाता कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.लोकशाही पद्धतीने ही निवड झाल्याने आनंदोत्सवी साजरा करण्यात आला व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे जेष्ठ वकीलांसह अनेकांनी अभिनंदन करुन त्यांना पुढील सेवाकर्तुव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रथम अध्यक्ष ॲड.संदिप कुंभेकर यांनी दणदणीत विजयश्री प्राप्त केल्याने त्यांचे अनेकांतून अभिनंदन होत असून आम्ही देखील त्यांचे यथोचित अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या आणि पुढील सेवाकार्यासंबधी संवाद साधला असता ते म्हणाले की, सर्व वादातीत नागरिकांना योग्य न्याय व वकील बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करु.तसेच न्यायालयाच्या नुतन इमारतीत सर्व वकिलांच्या बैठकीसाठी स्वतंत्र बैठकगृह व सभागृह मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.याच बरोबर गरीब,गरजू नागरिकांच्या आरोग्य समस्या सोडविण्यासाठी व रुग्णांच्या उपचारासाठी धर्मादाय आयुक्तांमार्फत रुग्णालये उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करु,असे ही ते म्हणाले.