Sun. Dec 22nd, 2024

माजी उपसभापती सुरेश बिल्लेवाड यांची शिवसेना नांदेड उपजिल्हा प्रमुखपदी नियुक्ती

Spread the love

भोकर तालुक्यातील ‘रायखोड’ हे छोटेसे गाव दोन्ही शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे झाले आहे केंद्रस्थान

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : पुर्वाश्रमीचे शिवसैनिक तथा भोकर पंचायत समितीचे माजी उपसभापती सुरेश बिल्लेवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत(एकनाथ शिंदे गट) प्रवेश केला होता.त्यांच्या पक्षवाढ कार्याची दखल घेऊन नुकतीच शिवसेनेच्या नांदेड उत्तर उप जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

पुर्वाश्रमी एक कट्टर शिवसैनिक परिचय असलेले भोकर पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश बिल्लेवाड यांनी मुळ शिवसेना फुटीनंतर काँग्रेस पक्षाची जवळीक साधली होती. परंतू त्यांचा मुळपिंड एका शिवसैनिकाचा असल्याने ते त्या पक्षात घरोबा करुन राहू शकले नाहीत व त्यांनी राज्यांचे विद्यमान मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश करुन घरवापसी केली.भोकर तालुका,भोकर विधानसभा मतदार संघ व जिल्ह्यातील शिवसैनिक,शेतकरी आणि व्यापारी यांच्याशी त्यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांनी पक्षवाढीच्या कार्यात अधिक लक्ष घातले आहे.याची दखल वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

त्याच अनुषंगाने हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि शिवसेना सचिव संजयजी मोरे,शिवसेना उपनेते खा.हेमंत पाटील,मराठवाडा विभागीय संपर्क नेते तथा नांदेड व हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख आनंद जाधव,नांदेड सह संपर्क प्रमुख सिद्धार्थ दूधवानकर,नांदेड जिल्हा प्रमुख आनंद बोंडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी उपसभापती सुरेश बिल्लेवाड रायखोडकर याची शिवसेना नांदेड उत्तर उपजिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच उपरोक्त मान्यवरांनी जिल्हा प्रमुख उमेश मुंडे, अर्धापूर तालुका प्रमुख संतोष कपाटे,नांदेड महानगर संघटक शिवराज बोंडारे,युवा सेना नांदेड उपजिल्हा प्रमुख विकास देशमुख,मुंबई स्थित उद्योजक प्रकाश कोणारे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात दिले आहे.यावेळी उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या असून सदरील नियुक्तीचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

भोकर तालुक्यातील ‘रायखोड’ हे छोटेसे गाव दोन्ही शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे झाले आहे केंद्रस्थान
भोकर तालुक्यातील रायखोड हे गाव तसे पाहता खुप लहान असले तरी या गावात अनेक शिवसैनिक कार्यरत आहेत.विशेष बाब म्हणजे शिवसेनेच्या दोन्ही गटातील शिवसैनिक आपापला पक्ष वाढीसाठी अगदी जोमाने ते पक्ष कार्य करतात.याच गावचे तरुण उद्योजक संतोष आलेवाड यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भोकर तालुका प्रमुख पदाची जबाबदारी आहे. शिवसेनेच्या विचाराचा प्रचार-प्रसार करत पक्षवाढीसाठी त्यांचे उल्लेखनीय मोठे परिश्रम सुरु असून त्यांच्या कार्याची दखल दस्तूरखुद माजी मुख्यमंत्री तथा पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली आहे. नुकतीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची व संतोष आलेवाड यांची भेट झाली असून होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारास निवडूण आणण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावेत अशा सुचना यावेळी त्यांनी दिल्या आहेत.तर याचीच नोंद घेऊन आपला पक्ष देखील महायुतीचा उमेदवार निवडूण आणण्यासाठी कुठेही मागे पडू नये म्हणून पक्षनिष्ठ असलेल्या माजी सभापती सुरेश बिल्लेवाड यांच्यावर विद्यमान मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी आता नांदेड उत्तर उपजिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी टाकली आहे.त्यामुळे दोन्ही शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे केंद्रस्थान आता ‘रायखोड’ हे गाव झाले असून कोणता उमेदवार निवडूण आणण्यासाठी कोणत्या शिवसेना गटाचे (पक्षाचे) हे प्रमुख पदाधिकारी बाजी मारणार आहेत ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !