पत्नीस पेट्रोलने जाळून खून करणाऱ्या निर्दयी पतीस भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने दिली जन्मठेपेची शिक्षा

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : मोटार सायकल घेण्यासाठी माहेरहून ८० हजार रुपये घेऊन ये म्हणून सतत शारीरिक व मानसिक छळ करुन एका दिवशी पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून तिचा खून करणाऱ्या सिरंजणी ता.हिमायतनगर येथील एका निर्दयी पतीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय भोकर चे न्यायाधीश वाय.एम.एच.खरादी यांनी दि.२८ मार्च रोजी जन्मठेप व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास अतिरिक्त ५ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
सौ.महानंदा गजानन पीटलेवाड रा.सिरंजणी ता. हिमायतनगर या विवाहितेस तिचा पती गजानन नारायण पिटलेवाड(३०) हा मोटार सायकल घेण्यासाठी माहेरहून ८० हजार रुपये घेऊन ये म्हणून सतत शारीरिक व मानसिक छळ करत होता.दि.१५ जुलै २०२० रोजी सदरील विवाहितेची सासू व सासरा हे शेतात गेले असता ती ती घरी एकटीच असल्याचे पाहून तिच्याशी पती गजानन पिटलेवाड ने पैशाच्या मागणीवरून वाद घातला.यास तिने प्रतिसाद न दिल्याने राग अनावर झालेल्या गजानन पिटलवाड ने घरासमोरील जुन्या मोटार सायकल मधील पेट्रोल काढले व ते पत्नी सौ.महानंदाच्या अंगावर टाकून दिला पेटवून दिले.यात ती मोठ्या प्रमाणात जळाली असल्याने तिला उपचारार्थ शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी तिच्या माहेरच्यांनी हिमायतनगर पोलीसात रितसर तक्रार दिली.यावरुन रुग्णालयात जाऊन गंभीररित्या जळीत असलेल्या विवाहितेचा मृत्यूपुर्व जबाब घेण्यात आला.परंतू उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याप्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात गजानन पिटलेवाड विरुद्ध गु.र.नं.१४६/२०२० कलम ३०२, ४९८ (अ) भा.द.वी.प्रमाणे खून व शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.सदरील गुन्ह्याचा सखोल तपास पोलीस निरीक्षक भगवान बी.कांबळे यांनी केला व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय भोकर येथे दोषारोप पत्र दाखल केले. दरम्यानच्या काळात सदरील प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अतिरीक्त सरकारी अभियोक्ता ॲड सौ.अनुराधा शिवराज डावकरे यांनी महत्वाचे एकूण ११ साक्षीदार तपासले.तसेच अंतिम युक्तीवादादरम्यान त्यांनी लेखी युक्तीवादासोबत मा.उच्च न्यायालयातील न्यायनिवाडे दाखल केले.याचबरोबर मयत विवाहितेचा मृत्युपूर्व जवाब ग्राह्य धरुन आरोपीस कठोर शिक्षा करण्यात यावी अशी विनंती मा.न्यायालयास केली.दुर्दैवी मयत महानंदा पिटलेवाड हिचा मृत्यूपुर्व जवाब याप्रकरणात महत्वाचा ठरला व तो निर्दयी पती गजानन पिटलेवाड या प्रकरणी दोषी ठरला.यावरुन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय भोकर चे न्यायाधीश वाय.एम.एच.खरादी यांनी दि.२८ मार्च २०२५ रोजी गजानन पिटलेवाड यास जन्मठेप व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास अतिरिक्त ५ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.तर सदरील खटल्या दरम्यानच्या पैरवी अधिकारी म्हणून जमादार रमेश आडे यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले.