संमेलनाध्यक्ष डॉ.मारोती कसाब यांचे अध्यक्षीय भाषण
जिंतूर जि.परभणी येथे आज होत आहे १९ वे राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन
अंबुज प्रहार विशेष
‘समता,स्वातंत्र्य आणि न्याय या विचारांचा पुरस्कार करणाऱ्या,” जगा आणि जगू द्या” हे सूत्र साऱ्या जगाला सांगणाऱ्या भारतातील प्राचीन अशा जैन धर्माचा वारसा सांगणाऱ्या जिन – तूर अर्थात जिंतूर या ऐतिहासिक शहरात होत असलेल्या एकोणिसाव्या राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आपण माझा जो सन्मान केला आहे,त्याबद्दल सुरुवातीलाच या साहित्य संमेलनाचे संयोजक माझे मित्र लाल सेनेचे संस्थापक कॉम्रेड गणपत भिसे,त्यांचे सहकारी कॉम्रेड अविनाश मोरे, श्रीकांत मोहिते, अमोल रणखांब आणि सर्व संयोजक मंडळ,संयोजन समितीचे पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते तसेच उपस्थित सर्व रसिक श्रोते यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो.
विचारपिठावर उपस्थित असलेले या संमेलनाचे उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक डॉ.आसाराम लोमटे,लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक विष्णू भाऊ कसबे, आमदार मेघना दीदी बोर्डीकर आणि उपस्थित सर्व पत्रकार,मान्यवर,जमलेल्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो…
गेल्या १८ वर्षांपासून परभणी आणि परिसरात अण्णाभाऊंच्या नावाने विचारांचा आणि साहित्याचा हा महोत्सव सातत्याने संपन्न होत आहे.एखाद्या महामानवाच्या नावाने सातत्याने एवढी वर्ष हा प्रबोधनाचा जागर सुरू असणे ही अत्यंत महत्त्वाची, ऐतिहासिक नोंद घेण्याजोगी घटना आहे.ॲड.एकनाथ आव्हाड,पद्मश्री लक्ष्मण माने,आमदार लहू कानडे,डॉ.मच्छिंद्र सकटे,बा.बा.कोटंबे, काॅ.किशोर ढमाले,सुधीर ढवळे,संजय वरकड,भ.मा.परसवाळे, केशव सखाराम देशमुख,हर्षाली पोतदार,विश्वनाथ तोडकर, बाबुराव गुरव,माधव गादेकर,छाया कोरेगावकर अशा मान्यवर कवी,लेखक आणि विचारवंतांनी या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले आहे,याची मला जाणीव आहे.
येथून जवळच असलेल्या सेलू तालुक्यातील डिग्रस जहागीर या छोट्याशा गावात मी लहानाचा मोठा झालो. येथून जवळच असलेल्या मंठा तालुक्यातील वायाळ पांगरी हे माझ्या आईचं माहेर.दिवाळसणाला आम्हाला न्यायला मामा मुऱ्हाळी होऊन यायचा.लहानपणी मामाच्या खांद्यावर बसून देवगाव फाटा ते वायाळ पांगरी असा कैकदा मी प्रवास केला आहे.गावातील पांढऱ्याशुभ्र मातीने,डोंगरदऱ्यांनी आणि दगड गोट्यांच्या तांबड्या रानांनी मला सांभाळलं आहे.सेलूची बाबासाहेबांची जत्रा, परभणीचा तुरुत पीराचा ऊरूस,जवळ्याच्या जीवाजी बुवाची जत्रा,चारठाणची जत्रा अशा जत्रा खेत्रांनी माझं बालमन संस्कारित केलेलं आहे.
जिथं हे संमेलन आज भरतंय त्या जिंतूर शहरात मी पहिल्यांदा सेलू ते येलदरी असा सायकल प्रवास करून आलो होतो.ते दिवस बाबा आमटे प्रणित ‘भारत जोडो’ चळवळीचे होते.पंजाब आणि आसाम सारख्या भागात फुटीरतावाद्यांनी धुमाकूळ घातलेला होता.त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रीय एकात्मतेची चळवळ महाविद्यालयीन युवकांनी हाती घेतली होती.त्याच चळवळीच्या माध्यमातून आम्ही काही तरुण सेलू ते येलदरी अशी सायकल यात्रा काढली होती.या प्रवासात मी पहिल्यांदा हे शहर पाहिलं होतं आणि जवळच असलेल्या नेमगिरी पर्वतावर जाऊ जैन तीर्थंकर नेमीनाथ यांच्या मूर्तींचे दर्शन ही घेतलं होतं.येलदरी धरण डोळे भरून पाहिलं होतं.
आदिवासी भटके,विमुक्त,वंजारा,बंजारा समूहातील समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या ऐतिहासिक शहरात चौरस्त्यावर अण्णा भाऊंचा प्रचंड पुतळा दिमाखात उभा आहे. ही या भागातील जिवंत चळवळीची निशाणी आहे.क्रांतीसम्राट काय डॉ. बाबासाहेब गोपले यांनी या परिसरात एल.डी.उर्फ लालू महाराज सावळे,हरीभाई कांबळे,नामदेवराव मोरे अधिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या परिसरात सामाजिक क्रांतीची सुरुवात केली होती.
लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या ‘दूर गेलेले घर’ या कादंबरीत हा परिसर स्वच्छ स्वच्छ आलेला आहे.गणेश आवटे,विलास पाटील, अशोक पवार,कवी गुरुवर्य इंद्रजीत भालेराव,केशव बा.वसेकर, सदानंद पुंडगे,शाहीर उमाकांत बंड,शाहीर यमाजी खडसे, कथाकार राम निकम आदी लेखकांनी आणि शाहीरांनी या परिसराला साहित्यातून अजरामर केले आहे.
मित्र हो,
साहित्य हा जगाचा तिसरा डोळा असतो.साहित्यिक हा खऱ्या अर्थाने समाजाला पुढे नेणारा विचारवंतच असतो. तो जनतेच्या कलेकलेने आपला विचार रुजवत असतो.शब्द हेच त्याचे शस्त्र आणि शास्त्र असते.
“आम्हा घरी धन शब्द हेच रत्न शब्द हेच शस्त्र यत्नें करुं।
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन शब्द धन वाटू जन लोकां ।।”
असं तुकारामांनी सांगितले आहे.तेच या कलियुगातल्या तुकारामांचे म्हणजेच अण्णाभाऊंचे ही म्हणणे आहे.
“आपण जे जीवन जगतो,ज्या जीवनात आपला आणि आपल्या कैक पिढ्यांचा जन्म झाला,ज्या जीवनाचा आपण रोज अनुभव घेत आलो आहोत,तेच जीवन जगणारी बहुसंख्यांक जनता,त्या जनतेचे विशाल जीवन,तिची जगण्याची धडपड किंवा संघर्ष आणि त्याच जीवनात वावरणारे उदात्त विचार हे सारे आपल्या लिखाणातून त्या आपल्या जनतेपुढे आपण मांडावे,या आणि अशाच मोहाने प्रेरित होऊन मी आजपर्यंत लिहित आलो आहे.” अशाप्रकारे आपल्या लेखनामागील भूमिका अण्णा भाऊ साठे यांनी ‘वारणेच्या खोऱ्यात’ या आपल्या पहिल्या कादंबरीच्या आरंभी १९४८ साली स्पष्टपणे नोंदविली आहे.
साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांचे जीवन म्हणजे संघर्षाने भरलेली प्रत्यक्ष रणभूमीच होय.’पाण्यामध्ये मासा खेळे । गुरू कोण त्याचा?” असे महात्मा फुले म्हणतात,ते अण्णाभाऊंना तंतोतंत लागू पडते.लेखनाची कोणतीही परंपरा नसताना प्रत्यक्ष अनुभवांना, जीवनालाच त्यांनी गुरू मानले.निसर्गाने दिलेले जीवन भरभरून जगावे नि आपल्या परीने ते सुंदर करावे.आपल्या कृती उक्तीने या जगाला सुंदर आकार द्यावा,आणि जाताना हे जग सुंदर करून जावे,हेच अण्णाभाऊंच्या जीवनाचे तत्त्वज्ञान आहे.
अण्णाभाऊंचे अनुभवविश्व…
१ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊंचा जन्म वाटेगावातील निवडुंगांनी वेढलेल्या ज्या मांगवाड्यात झाला,त्या मांगवाड्यातील मांगांनी छत्रपती शिवरायांच्या खांद्याला खांदा भिडवून स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती.म्हणूनच छत्रपती शिवरायांनी वाटेगावच्या मांगांना शेतजमीनी,घोडे आणि तलवारी भेट दिलेल्या होत्या आणि त्या तलवारी त्यांनी जपून ठेवल्या होत्या.जनतेसाठी लढण्याची हीच परंपरा पुढे फकिरा राणोजी साठे या महापराक्रमी विराने चालवली.दुष्काळात उपाशीपोटी मरणाऱ्या जनतेला वाचविण्यासाठी फकिराने इंग्रजी धान्यसाठा आणि सुरती रुपयांचा खजिना लुटला.जनतेसाठीच फकिराने आपल्या प्राणांची आहुती दिली.याच शौर्यशाली कुळाचा वारसा पुढे अण्णाभाऊंनी चालवला.राणोजी,सावळा,मुरा,घमांडी, फकिराने तलवार चालवली तर अण्णाभाऊंनी व शंकरभाऊंनी लेखणी चालवली एवढाच काय तो फरक.जे करायचे ते जनतेसाठीच हा त्यांचा खाक्या होता.
अण्णाभाऊंचे बालपण खूप मजेत गेले.त्यांचे आजोबा सिद्धोजी साठे यांनी शेजारच्या टाकवे गावात ५४ एकर जमीन कमावून ठेवली होती.ते मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम कंत्राटदार होते.ही शेतजमीन त्यांच्या मृत्यूनंतर गावगुंडांनी जबरदस्तीने हडप केली. त्यानंतर अण्णांचे वडील भाऊराव हे मुंबईत जाऊन काम करू लागले.त्यांनी इंग्रजांच्या आणि इतर युरोपियन लोकांच्या बागा फुलविल्या.झालेली कमाई भाऊराव वाटेगावला पाठवून देत. त्यावर वालुबाई आपल्या चार मुलांचे उत्तमप्रकारे भरण-पोषण करीत.पुढे अण्णांच्या पाठीवर जन्मलेला धाकटा भाऊ शंकर हा अचानक ताप येऊन मरण पावला.तेव्हापासून वालुबाई आणि भाऊराव हे अण्णांची खूप काळजी घेत असत.अण्णांनी कितीही खोड्या केल्या तरीही न रागावता खूप लाड करीत असत.हीच संधी साधून अण्णांनी रानोमाळ भटकंती सुरू केली.लहानपणी अण्णा खूपच खोडकर होते.दऱ्या-खोऱ्यांत मस्त भटकावे, पाखरांचे आवाज काढावेत, गाणी गावीत,निरनिराळे खेळ खेळावेत असा त्यांचा दिनक्रम असे.त्यांच्या अंगात चपळपणा होता.कुस्ती, दांडपट्टा यासारखे खेळ शक्ती आणि युक्तीने ते खेळत असत.त्यांच्या स्वभावात विलक्षण हजरजबाबीपणा आणि मिश्कीलपणा होता.तेवढाच स्वाभिमानी बाणेदारपणाही होता.. आपल्या आज्याची शेती गावगुंडांनी हडपली याचा तीव्र असंतोष त्यांच्या मनात मात्र कायम सलत होता. शिवाय आपण वीर फकिराने दिलेल्या खजिना लुटीची गुटी घेऊनच मोठे झालो याचा त्यांना सार्थ अभिमानही वाटत होता.वाटेगावच्या आपल्या पूर्वजांनी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाचा आणि राणोजीने गावासाठी केलेल्या अपूर्व त्यागाचाही त्यांना हेवा वाटत असे.
एका बाजूला जनतेसाठीच लढण्याची,शौर्याची परंपरा वडिलांकडून त्यांना लाभलेली होती.तर आईचे घराणे महान तमासगिरांचे.कलावंतांचे असल्यामुळे आईकडून कलेचा वारसा अण्णाभाऊंना लाभला होता.अशाप्रकरे कला आणि शौर्य यांचा संयुक्त असा अपूर्व वारसा अण्णाभाऊंना लाभला होता. अण्णाभाऊ हे खऱ्या अर्थाने हाडाचे कलावंत होते.त्यांची बुद्धी अत्यंत तीव्र होती.कोणतेही काम करायचे ठरवले की, केल्याशिवाय ते स्वस्थ बसत नसत.गावात आणि शाळेत आलेल्या जातीभेदाच्या अनुभवांमुळे त्यांचे कोमल हळवे मन कठोर,धाडसी बनले.व्यवस्थेविरुद्ध उठाव करण्याची बंडखोरी त्यांच्या रक्तातच होती. वाटेगाव ते मुंबई या खडतर प्रवासाने अण्णाभाऊंना खूप काही शिकवले. रस्त्यात झाडाचे आंबे तोडले म्हणून बाल अण्णाभाऊंना शेतमालकाचा मार खावा लागला.पुढे वडिलांसोबत गावागावात मोलमजुरी करावी लागली.इंग्रजांनी निर्माण केलेल्या छळ छावण्यांमध्ये अण्णाभाऊंचे कुटुंब वेठबिगार बनले.तिथे अण्णांना कोळशाच्या पाट्या वहाव्या लागल्या. मुंबईजवळील कल्याणच्या त्या छावणीमध्ये पहिल्यांदाच अण्णाभाऊंना कामगार विश्वाचे विराट दर्शन घडले.दारू-गांजा पिणारे,सट्टा खेळणारे,पठाण,मवाली,गुंड,वेश्या याबरोबरच फसवून आणलेली,मजबूर,इंग्रजी सत्तेने गुन्हेगार ठरविलेली, विमुक्त भटकी,मानी-इमानी,आशावादी,कष्टाळू, नीतीमान अशा अनेक प्रवृत्तींची माणसं बाल अण्णाभाऊंनी खाणीतल्या छावणीत पाहिली. त्यांच्यासोबत कामही केले आणि तिथून स्वतःची सही सलामत सुटकाही करून घेतली.
पुढे मुंबईत अण्णांचे अनुभवविश्व अधिकच विस्तार पावले.कपडे विकणाऱ्या मार्तंड नावाच्या आपल्या एका नातेवाईकासोबत कपड्याचा गठ्ठा डोक्यावर घेऊन त्यांनी मुंबई पायाखाली घातली. १९३२ चार तो काळ जागतिक धामधुमीचा होता.भारतात स्वातंत्र्याची चळवळ जोम धरू लागली आणि जगात दुसरे महायुद्ध पेटले होते.एकीकडे जगाचा सर्वनाश होण्याची भीती आणि दुसरीकडे इंग्रजांसारख्या हरामखोर राज्यकर्त्यांचा जागतिक पराभव होण्याची शक्यता आणि त्यामुळे भारतीय जनतेच्या स्वातंत्र्याच्या पालवलेल्या आकांक्षा.दुसऱ्या महायुद्धामुळे सगळे जग एकत्र झाल्याचा आभास निर्माण होण्याच्या काळात अण्णाभाऊंचे भावविश्व मुंबईत उजळून निघत होते.याच काळात अण्णा लिहायला,वाचायला शिकले. रेडिओवरच्या बातम्या ऐकायला शिकले,हिंदी-इंग्रजी मूक चित्रपट पहायला शिकले.दलित-कामगारांच्या चळवळीत लढायला शिकले.याच काळात मुंबईत कामगारांनी मोठा संप घडवून आणला.या संपात अण्णांनी आपली लेखणी आणि वाणी कामगारांसाठी अक्षरशः झिजवली.मोर्चे, सभा,धरणे आंदोलनातून अण्णांचे पोवाडे गाजू लागले.अण्णा कामगार नेते बनले.गिरणी कामगार ते लोकशाहीर,लोकनेता असा प्रवास अण्णांचा झाला. याच काळात अण्णा साम्यवादी विचारसरणीकडे आकृष्ट झाले. माटुंगा लेबर कँपात त्यांनी ‘दलित युवक संघा’ ची स्थापना केली. सिनेमा आणि त्यावर आधारित ‘मौजमजाह’ सारख्या नियतकालिकांच्या वाचनामुळे अण्णांना वाचनाची गोडी लागली. कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात रात्रंदिवस बसून अनेक ग्रंथ त्यांनी वाचून काढले.लिओ टॉलस्टॉय,अन्तान चेकोव्ह आणि मॅक्सिम गोर्की हे अण्णाभाऊंचे आवडते लेखक बनले.विशेषतः मॅक्झिम गोर्की (१८६८-१९३६) या रशियन लेखक – नाटककाराची अनेक पुस्तके अण्णांनी वाचून काढली. त्यांच्यावर गोर्कीच्या जीवनचरित्राचा प्रभाव पडला.’अलेक्झी मॅक्झिमोविच् पेश्कोव्ह’ असे मूळ नाव असलेल्या गोर्कीने अण्णांच्या मनावर अधिराज्य गाजविले.गोर्की हा केवळ लेखक नव्हता; तर रस्त्यावर लढणारा झुंजार कार्यकर्ता लेखक होता.’सर्व बदलांचे मूळ हे संस्कृतीमध्ये असते हे त्याचे मत अण्णांना पटले होते.गोर्कीचा पांढराशुभ्र पुतळा टेबलावर ठेवूनच अण्णाभाऊंनी लिहायला सुरुवात केली. सुरुवातीला पोवाडे लिहून नंतर गोर्कीप्रमाणे कथा-कादंबऱ्या आणि नाटक,लोक नाट्ये,छक्कड,लावण्यांचेही लेखन अण्णाभाऊंनी शेवटचा श्वासापर्यंत केले.
निरीक्षण हेच शिक्षण…
जनतेची बाजू घेऊन लढण्याची परंपरा असल्यामुळे राज्यकर्त्या इंग्रजांनी ज्या जातीला ‘जन्मजात गुन्हेगार’ ठरवले,त्या मांग जातीत जन्म झाल्यामुळे व्यवस्थेने अण्णाभाऊंकडे कायम त्याच नजरेने पाहिले.शेती असूनही भूमिहीन,गाव असूनही बेघर आणि मातृभूमी असूनही परदेशी असं जगणं अण्णाभाऊंच्या वाट्याला आलेलं होतं.भारतातील ‘सर्वहारा’ वर्गाचे ते प्रतिनिधी होते.त्यामुळे व्यक्तिमत्त्व विकासाची काहीच भौतिक साधने-सुविधा नव्हत्या. मात्र निसर्गाने दिलेल्या अफाट निरीक्षणशक्तीच्या बळावर अण्णाभाऊ जागतिक दर्जाचे लेखक-कलावंत बनले.त्यांच्या वाङ्मयाचे अभ्यासक डॉ.बाबुराव गुरव लिहितात,’अण्णाभाऊंकडे काही एक उपजत शक्ती होती.एखादे काम तात्काळ समजून घेण्याची तीव्र तीक्ष्ण,अचूक आणि उपजत बुद्धी त्यांच्याजवळ होती.उत्स्फूर्त,पल्लेदार,परिणामकारी विडंबनयुक्त हास्य, व्यंग्यप्रधान वाक्यरचना ते सहज शीघ्र गतीने करीत.त्यांच्या बोलण्यात सातत्य,तर्कशुद्धता व प्रवाहीपणा असायचा.त्यांची पाठांतरक्षमता दांडगी होती.त्यांच्या आवाजात खरखरीत किनरेपणा असला तरी खेचून घेणारा धारदारपणाही होता. याशिवाय पेटी,तबला,बुलबुलतरंग,सारंगी,ढोलकी,अशी विविध वाद्ये ते चांगले हाताळायचे.तलवारबाजी,कुऱ्हाड,विटा,दांडपट्टा चालविण्यातील त्यांचे चकित करणारे कौशल्य तमाशात रंग भरवायचे.
अण्णाभाऊंनी आपल्या उपजत प्रतिभेला निरीक्षणाची जोड देऊन वास्तववादाचा पुरस्कार करणारे अत्यंत दर्जेदार साहित्य लिहिले.जातीभेद करणारी चार भिंतीची शाळा नाकारून त्यांनी जीवनाच्या विशाल विद्यापीठात स्वतःच प्रवेश घेतला. अण्णाभाऊंच्या डोळ्यांमध्ये विलक्षण चमक होती.त्यांची निरीक्षणशक्ती अफाट होती.अवास्तव साहित्यामुळे समाजाचे मोठे नुकसान झाले.पोथ्या-पुराणांनी अविवेकी समाजमन घडविले.हे जाणून त्यांनी समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजण घालणारे वास्तववादी साहित्य निर्माण केले.या साहित्याला जीवनानुभूतीची आणि कल्पकतेची पार्श्वभूमी होती.जे पाहिले,अनुभवले,तेच अण्णाभाऊंनी लिहिले.’मला कल्पनेचे पंख लावून आकाशात भराऱ्या मारता येत नाहीत.त्याबाबतीत मी स्वतःला बेडूक समजतो.मी जे पाहतो,अनुभवतो,तेच लिहितो,असे ते म्हणतात.
सत्यकथन आणि वास्तवाचा पुरस्कार…
अण्णांनी बालपणी अनेक तमाशे पाहिले होते.त्यांचे आजोबा, मामा,मावसभाऊ हे फार मोठे लोककलावंत होते.या कलावंतांमध्ये राहून अण्णाभाऊंनी स्वतः बालकलाकार म्हणून काम केले होते.शिवाय जातीयतेचे चटके अनुभवले होते. त्यामुळे आयुष्यभर त्यांनी सत्यकथन आणि वास्तवाचा पुरस्कार केला. अण्णांच्या कुऱ्हाड,आणि दांडपट्टा चालविणाऱ्या हातांमध्ये मार्क्स-लेनिन-गोर्की यांच्यामुळे लेखणी आली.मराठीतील ज्ञानेश्वर, एकनाथ,चक्रधर,तुकाराम त्यांनी नंतर वाचले.युरोपियन आणि भारतीय साहित्याच्या आकलनातून त्यांनी स्वतःची वास्तववादी लेखनशैली विकसित केली. ज्या काळात अण्णांनी लेखणी हातात धरली तो काळ वर्ग आणि वर्णव्यवस्थेच्या प्राबल्याचा होता. ‘बामणा घरीच लिवणं होतं आणि मांगा महारांच्या घरी फक्त गाणं होतं मात्र अण्णाभाऊंनी हे बदलून ‘मांगा महाराघरी लिवणं सुरू केलं.तेव्हा अनेकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.अण्णांच्या लेखणीला प्रचंड विरोधही झाला.त्यांच्या लेखनावरील आरोपांना उत्तर देताना ते ‘युगांतर’ मध्ये लिहितात,’मला जे सत्य वाटतं,जे माझ्या ध्येयाशी जुळतं ते मी लिहितो.मी आणि माझा पिंड मुंबईच्या झुंजार कामगार वर्गाने घडवला आहे.साचा सोडून मी साहित्याकडे वळलो आहे.जनतेच्या विराट आंदोलनात शिरून तिचा सर्वव्यापी संघर्ष मी अगदी जवळून पाहिला आहे.मुंबईच्या कामगार वर्गात जन्म घेऊन त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याचे,एका फळीत उभे राहण्याचे थोर भाग्य मला लाभले आहे.त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो आणि हवं ते लिहितो. आता लिहिणं हा माझा धर्म आहे नि तेच माझं कर्मही झालं आहे.
ज्या काळात साहित्य हे पैसा,प्रसिद्धी आणि रंजनासाठीच लिहिले जात होते.त्या काळात अण्णाभाऊ सत्य शोधून ते जनतेपुढे मांडण्यासाठी लिहितात,लेखन आपला धर्म नि तेच आपले कर्म समजून लिहितात,ही बाब मला फार महत्त्वाची वाटते.कारण अण्णाभाऊंच्या वाटेवरूनच पुढे अनेक दलित-भटके आदिवासी साहित्यिकांनी मानवमुक्तीसाठी एल्गार पुकारला. अण्णा भाऊ साठे हे मानवमुक्तीसाठीच्या साहित्यप्रवाहाचे उद्गाते ठरले.पुढे अण्णाभाऊंचा हाच सत्यकथनाचा आणि वास्तवदर्शनाचा मार्ग राजमार्ग अखिल भारतीय पातळीवरील बनला.
जनतेच्या संघर्षावर विश्वास…
अण्णाभाऊंचा पिंडच मूळी चळवळीतून तयार झाला होता. फकिराने गरीबीविरुद्ध आणि सर्वकष शोषणाविरुद्ध केलेल्या संघर्षाच्या कथा ऐकून त्यांचे बालपण भारावले होते.पाय खोरून, निपचित पडून सडून मारण्यापेक्षा लढून मेलेले कधीही चांगले’ हे तत्त्वज्ञान त्यांच्या मनात पक्के रूजले होते.चांगल्यासाठी. मांगल्यासाठी संघर्ष असेल आणि तो जनतेने एकत्र येऊन केलेला असेल तर त्याला यश येतेच,हा अण्णाभाऊंचा दावा होता.’होणार विजयी,जे रण करती’ असा त्यांचा प्रचंड आत्मविश्वास होता. लहानपणी फकिराची आणि सत्याबाची शौर्यगाथा अण्णांनी ऐकली,त्यानंतर प्रत्यक्ष क्रांतिसिंह नाना पाटलांबरोबर भूमीगत होऊन अण्णाभाऊंनी स्वातंत्र्याचा लढा लढविला.मुंबईत कामगारांच्या खांद्याला खांदा लावून कामगार चळवळ केली.पुढे संयुक्त महाराष्ट्रासाठी आपली वाणी आणि लेखणी घेऊन जीवाचे रान केले,कारावास भोगला आणि स्वातंत्र्यानंतर… ‘यह आजादी झुठी है,देश की जनता भूखी है’ चा नारा देत दुसऱ्या स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले.अशाप्रकारे अन्याय-जोर जुलुमाविरुद्ध प्रखर संघर्ष केला.रशियातल्या झारची हजारो वर्षांची सत्ता जनतेने उलथवून टाकली,मग इतरांची काय कथा? हे त्यांनी अनुभवले होते.जनता एकत्र आली तर तिचा विजय कुणीही रोखू शकत नाही,हे मार्क्सचे विचार अण्णाभाऊंना पटलेले होते.’जगातील कामगारांनो एकत्र या,तुमच्याजवळ हारण्यासारखे काहीही नाही.तुमच्या पायातील गुलामीच्या साखळ्या मात्र खळाखळा तुटल्याशिवाय राहणार नाही’ हा मार्क्सने दिलेला विश्वास अण्णाभाऊंनी खरा करून दाखविला.
दृष्टी असावी तर अण्णाभाऊंसारखी…
निसर्गाने दिलेल्या शक्तीप्रमाणे आपापल्या कुवतीप्रमाणे आपण आसपासचा परिसर उघड्या डोळ्यांनी पहात असतो.सामान्य माणूस आपल्या डोळ्यांनी दिसते, तेवढेच पाहतो; मात्र अण्णाभाऊंसारखी असामान्य माणसं आपल्या प्रतिभेच्या बळावर जगाला आपल्या नजरेच्या टप्प्यात सामावून घेत असतात. अण्णाभाऊंनी आपला लेखनगुरू मानला तो रशियातला थोर कार्यकर्ता लेखक मॅक्झिम गोर्की.त्यांनी तत्त्वज्ञान मानले ते मार्क्स लेनीनचे आणि मोठेपणा गायला तो छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा.महानुभव साहित्याचे प्रवर्तक म.चक्रधर,संस्कृतमधून गीतेचे तत्त्वज्ञान मराठीत आणणारे ज्ञानेश्वर,मध्ययुगात महाराचे पोर कडेवर घेणारे संत एकनाथ आणि बहुजनांचा आवाज बुलंद करणारे संत तुकाराम हे त्यांना आपले वाटले.
अण्णाभाऊंनी सतत जगाचा विचार केला.पृथ्वीचा विचार केला.’हे जग ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नाही; तर दलितांच्या तळहातावर तरली आहे’ असा त्रिकालसत्य ठरलेला सिद्धांत अण्णाभाऊंनी मांडला.रशियाला जाण्याआधीच अण्णाभाऊंनी ‘नानकीन नगरापुढे’ (१९४२),’स्टॅलिनग्राडचा पोवाडा’ (१९४२), ‘बर्लिनचा पोवाडा (१९४२) असे आंतराष्ट्रीय प्रश्न चव्हाट्यावर मांडणारे पोवाडे लिहिले.अण्णाभाऊंनी ‘बंगालची हाक (१९४४),पंजाब-दिल्लीचा दंगा (१९४७). तेलंगणाचा संग्राम’ (१९४७) इत्यादी पोवाडे लिहून आपली प्रतिभा राष्ट्रीय पल्ल्याची असल्याचे दाखवून दिले.भलेही अण्णाभाऊंनी महाराष्ट्रावर जीवापाड प्रेम केले असले तरी अण्णाभाऊंनी जगावरही तेवढेच प्रेम केले. जगातल्या विविध २७ भाषांमधून अण्णाभाऊंचे साहित्य अनुवादित झाले असून,मराठीचा झेंडा सातासमुद्रापार फडकाविणारे अण्णाभाऊ हे खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्यिक ठरतात,ते त्यांच्या विशाल व्यापक मानवतावादी दृष्टिकोनामुळे. अण्णाभाऊंच्या समग्र साहित्यातून त्यांचा हा विशाल मानवतावादी दृष्टिकोन दिसून येतो.
माणूस आणि त्याच्यातल्या माणुसकीवर निष्ठा…
अण्णाभाऊ लिहितात,’मला माणसं फार आवडतात. ती जगतात नि जगाला जगवतात.त्यांना विद्रुप करणं मला जमत नाही.माझ्या महान जनतेचा उपमर्द होऊ नये याची काळजी घेऊन मी लिहितो. जनतेच्या संघर्षावर माझा संपूर्ण भरवसा आहे.कारण ती जनता अमर आहे नि तिचा ध्वज अजय आहे.’मनोविश्लेषणाच्या नावाखाली माणसाला विकृत करणाऱ्या समकालीन मराठी लेखकरावांनाही अण्णाभाऊंनी फटकारले आहे.ज्यांना फक्त माणसातील वैफल्य आणि विकृतीच दिसते, ते लेखक जनतेची सुंदर मूर्ती बिघडवित असतात. माणसाची निंदा करणारे,जनतेचे विकृत आणि विद्रुप चित्रण करणारे हे लेखक मनोविश्लेषणवादाची रापी घेऊन माणसांची कातडी सोलू लागले आहेत.म्हणून आम्ही दलितांचे वेगळे संमेलन भरविले आहे,अशी भूमिका पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी २ मार्च १९५८ रोजी अण्णाभाऊंनी मुंबईत मांडली होती.
दलित साहित्याची प्रभावी सुरुवात अण्णाभाऊंनी केली असली तरी अण्णाभाऊंची ‘दलित’ ही संकल्पना वेगळी आहे,विशाल आहे.फक्त महार-मांग आणि ढोर चांभारच नव्हे तर जे जे या व्यवस्थेने पिळले,दळले आणि छळले असे सर्व शोषित म्हणजे दलित अशी अण्णाभाऊंची धारणा आहे ते म्हणतात,’दलितातही सर्व भावना इतरांप्रमाणे सदैव जागृत असतात.पण तो इतरांपेक्षा जरा निराळा असतो.कारण तो केवळ हाडामांसाचा गोळा नसतो. तो निर्मितीक्षम असतो.तो वास्तव जगात कष्टाचे सागर उपसून दौलतीचे डोंगर रचतो.एका झाडाखाली तीन दगडांची चूल करून मडक्यात अन्न शिजवून दोन मुलं नि बायको यांना जगविणारा हा दलित वरवर कंगाल दिसत असला तरी त्याची संसार करण्याची इच्छा केव्हाही पवित्र असते. अशा या दलिताचे जीवन खडकातून झिरपणाऱ्या पाझराप्रमाणे असते.ते जवळ जाऊन पहा आणि मग लिहा.’
एकोनपन्नास वर्षांच्या आपल्या छोट्याशा आयुष्यात अण्णाभाऊंनी अनेक भूमिका केल्या.बालपणी मस्त कलंदर बनून निसर्गाची विविध रूपं बघितली.नाटकं, तमाशे पाहिले आणि त्यांचे उत्कृष्ट सादरीकरणही केले. कोवळ्या वयात वाटेगाव ते मुंबई असा प्रदीर्घ पायी प्रवास करून माणसांची नानाविध रूपं पाहिली.जिवाची मुंबई केली.आंतरराष्ट्रीय जीवनाचा अभ्यास करून पुन्हा गाव गाठले आणि १९४२ च्या स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला. १९४४ पासून अमरशेख, गवाणकरांसोबत अख्खा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्रासाठी आणि समाजवादी क्रांतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पायाखाली घातला. समाजसत्तावादी प्रिय रशिया पाहिला आणि आपला प्रचंड लेखनसंसार उभा केला. अण्णाभाऊंनी १६ तमाशे, १ नाटक,१३ कथासंग्रह,३५ कादंबऱ्या १० पोवाडे,१ पटकथा.१प्रवासवर्णन आणि अनेक लावण्या, छक्कड़,लोकगीतं लिहिली,युगांतर मधून,पत्रकारिता केली. ‘फकिरा’ या चित्रपटाची निर्मिती केली आणि त्यात स्वतः अभिनेता म्हणून भूमिकाही वठविली.वास्तववादी भूमिकेतून समाजाचे प्रबोधन करणारे,सामान्य माणसालाही लढण्यासाठी प्रेरीत करणारे जीवनवादी साहित्य लिहिले.या सर्व साहित्याचा केंद्रबिंदू हा माणूस आणि त्याचे संघर्षमय जीवन हाच होता.मानवी जीवनातील अमंगलाला छाटून,जीवन सुंदर करण्याची स्वप्नं पहातच अण्णाभाऊ लिहित राहिले.ते म्हणतात, ‘नाशिकात गंगाही आणि गटारगंगाही आहे.मला गंगेसारखे निर्मळ साहित्य निर्माण करायला आवडते. अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून माणसाची अनेक रूपं रंगविली पण त्याला विद्रुप केले नाही. खलनायकी प्रवृत्तीचीही अखेर माणसं असतात,हेच अण्णाभाऊंनी दाखवले आहे.हिंसा,द्वेष,तिरस्काराने नव्हे तर प्रेमानेच जग जिंकता येते,हा विश्वास अण्णाभाऊंच्या साहित्याचा मूळ गाभा आहे.’मला लढा मान्य आहे,रडगाणे अन् आक्रोश नाही’ असे तत्त्वज्ञान अण्णाभाऊंनी मांडले आहे.
जग बदलण्याचे तत्त्वज्ञान…
अण्णाभाऊंच्या साहित्याचे तत्त्वज्ञान हे जग बदलण्याचे तत्त्वज्ञान आहे.त्यांनी वर्गाविरुद्ध लढा दिला; त्याचबरोबर भेदभाव करणाऱ्या लिंगभाव आणि वर्णाविरुद्धही एल्गार पुकारला.कार्ल मार्क्स आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची सांगड घालून अण्णाभाऊंनी नवा मानवतावाद’ मांडला.कुणी त्याला वास्तववाद म्हणेल; पण हाच खऱ्या अर्थाने साहित्यातील ‘अण्णा भाऊ साठेवाद’ होय.
अनुभूतीला सहानुभूतीची जोड देऊन केलेले लेखन म्हणजे अण्णा भाऊ साठेवादी लेखन होय.लेखनातून समाज बदलू शकतो.माणसाचे शोषण बंद होऊ शकते. हा अण्णाभाऊंचा ठाम विश्वास होता.आपण आपल्या माणसांच्या उद्धारासाठी झटावे, त्यांना गुलामीच्या, गरीबीच्या,अज्ञानाच्या आणि वैफल्याच्या गर्तेतून बाहेर काढावे आणि तू गुलाम नाहीस तर या वास्तव जगाचा निर्माता आहेस,हे त्याला पटवून द्यावं यासाठीच अण्णाभाऊ गात होते.लिहित होते.प्रत्यक्षात रस्त्यावर लढत होते.जात-वर्ग-लिंगभेद विरहित समपातळीवर आनंदाने जगणारा माणूस त्यांना पहायचा होता. माणसातल्या सृजनशक्तीवर त्यांचा दांडगा विश्वास होता. ‘वैफल्य म्हणजे तलवारीवर बसलेली धूळ असते आणि ती धूळ झटकून तलवार लखलखीत करता येते,’ असे अण्णाभाऊ सांगतात.‘दोन पैशांचा गांजा ओढला की, लागेल तेवढी कल्पकता सुचते; पण मला तसली कल्पकता नको आहे. पाहिल्याशिवाय, अनुभवल्याशिवाय मी लिहित नसतो,असे ते टिकाकारांना ठणकावून सांगतात.
ज्या जनतेसाठी अण्णाभाऊ लिहित होते,त्याच जनतेत ते राहात होते,हे त्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. लोकांमध्ये राहूनच त्यांचा उद्धार करता येतो,अशी त्यांची धारणा होती.’खरी कला झोपडीतच राहते,महालात तर ढेकणं वास करतात,असे त्यांचे तत्त्वज्ञान होते.म्हणून अखेरपर्यंत ते जनतेत आणि जनतेबरोबरच राहिले. अनेक प्रलोभने आली पण त्यांनी आपले तत्त्वज्ञान बदलले नाही.जनतेची साथ सोडली नाही.आयुष्यात अण्णाभाऊंना साहित्याने खूप काही दिले.जगात त्यांचे अनेक चाहते होते.त्यांची पात्रं जगात पोहचली. अण्णाभाऊंच्या साहित्याची जगाने दखल घेतली मात्र जातीने अण्णाभाऊंना मारले.या देशालाएक ‘मांग माणूस’ मोठा झालेला पाहवले नाही.अण्णांच्या मित्रांनीच शेवटी त्यांना दगा दिला.’फकिरा’ हा चित्रपट अण्णांनी तयार केला मात्र अण्णाभाऊंच्या मित्रांनीच त्यांना आर्थिक दिवाळखोरीत लोटले. पहिली पत्नी आधीच गावी गेली होती.नंतर जयवंताबाई ही दुसरी पत्नीही अण्णांना सोडून दुसरीकडे राहायला गेली तेव्हा अण्णांचे धाकटे भाऊ शंकरभाऊंनी अण्णांना गावी चालण्याची विनंती केली.त्यावर अण्णा म्हणाले,’माझ्या गोर्कीने हे केव्हाच सांगितले आहे की,जो कलावंत जनतेकडे पाठ फिरवितो.त्याच्याकडे जनता पाठ फिरविते.म्हणून मी माझ्या जनतेकडे कधीच पाठ फिरवणार नाही.मी मेलो तरी माझी जागा सोडणार नाही.
अनेक वादळे आली आणि गेली मात्र अण्णाभाऊंनी अखेरपर्यंत आपल्या माणसांची साथ सोडली नाही. आपल्याच माणसांनी केलेल्या दगाबाजीमुळे अण्णा खचले.खूप आजारी पडले.या निराशेच्या गर्तेतूनही लवकरच बाहेर पडले.आजारातून उठल्यावर त्यांनी स्वराज्याचे पहिले सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित ‘अग्निदिव्य’ ही ऐतिहासिक कादंबरी लिहिली.आयुष्याच्या अखेरपर्यंत ते जनतेसाठी लिहित राहिले. ‘वैर’ या कादंबरीच्या प्रस्तावनेत अण्णाभाऊंनी लिहिले आहे,मला वाटते,आपण सतत लिहित राहावं,जुन्या चालीरीती दूर कराव्या आणि जुन्या; पण लोप पावलेल्या प्रगत प्रथांना पुन्हा पुढं आणावं. हेवेदावे,दुष्टावे,वैर यांचा घोर परिणाम दाखवावा आणि या नवमहाराष्ट्रात प्रेम,सलोखा यांची वाढ व्हावी, जनता सुखी,संपन्न व्हावी आणि महाराष्ट्र राज्यात विषमता नष्ट झालेली नि समाजसत्तावादाचा अरुणोदय झालेला पाहावा,अशी दृढ श्रद्धा हृदयात घेऊन मी लिहित असतो.”
शेवटी ज्या जनतेसाठी आपण सर्व काही केले,त्या जनतेमधील आपल्या माणसांनी आपणास धोका द्यावा, ही गोष्ट अण्णाभाऊं सारख्या संवेदनशील माणसाच्या जिव्हारी लागली आणि त्यातच अण्णांनी आपला अंत ओढवून घेतला.‘मृत्यूकडून जीवनाकडे’ हे त्यांचे आत्मचरित्र लेखन अर्ध्यावर सोडून १८ जुलै १९६९ रोजी अण्णा आपल्यातून निघून गेले.मात्र शरीराने जरी ते गेले असले तरी विचारांच्या रुपाने अण्णाभाऊ अजरामर आहेत,यात शंकाच नाही.मानवतावादाचे,वास्तववादाचे आणि समतेचे जे तत्त्वज्ञान अण्णाभाऊंनी साहित्यातून पेरले,ते पुढील हजारो पिढ्यांना संघर्षाचे बळ देत राहील एवढे मात्र नक्की.
लेखक कसा असावा तर अण्णाभाऊंसारखा. आख्खं आयुष्य आपल्या जनतेसाठी पणाला लावणारा. अण्णाभाऊंविषयी विचार करताना मला तरुण राजपुत्र सिद्धार्थ आठवला.ज्याप्रमाणे सिद्धार्थाने आपली सुंदर पत्नी यशोधरा,नुकताच जन्मलेला बाळ राहूल आणि माता-पित्यांसह आपल्या राजवाड्याचा आणि नगराचा त्याग केला,अगदी तसाच त्याग अण्णाभाऊंनीही केला. सुंदर तरुण पत्नी,मुलगा,आई आणि घराचा,गावाचा त्याग करून अण्णा मुंबईला निघाले.माणसाच्या दुःखांवर उपाय शोधण्यासाठी त्यांनी जग पालथे घातले. त्यांनी जनतेसाठीच जीवन जगले, आयुष्यभर लिहिले, गायले आणि जग त्यागलेही.एक लेखक म्हणून ते जनतेच्या बरोबर राहिले,जनतेच्या लढ्यात अग्रभागी राहून लढले. जनतेचा विजय हेच त्यांचे स्वप्न होते.त्या स्वप्नांची पूर्तता करणे बाकी आहे.
मित्र हो,अशा या अघोषित आणीबाणीच्या, ब्राह्मो- भांडवली हुकुमशाहीच्या काळात अण्णाभाऊंच्या विचारांची सार्थकता कित्येक पटीने वाढली आहे.अण्णाभाऊंचे अनुयायी म्हणवून घेत असताना अण्णाभाऊंचा हा विचार समाजातल्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचविण्यात आपण कुठे कमी पडलो याचे चिंतन करण्याची वेळ आलेली आहे. अण्णा भाऊ साठे हा या युगाचा महानायक आहे.अण्णाभाऊंचा राजकीय विचार हा मार्क्सवादी आहे,तर सामाजिक विचार हा फुले-शाहू- आंबेडकरवादी आहे. लोकनाट्य,लावणी,कटाव,छक्कड आदी लोककलांच्या माध्यमातून समग्र क्रांतीचा विचार अण्णाभाऊंनी पेरला आहे.वर्ग आणि जात – धर्म यांच्या कचाट्यातून सर्व सामान्य माणसाला सोडविण्याचा, त्याला मुक्त करण्याचा विचार अण्णाभाऊंनी आपल्या कथा-कादंबरी आदी साहित्यातून मांडला आहे.अशा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपण हा विचार सर्वदूर पोहचवण्यासाठी प्रयत्न करुया.तरच काॅ.गणपत भिसे यांनी आणि त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे चीज होईल.
धन्यवाद.
जय लहुजी !
जय भीम !!
लाल सलाम..!!!
डॉ.मारोती कसाब,संमेलनाध्यक्ष
संदर्भ
(१)साठे अण्णा भाऊ, ‘वारणेच्या खोऱ्यात, विद्यार्थी पब्लिकेशन्स, १९०, शुक्रवार पेठ, पुणे २, नवीन आवृत्ती २००९, आरंभीचे दोन शब्द
२) www.wikipedia.com/maximgorkey / मुंबई- २५. पृ. १७
३)गुरव डॉ. बाबुराव, अण्णा भाऊ साठे, लोकवाङ्मय गृह, भूपेश गुप्ता भवन, ८५, सयानी रोड, प्रभादेवी प्रतिष्ठान, ६३५ सी रेड फ्लॅग बिल्डींग, बिंदू चौक, कोल्हापूर- ४१६००२, प्र.आ. ७ मे २०११, पृ.३३
(४)चौसाळकर अशोक, शिंदे रणधीर (संपा.) युगांतर मधील अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, श्रमिक
(५)डांगळे अर्जुन व इतर (संपा.) अण्णा भाऊ साठे निवडक वाङ्मय, म.रा. साहित्य व संस्कृती मंडळ,
मुंबई, प्र. आ. १ ऑगस्ट १९९८, पृ. १९७६
६)साठे शंकर भाऊ, ‘माझा भाऊ अण्णा भाऊ’, विद्यार्थी प्रकाशन, १७८/ब, पर्वती, पुणे-९ आवृत्ती दुसरी १९८४, पृ. १९४
७)साठे अण्णा भाऊ, ‘वैर, सुरेश एजन्सी, २०५, शुक्रवार पेठ,पुणे-४११००२, सातवी आवृत्ती ऑगस्ट २००२, पृ. प्रस्तावना.