२४ एप्रिल रोजी सायं.६ वाजता नांदेड लोकसभेतील प्रचार भोंग्यांचा आवाज झाला बंद
लोकसभा मतदार संघाबाहेरील राजकीय नेत्यांनी मतदान पुर्व ४८ तासापुर्वी मतदार संघ सोडण्याचे आवाहन-जिल्हा प्रशासन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : १८ व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने होऊ घातलेल्या दुसऱ्या टप्प्यातील १६-नांदेड लोकसभा मतदार संघातील उमेदवारांसाठी दि. २६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजता पर्यंत मतदान होणार असून उमेदवारांच्या प्रचारासाठी होत असलेल्या जाहीर सभा,कोपरा सभा,गृह भेटीतल्या प्रचारकांच्या भोंग्यांचा दि.२४ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता आवाज बंद झाला असून राजकीय पक्षांना आपला प्रचार थांबावावा लागणार आहे.तसेच प्रचाराचा कालावधी संपल्यामुळे ४८ तासापूर्वी मतदार संघाबाहेरील राजकीय नेते,कार्यकर्ते यांनी मतदारसंघ सोडावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदार संघापैकी १६-नांदेड लोकसभा मतदारसंघातील होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूकीत पक्ष,अपक्ष असे एकूण २३ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असून दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजता पर्यंत मतदार संघातील एकूण १८ लक्ष ५१ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावून त्यांचे भवितव्य ठरविणार आहेत.जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी विभाग प्रमुखांची व भोकर,नांदेड उत्तर,नांदेड दक्षिण,नायगाव,देगलूर,मुखेड, यांच्यासह हिंगोली मतदारसंघात येणाऱ्या किनवट व हादगाव येथील सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्याशी मतदान पुर्व तयारी बाबतची चर्चा केली असून संपुर्ण निवडणूक यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.
१६-नांदेड लोकसभा मतदार संघातील एकूण १८ लक्ष ५१ हजार मतदार बजावणार आहेत मतदानाचा हक्क
नांदेड लोकसभा मतदारसंघामधील भोकर विधानसभा मतदार संघातील -२९४४०९,नांदेड उत्तर-३४६८८६,नांदेड दक्षिण- ३०८७९०,नायगाव-३०१२९९,देगलूर- ३०३९४३ व मुखेड विधानसभा मतदार संघातील- २९६५१६ असे एकूण १८ लक्ष ५१ हजार ८४३ मतदार यावेळी मतदानाचा हक्क बजावणार आहेत.तर यामध्ये ९ लक्ष ५५ हजार ८४ पुरुष,८ लक्ष ९६ हजार ६१७ महिला व १४२ तृतीय पंथी मतदारांचा समावेश आहे.तसेच २०६२ केंद्रावर हे मतदान होणार आहे.
जिल्ह्यामध्ये कलम १४४ लागू ; सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ प्रमाणे लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाच्या समाप्तीसाठी निश्चित केलेल्या वेळेच्या ४८ तासा अगोदरच्या कालावधीमध्ये १४४ कलम लागू करण्यात आला आहे.याची नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून या काळात सार्वजनिक सभा आयोजित करता येणार नाहीत व ध्वनिक्षेपकाचा वापर ही करता येणार नाही.तसेच बेकायदेशीरित्या जमा होता येणार नाही.५ पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित जमा होता येणार नाहीत किंवा एकत्रित फिरता येणार नाही,असे स्पष्ट केले आहे.याच बरोबर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात चोख बंदोबस्त करण्यात येत आहे.केंद्रीय राखीव दलाच्या पोलीस पथकांसह ठीकठिकाणी पोलीस पथके बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहेत.निवडणूक केंद्रावरही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
बुथ व्यवस्थापन महत्वाचे
यासोबतच राजकीय पक्षांनी निवडणूक बूथ कुठे उभारावे, बुथवर कशी व्यवस्था असावी,त्या ठिकाणचे बॅनर बैठक व्यवस्था व गर्दीचे व्यवस्थापन या संदर्भातील निर्बंध जारी करण्यात आले आहे.मतदान केंद्राजवळ शस्त्र बाळगणे किंवा शस्त्र प्रदर्शन करणे प्रतिबंधित आहे.
राजकीय नेत्यांच्या उपस्थितीवर निर्बंध
प्रचाराचा कालावधी संपल्यामुळे ४८ तासापूर्वी मतदार संघाबाहेरील राजकीय नेते,कार्यकर्ते यांनी मतदारसंघ सोडावा, असे आवाहन करण्यात आले आहे.प्रचार कालावधी संपल्यामुळे या जिल्ह्याचे,मतदार संघाचे मतदार नसलेले, राजकीय कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते,निवडणुकीतील कार्यकर्ते, मोहिमेचे कार्यकर्ते यांची उपस्थिती प्रतिबंधित करण्यात आली आहे.
मोबाईल वापरावर बंदी
मतदारांसाठी महत्त्वपूर्ण सूचनेद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की,आयोगाने ज्यांना अधिकारी दिले आहे त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिघात,मतदान केंद्रात शेजारील परिसरात आणि मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरण्यास बंदी करण्यात आली आहे.उमेदवार,त्यांचे प्रतिनिधी,पोलिंग एजंट,मतदार तसेच माध्यम प्रतिनिधींनी देखील याची नोंद घ्यावी.कोणालाही मोबाईल घेऊन मतदान केंद्रात प्रवेश नाही,असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
२६ एप्रिल रोजी सार्वजनिक सुटी व बाजार बंद
दि.२६ एप्रिल २०२४ रोजी मतदान होत असून या दिवशी केवळ मतदानासाठी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.ज्या अत्यावश्यक व खाजगी आस्थापना दुकाने,रेस्टॉरंट या काळात सुरु असतील त्या ठिकाणाच्या सर्व व्यवस्थापनांनी कर्मचाऱ्यांना किमान दोन तासाची सुटी द्यावी,असे आदेश कामगार आयुक्तां मार्फत जारी करण्यात आले आहेत.तर जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार शुक्रवार,दि.२६ एप्रिल २०२४ रोजी बंद ठेवण्यात यावेत व ज्या ठिकाणी आठवडी बाजार होते त्या ठिकाणीचे बाजार दुसऱ्या दिवशी घेण्यात यावेत असे आदेशीत करण्यात आले आहे.
४८ तास मद्य विक्रीस बंदी
कायदा सुव्यवस्थेसाठी बुधवार,दि.२४ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता पासून मतदान पूर्ण होईपर्यंत ४८ तास मद्य विक्रीस बंदी घालण्यात आली आहे.
रेडिओ संदेश व बल्क एसएमएस बंदी
४८ तासाच्या शांतता काळामध्ये आकाशवाणी व खाजगी चॅनलवरील निवडणूक विषयीच्या बाबीचे प्रसारण बंद करण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.तसेच मोबाईल वरील बल्क एसएमएस सेवाही या काळात बंद ठेवण्याचे निर्देशित करण्यात आले आहे