भोकरचा ‘शाहरुख’ निघाला चोरीच्या दुचाकींचा ‘सौदागर’
चोरलेल्या २३ दुचाकी ताब्यात घेण्यात भोकर पोलीसांना आले यश ; तर दुचाकी चोर टोळीचा म्होरक्या ‘सौदागर’ यासह अन्य तिघांना मिळाली दोन दिवसांची पोलीस कोठडी
‘त्या’ चोरट्यांकडून दुचाकी घेणाऱ्यांनों…स्वतः होऊन त्या दुचाकी तात्काळ पोलीसाकडे जमा करा,अन्यथा आपणावर ही कारवाई होईल-पो.नि. विकास पाटील
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : धर्माबाद पोलीसांनी चोरीची दुचाकी पकडली असता एक खळबळजनक माहिती उघडकीस आली असून दुचाकी चोरट्यांच्या एका टोळीचा म्होरक्या ‘शहारुख’ हा भोकर येथील काँग्रेसचा तथाकथित कार्यकर्ता व चोरीच्या दुचाकींचा ‘सौदागर’ निघाला आहे.भोकर व धर्माबाद पोलीसांनी दि.२६ डिसेंबर २०२२ च्या मध्यरात्री पर्यंत राजकीय मुखवटा परिधान केलेल्या ‘त्या’ दुचाकी चोरट्यासह अन्य चौघांना आणि विविध ठिकाणी विक्री केलेल्या चोरीच्या २७ दुचाकी ताब्यात घेतल्या असून त्या ‘सौदागर’ सह अन्य तिघांना दि.२७ डिसेंबर २०२२ रोजी हदगाव न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.हे दोन दिवस पोलीस तपासकामी उपयोगी ठरणार असून सदरील दुचाकी चोर टोळी कडून अजून बऱ्याच चोरीच्या दुचाकी मिळण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे.
धर्माबाद पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते व पोलीस कर्मचारी हे दि.२४ डिसेंबर २०२२ रोजी धर्माबाद शहरात वाहन तपासणी करीत असतांना क्रमांक फलक नसलेली स्प्लेंडर दुचाकी घेऊन फिरताना एक संशयीत त्यांना आढळला.यावेळी त्याची कसून चौकशी केली असता एक खळबळजनक माहिती उघडकीस आली असून त्याने ती दुचाकी ज्यांच्याकडून विकत घेतली त्यातील एकजण भोकर विधानसभा युवक काँग्रेस पक्षाचा माजी सरचिटणीस तथाकथित कार्यकर्ता असल्याचे नाव समोर आले आहे.फारुख नासेर पठाण(३१)रा. रशिद टेकडी भोकर,शाहरुख युसुफ सौदागर,रा.सईद नगर,भोकर आणि शेख शफी रा.भोकर असे त्या दुचाकी विक्रेत्या तिघांचे नावे आहेत.यावरुन धर्माबाद पोलीस ठाण्याचे पो.नि. संजय हिबारे यांनी सहा.पो.नि.शिवप्रसाद कत्ते व पोलीस कर्मचाऱ्यांचे एक पथक दि.२५ डिसेंबर २०२२ रोजी भोकर येथे पाठविले व भोकर येथील पो.कॉ.सुनील सांभाळकर आणि सायबर सेलचे जमादार राजेंद्र सिटीकर यांच्या मदतीने त्यांनी भोकर येथील शाहरुख सौदागर व फारूक पठाण या दोघांना ताब्यात घेतले.धर्माबाद येथे नेऊन या दोघांची चौकशी केली असता धर्माबाद आणि इतर पोलीस ठाण्याच्या कर्यक्षेत्रात चोरीच्या दुचाकींचा कमी किमतीत सौदा करुन ‘सौदागर’ ने त्या दुचाकी विक्री केल्याची माहिती त्यांना मिळाली आहे.या माहितीवरुन धर्माबाद पोलीसांनी त्यांच्याकडून चोरीच्या ९ दुचाकी ताब्यात घेतल्या.त्यात भोकर पोलीस ठाणे कार्यक्षेत्र व परिसरातील गावांतील ५ दुचाकींचा समावेश असून त्या दुचाकी भोकर पोलीसांच्या ताब्यात आहेत.
भोकर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातून नोव्हेंबर २०२२ पर्यंत जवळपास ३० दुचाकी चोरी गेल्याची पोलीसांत नोंद झालेली असल्याने पुढील अधिक तपासासाठी भोकर पोलीसांनी त्या दोघांना धर्माबाद पोलीसांकडून ताब्यात घेतले व पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासचक्र गतीमान केले असता या दुचाकी चोर टोळीतील अन्य तिघे भोकर पोलीसांच्या हाती लागले आहेत.भोकर पोलीसांनी दुचाकी चोरी टोळीतील म्होरक्या तथाकथित काँग्रेस कार्यकर्ता ‘शाहरुख’ तथा चोरीच्या दुचाकींचा ‘सौदागर’ व त्याच्या त्या ४ साथीदारांना चौकशी दरम्यान पोलीसांनी ‘खाक्या’ दाखविताच त्यांचा पोपट झाला आणि त्यांनी चोरुन विक्री केलेल्या दुचाकींची माहिती पटापट सांगितली. सदरदील चोरटे हे ‘मास्टर चावीने व हॅन्डल लॉक’ तोडून दुचाकी चोरायचे आणि त्या दुचाकी फायनान्स कंपनीने जप्त केलेल्या आहेत,असे सांगून कमी किमतीत विकायचे.अशी माहिती चौकशी दरम्यान प्राप्त झाली.यावरुन पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.अनिल कांबळे,पो.उप.नि.दिगंबर पाटील,पो.उप.नि.राम कराड, महिला पो.उप.नि.राणी भोंडवे, सहा.पो.उप.नि.दिलीप जाधव,संभाजी हनवते,जमादार बालाजी लक्षटवार,संजय पांढरे,भीमराव जाधव,चालक जमादार राजेश धुथाडे,पो.कॉ.ज्ञानेश्वर सरोदे,सोनाजी कानगुले,नामदेव शिरोळे, मंगेश पाटील यांसह आदी पोलीस कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे पथक तयार करण्यात आली व त्या दुचाकीचे शोधचक्र गतीमान करण्यात आले.सदरील पोलीस पथकांना भोकर,हिमायतनगर, धर्माबाद तालुका परिसरात व तेलंगणा राज्यातील निर्मल, निजामाबाद परिसरातून विक्री केलेल्या चोरीच्या काही दुचाकी ताब्यात घेण्यात यश आले.अतिशय जलदगतीने शोधचक्र गतीमान करुन परिश्रम घेत दि.२६ डिसेंबर २०२२ रोजी मध्यरात्री पर्यंत पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या दुचाकींची संख्या जवळपास २७ झाली असून त्यात भोकर पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या १८ दुचाकींचा समावेश आहे.भोकर पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या चोरीच्या दुचाकींचा ‘सौदागर’ सह अन्य तिघांना दि.२७ डिसेंबर २०२२ रोजी हदगाव न्यायालयात हजर करण्यात आले असता मा. न्यायाधीशांनी त्या सर्वांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.तर हे दोन दिवस तपास कामी उपयोगी ठरणार असून भोकर पोलीसांचे तपास व शोधचक्र सुरुच असल्यामुळे विविध ठिकाणी विक्री केलेल्या चोरीच्या त्या दुचाकी मिळण्याच्या संख्येत अजून अधिकची भर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
चोरट्यांकडून दुचाकी घेणाऱ्यांनों…स्वतः होऊन ‘त्या’ दुचाकी तात्काळ पोलीसांकडे जमा करा, अन्यथा आपणावर ही कारवाई होईल-पो.नि. विकास पाटील
नुकतीच भोकर येथील दुचाकी चोरांची टोळी व चोरीच्या दुचाकींची विक्री करणारे रॅकेट उघडकीस आले असून त्या टोळीतील चोरटे सद्या भोकर पोलीसांच्या कोठडीत आहेत.दुचाकी चोर टोळीतील त्या चोरट्यांची चौकशी केली असता चोरलेल्या ‘त्या’ दुचाकी फायनान्स कंपनीने जप्त केलेल्या असल्याचे सांगून कागदपत्रांविना कमी किमतीत ते विक्री करायचे.तसेच अनेक दुचाकींवर बनावट व खोटे क्रमांक टाकून व काही दुचाकीवर क्रमांक न टाकताच त्यांनी त्या विक्री केल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे.त्यामुळे उपरोक्त दुचाकी चोरांकडून ज्यांनी दुचाकी खरेदी केल्यात त्यांनी स्वतः होऊन ‘त्या’ दुचाकी भोकर पोलीकडे तात्काळ जमा कराव्यात.अन्यथा पोलीस तपासात ज्यांच्या ताब्यात ‘त्या’ दुचाकी मिळतील त्यांच्या विरुद्ध ही रितसर पोलीस कारवाई करण्यात येईल,असे आवाहन भोकर पोलीस ठाण्याचे पो.नि.विकास पाटील यांनी केले आहे.तसेच तालुक्यातील पोलीस पाटलांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांत अशा प्रकारच्या दुचाकी कोणाकडे आढळल्यास त्यांनी तात्काळ त्या दुचाकी पोलीसांकडे जमा कराव्यात असे त्यांना सांगावे.आणि जमा न करता ज्यांच्याकडे त्या दुचाकी सापडतील त्यांच्या विरुद्ध पोलीस कारवाई करण्यात येईल,असे ही सुचित करण्यात यावे, अशा सुचना ही पो.नि.विकास पाटील यांनी पोलीस पाटील यांना दिल्या आहेत.
‘राजकीय नेत्यांनों सावधान!… आपल्या आजूबाजूस शुभ्र वस्त्रे परिधान करुन व राजकीय मुखवटा समोर करत कोणी फोटोप्रेमी चमकोगिरी करणारा तर फिरत नाही ना ?’ हे तपासून घ्या…
दुचाकी चोरांची टोळी पकडली आहे व त्यांनी विक्री केलेल्या अनेक दुचाकी देखील पोलीसांनी ताब्यात घेतल्या आहेत अशी माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने त्या दुचाकींत ‘आपली दुचाकी आहे का ?’ म्हणत भोकर पोलीस ठाण्याच्या प्रांगणातील त्या दुचाकी पाहण्यासाठी चोरीस गेलेल्या दुचाकींच्या मालकांनी मोठी गर्दी केली.तर दुचाकी चोर टोळीचा म्होरक्या ‘शहारुख’ हा चक्क काँग्रेसचा तथाकथित कार्यकर्ता व चोरीच्या दुचाकींचा ‘सौदागर’ निघाला असून याच टोळीतील अन्य एकजण राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटूंबातील असल्याने भोकर तालुक्यातील अनेक राजकीयांत एकच खळबळ उडाली आहे.
त्यामुळे ‘राजकीय नेत्यांनों सावधान!… आपल्या आजूबाजूस शुभ्र वस्त्रे परिधान करुन व राजकीय मुखवटा समोर करत कोणी फोटोप्रेमी चमकोगिरी करणारा तर फिरत नाही ना ? हे तपासून घ्या’,अन्यथा आपली,आपल्या पक्षाची,पक्ष नेते व पदाधिकाऱ्यांची नाहक बदनामी अशा प्रकारच्या काही लोकांकडून होईल,असे म्हणण्याची,संभ्रमावस्थेची आणि काही जणांवर संशय व्यक्त करण्याची वेळ या धक्कादायक गुन्हे प्रकरणातून राजकीयांवर आली आहे.परंतू कोणाच्याही माथ्यावर तो कोण आणि कसा आहे ? हे लिहलेले नसल्याने अशा लोकांना ओळखणे सर्वांसाठीच कठीण असते,त्यामुळे असे काही घडल्यास त्या राजकीयांचा त्यात काय दोष ? असेच म्हणावे लागेल अशी चर्चा अनेकांतून होत आहे.