उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या चिदगीरी येथील कालव्यात भोकरचा तरुण वाहून गेला आहे…
अद्याप तरी शोध कार्यास यश आले नसल्याचे समजते…
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : कान्होबा(कृष्णाची) च्या काठी सोबत गेला असलेला भोकर येथील २० वर्षीय तरुण उर्ध्व पैनगंगा इसापूर धरणाच्या चिदगीरी ता.भोकर येथील उजव्या कालव्यात स्नानासाठी दि. २० मार्च रोजी सकाळी गेला असता कालव्यातील उच्च दाबाच्या वाहत्या पाणी प्रवाहात तो वाहून गेला असून त्याचा शोध पोलीस व नागरिक घेत आहेत.परंतू अद्याप तरी त्यास शोधण्यात यश आले नसल्याचे समजते.
भोकर येथील कृष्ण मंदीर गुंफा येथील कान्होबा ची (कृष्णाची) काठी घेऊन काही भक्तांचा समुह तालुक्यातील गाव फेरी करण्यासाठी गेले आहेत.जवळपास १२ गावे फिरुन आलेला हा समुह दि.२० मार्च २०२४ रोजी चिदगीरी ता.भोकर येथे पोहचला होता.गाव फेरी करुन काहीजण तेथील एका घरी ‘ती’ काठी उभी करून थांबले असता त्या भक्त समुहातील गुंफा परिसर भोकर येथील रहिवासी असलेला बालाजी प्रभाकर देशमुख(२०) हा तरुण व अल्पवयीन अन्य एक जण चिदगीरी गावाजवळील उर्ध्व पैनगंगा इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यावर स्नान करण्यासाठी सकाळी १०:०० वाजताच्या दरम्यान गेले होते.यावेळी तो सदरील कालव्याच्या काठावर बांधलेल्या पायऱ्यांवर स्नानासाठी थांबला असता वाहते पाणी पाहून त्या पाण्यात उतरण्याचा मोह त्यास झाला.रब्बी व उन्हाळी पिकांसाठी सोडण्यात आलेल्या त्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहाचा उच्च दाब असल्याचा अंदाज त्यास न आल्याने व चांगल्या प्रकारे पोहता येत नसल्याने त्यास कालव्यात बाहेर निघता आले नाही.तसेच सोबतच्या लहान मुलास ही काही मदत करता आली नाही.त्याने आरडा ओरड केली असता चिदगीरी येथील काही नागरिक धावून आले.परंतू तोपर्यंत थोडा उशीर झाल्याने त्यांच्या हाती तो लागला नाही.
झालेल्या घटनेची माहिती सरपंच प्रतिनिधी प्रविण भाऊ चव्हाण यांनी भोकर पोलीसांना दिली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एन.औटे,सहा.पो.उप.नि.संभाजी देवकांबळे, पोलीस चालक राजेश दुथाडे व अन्य कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी पोहचला व नागरिकांच्या मदतीने त्यांनी शोधकार्य सुरु केले आहे.तसेच त्या कालव्याच्या चिदगीरी ते मेंडका या दरम्यानच्या अंतरावर दोन ठिकाणी जाळे टाकण्यात आले असून पाणी प्रवाहाच्या गतीचा दाब कमी करण्याची विनंती केल्यावरुन संबंधीत पाटबंधारे अभियंता जोशी यांनी पाणी प्रवाहाचा दाब कमी केला आहे.परंतू ती पाणी पातळी कमी किंवा उच्च दाब बंद होण्यासाठी साधारणतः २४ ते ३० तास लागू शकतात असे संबंधितांनी सांगीतले आहे.सकाळ पासून सायंकाळ पर्यंत पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व नागरिकांचे शोधकार्य सुरुच असून अद्यापतरी त्यास शोधण्यात यश आले नसल्याचे समजते.तर चिंतातूर नातेवाईक,मित्र व भक्तगण ही शोधकार्यासाठी तेथे तळ ठोकून असल्याचे समजते.