मुंबईतील विधान भवना जवळील चौकास दिले साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे नाव
विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या हस्ते आज दि.१२ ऑक्टोबर रोजी होत आहे नामकरण व लोकार्पण सोहळा
अंबुज प्रहार प्रतिनिधी
मुंबई : विधान भवन परिसरातील मनोरा आमदार निवास, नरीमन पॉईंट,मुंबई येथील चौकाला साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे नाव देण्यात आले असून विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच आज दि.१२ ऑक्टोंबर २०२४ रोजी दुपारी ४:०० वाजता विधानसभा अध्यक्ष तथा कुलाबा विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड.राहुल नार्वेकर यांच्या हस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या चौकाचे नामकरण व लोकार्पण होणार आहे.
मातंग समाज बांधवांची गेल्या अनेक दिवसांची मागणी होती की सदरील चौकास साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे.विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला व यात त्यांना यश आले असून ही मागणी पुर्णत्वास आल्याने या निर्णयाचे मातंग समाजातून उत्स्फुर्त स्वागत करण्यात येत आहे.मुंबई मंत्रालयात कामानिमित्त येणारे असोत की समुद्र किणारा पाहण्यासाठी येणारे पर्यटक असोत ते विधान भवन परिसर,मनोरा आमदार निवास व नरीमन पॉईंट येथे येतात.येथे ये जा करणाऱ्या सर्वांच्या दृष्टीक्षेपात आता विश्व साहित्य भुषण तथा संयुक्त महाराष्ट्राचे अग्रणी शिल्पकार डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे नाव पडणार आहे.यातून त्यांच्या कार्यकर्तुत्वाचे स्मरण होणार आहे.
आपल्या अजरामर साहित्यातून डॉ.अण्णा भाऊ साठे यांनी ‘मराठी भाषा व मराठी साहित्य’ वैश्विक पातळीवर नेले असून नुकतेच मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा देण्यात आला आहे.आपल्या लेखणी व वाणीने मराठी साहित्य विश्वात शोषितांचा आणि वंचितांचा आवाज साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांनी बुलंद केला आहे.महान लेखक तथा समाजसुधारक वंदनिय डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे नाव या चौकास दिल्याने या नामकरणातून त्यांची प्रेरणादायी स्मृती चिरंतन स्वरूपात जपण्यात येणार आहे,मी त्यांच्या पावन स्मृतिस वंदन करतो,अशी कृतज्ञ भावना विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी या औचित्याने व्यक्त केली आहे.
रशियातील मॉस्को येथील मार्गारिटा रुडामिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचरच्या आवारात साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे दि.१४ सप्टेंबर २०२२ रोजी लोकार्पण करण्यात आले.या सोहळ्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर,भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ.विनय सहस्त्रबुद्धे,आमदार सुनील कांबळे,प्राचार्य डॉ. बळीराम गायकवाड यांसह आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळीच ॲड.राहुल नार्वेकर यांनी सदरील चौकास डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे नाव देण्याचा संकल्प केला होता असे सांगण्यात येत आहे व तो पुर्णत्वास येत असल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.संपादक उत्तम बाबळे व अंबुज प्रहार न्युज लाईव्ह परिवाराच्या वतीने या निर्णयाचे स्वागत आणि मनापासून खुप खुप धन्यवाद!
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मातंग समाजाच्या मतांची गोळा बेरीज डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेतला असल्याचे विरोधकांकडून होत आहे टिकास्त्र
मा.सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा जो निर्णय दिला आहे,त्याची अंमलबजावणी आगामी विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागण्यापूर्वी तातडीने करण्यात यावी व यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात यावा या मागणीसाठी मुंबई येथे सकल मातंग समाज समन्वयक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तळ ठोकलेला असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत अनेक निर्णयांचा पाऊस पाडला आहे.परंतू उपरोक्त निर्णय घेतला नाही.त्यामुळे मातंग समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल व यांचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे टिकास्त्र काही विरोधकांतून होत आहे.तर विश्व साहित्य भुषण संयुक्त महाराष्ट्राचे अग्रणी शिल्पकार डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे स्मरण व सन्मान यातून होत असल्याने मातंग समाज आणि विचार अनुयायींतून या निर्णयाचे स्वागत होत आहे.