मेंढ्या चोर चौघांना भोकर पोलीसांनी केली अटक…
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : गुजरातच्या मेंढपाळांच्या ५ मेंढ्या दि.१० सप्टेंबर रोजी चोरुन नेणाऱ्या तिघांना मेंढपाळांनी पकडून भोकर पोलीसांच्या स्वाधीन कले आहे.तर पसार झालेल्या अन्य एकास पोलीसांनी अटक केली असून या ४ चोरट्यांविरुद्ध दि.११ सप्टेंबर रोजी भोकर पोलीसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिवर्षी गुजरातचे मेंढपाळ हे आपल्या चारण्यासाठी घेऊन महाराष्ट्रात येत असतात.अशाच मेंढपाळांनी डोरली ता. भोकर येथील डोंगर माथ्यावर आपल्या मेंढ्यांचा कळप चारण्यासाठी नेला असता दि.१० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:०० वाजताच्या दरम्यान दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्या मेंढ्यांचा कळपातील जवळपास ४१ हजार रुपये किमतीच्या ५ मेंढ्या मोठ्या शिताफीने चोरल्या.ही बाब मेंढपाळांच्या लक्षात येताच त्यांनी त्या चोरट्यांचा पाठलाग केला व एम.एच.२६ बी.वाय. ०८६५ क्रमांकाच्या दुचाकीवरुन आलेल्या एका चोरट्यास काळ्या पांढऱ्या रंगाच्या १० हजार रुपये किमतीच्या एका मेंढीसह(मादा) पकडले.तर उर्वरित चोरांचा शोध घेणे मेंढपाळांनी सुरुच ठेवले असता रात्री ११:०० वाजताच्या दरम्यान डोरली डोंगर परिसरातील एका नाल्याजवळ दबा धरुन बसलेले २ चोरटे त्यांना मिळून आले.त्या दोघांना देखील त्यांनी पकडले,परंतू एक चोरटा ४ मेंढ्या चोरुन पसार होण्यात यशस्वी झाला.
५ मेंढ्या चोरल्याची व त्या मेंढ्या चोरणा-या ३ चोरट्यांना पकडून ठेवल्याची माहिती दि.११ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी त्या मेंढपाळांनी भोकर पोलीसांना दिली.तसेच पकडून ठेवलेल्या ३ चोरट्यांना त्यांनी पोलीसांच्या स्वाधीन केले.त्या तिघांना भोकर पोलीस ठाण्यात आणले व चौकशी केली असता त्यांची नावे अंकुश उत्तम जाधव,किरण उत्तम जाधव,सचिन पंडीत चव्हाण व पवन केवळा राठोड सर्वजण राहणार लोहा ता.हदगाव येथील असल्याचे समोर आले. यानंतर बद्दा नाथा रबारी(५५) व्यवसाय मेंडपाळ,रा.बहादुरी ता.अंजाळा जि.कच्चभुज,गुजरात राज्य यांनी रितसर फिर्याद दिल्यावरुन उपरोक्त चौघांविरुद्ध दि.११ सप्टेंबर २०२२ रोजी मेंढ्या चोरल्या प्रकरणी गुरनं.३५४/२०२२ कलम ३७९,३४ भादवि प्रमाणे सहा.पो.नि.रसूल तांबोळी यांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.तसेच या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो.उप.नि. संभाजी हनवते हे करत असून त्यांनी पसार झालेल्या पवन केवळा राठोड यास दि.११ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी पकडले आहे.परंतू त्या ४ मेंढ्या मात्र त्याच्याकडून मिळाल्या नसल्याचे समजते.