Sun. Dec 22nd, 2024

खा.अशोक चव्हाण यांनी मा.आ.शिवाजीराव कव्हेकर यांना उतरविले भोकरच्या प्रचार मैदानात

Spread the love

मेव्हुण्यास प्रचार मैदानात उतरवून महाविकास आघाडीचे भोकर विधानसभेतील मुख्य प्रचारक तथा काँग्रेस पक्षाचे नांदेड उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांना ‘शह’ देण्याचा होतोय का प्रयत्न ?

थेट जमिनीवरचे वृत्त- उत्तम बाबळे,संपादक

भोकर : माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांचे काँग्रेस पक्षातील पुर्वाश्रमीचे विश्वासू सहकारी नांदेड जिल्हा परिषदेचे माजी कृषि व पशुसंवर्धन सभापती, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी १६-नांदेड लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचाराची भोकर विधानसभा मतदार संघातील मुख्य जबाबदारी स्विकारली आहे.वसंतराव चव्हाण यांना विजयी करण्यासाठी ते दिवसरात्र परिश्रम घेत आहेत.त्यांच्या प्रचाराची ‘हातोटी’ लक्षात घेऊन खा.अशोकराव चव्हाण यांनी बाळासाहेब पाटील रावणगावकर यांचे मेव्हुणे भाजपा किसान मोर्चाचे गोवा प्रभारी तथा माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांना महायुतीचे उमेदवार खा.प्रतापराव पाटील यांच्या प्रचारार्थ भोकर विधानसभा मतदार संघात मैदानात उतरविले आहे.हे पाहता यातून बाळासाहेब पाटील रावणगावकर यांना शह देण्याचा प्रयत्न होतोय का? असे चर्चील्या जात असून याचा मतदारांवर कितपत परिणाम होतो हे दि.४ जून रोजी दिसणारच आहे.

माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा व आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला.याचे बक्षिस म्हणून राज्यसभेची खासदारकी त्यांना मिळाली.यावेळी काँग्रेस पक्षातील त्यांचे अनेक जुने विश्वसनीय सहकारी त्यांच्या सोबत भाजपात गेले.परंतू नांदेड जिल्हा परिषदेचे माजी कृषि व पशुसंवर्धन सभापती,नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक बाळासाहेब पाटील रावणगावकर हे मात्र खा.चव्हाण यांच्या सोबत भाजपात गेले नाहीत व त्यांनी काँग्रेस पक्षातच राहण्याचा ठाम निर्णय घेतला.यामुळे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांची नांदेड उत्तर जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली. दरम्यानच्या काळात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक घोषित झाली व होऊ घातलेल्या या निवडणूकीत नांदेड उत्तर जिल्ह्याचे प्रमुख प्रचारक म्हणून पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे.त्या अनुषंगाने १६-नांदेड लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचाराची मुख्य धुरा ते सांभाळत असून विजयासाठी दिवसरात्र परिश्रम घेत आहेत.
दरम्यानच्या काळात बाळासाहेब पाटील रावणगावकर यांना भाजपात आणण्यासाठी काही जणांकडून प्रयत्न करण्यात आला.परंतू त्यांनी काँग्रेस पक्षातच राहण्याचा ठाम निर्णय घेतल्यामुळे ‘मॅनेजमेंट गुरु खा.अशोकराव चव्हाण’ यांनी सर्वप्रथम रावणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी व काही ग्रामपंचायत सदस्य फोडले आणि त्यांचा भाजपामध्ये प्रवेश करुन घेतला.यानंतर भोकर विधानसभा मतदारसंघातील प्रचार मैदानात थेट बाळासाहेब पाटील रावणगावकर यांच्या बहिणीचे पती अर्थातच मेव्हुणे असलेले लातूरचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांना दि.१५ एप्रिल २०२४ रोजी उतरविले.मा.आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर हे बाळासाहेब पाटील रावणगावकर यांचे राजकीय व बँकिंग क्षेत्रातले गुरु तथा कौटुंबिक प्रेरणास्थान आहेत.ही कमजोरी लक्षात घेऊन खा.अशोकराव चव्हाण यांनी भाजपा किसान मोर्चाचे गोवा प्रभारी शिवाजीराव पाटील कव्हेकर यांना बाळासाहेब पाटील रावणगावकर यांच्या जिल्हा परिषद मतदार संघातील भोकर तालुक्यातील सोनारी,कांडली यांसह आदी गावांतील प्रचार सभांत सहभागी करुन घेतले. तसेच मतदारांच्या संवाद भेटी घडवून आणल्या.यावेळी मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,खा.अशोकराव चव्हाण, उमेदवार खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सोबत ठामपणे राहण्याची ‘ग्यारंटी’ दिली.
या प्रचार सभा व मतदार संवाद भेटी दरम्यान खा.अशोकराव चव्हाण व मा.आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या समवेत मा.आ.अमरनाथ राजूरकर, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक कैलास देशमुख गोरठेकर,राजे खंडेराव देशमुख,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, भाजपा तालुकाध्यक्ष गणेश पाटील कापसे,बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर,ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड,भाजप जिल्हा उपाध्यक्ष किशोर पाटील लगळुदकर,भगवानराव दंडवे,बाजार समितीचे उपसभापती बालाजीराव शानमवाड,संचालक केशव पाटील पोमनाळकर, रामचंद्र मुसळे,शिंदे शिवसेनेचे तालुका प्रमुख अमोल धनराज पवार,सरपंच संघटनेचे अध्यक्ष माधवराव आमृतवाड,संचालक गणेश राठोड, संचालक उज्ज्वल केसराळे,संतोष मारकवार, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गणपत पिट्टेवाड,बालाजी येलपे यांसह अनेक सरपंच,उपसरपंच,ग्रा.पं.सदस्य,महायुतीचे पक्ष पदाधिकारी,कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
विशेष बाब म्हणजे या प्रचार सभां दरम्यान माजी मुख्यमंत्री लोकनेते स्व.विलासराव देशमुख यांसारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करणारे राजकीय प्रभावी व्यक्तीमत्व म्हणून परिचित असलेल्या मा.आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या सोबत स्व.विलासराव देशमुख याच्या पत्नीचे भाऊ राजे खंडेराव देशमुख पळशीकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.ही बाब या प्रचार दौऱ्याची जमेची बाजू व बाळासाहेब पाटील रावणगावकर यांना शह देण्यासाठीच होती.असे उपस्थितांतून चर्चील्या जात आहे.राजकीय क्षेत्रात कट,शह-प्रतिशह देण्यासाठी कुटुंबातील लोकांना एकमेकांच्या विरुद्ध उभे केले जाते,आणले जाते ही बाब सर्वसामान्य झाली आहे.परंतू बाळासाहेब पाटील रावणगावकर यांच्या ठाम भुमिकेपुढे भाजपाचे स्टार प्रचारक खा.अशोकराव चव्हाण यांच्या या ‘राजकीय शह-प्रतिशहाच्या’ खेळीचा महाविकास आघाडीच्या उमेदवारावर नेमका काय परिणाम होईल व मतदारांचे महायुतीच्या उमेदवाराच्या बाजूने मनपरिवर्तन करण्यात ते यशस्वी होतील काय ? असा प्रश्न अनेकांतून उपस्थित केला जात आहे.पाहुयात पुढे खा.अशोकराव चव्हाण या राजकीय खेळीत यशस्वी होतात का बाळासाहेब पाटील रावणगावकर ?


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !