मौ.वसूर येथील मागासवर्गीय स्मशानभूमीच्या जागेवरील नियमबाह्य अतिक्रमण हटविण्यात यावे…
अन्यथा स्मशानभूमीत ‘मसनवटा मुक्ती आंदोलन’ करु- अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन व ग्रामस्थांनी दिला प्रशासनास इशारा
अंबुज प्रहार प्रतिनिधी
मुखेड : तालुक्यातील मौ.वसूर येथील सातबारा नोंदीनुसार असलेल्या मागासवर्गीय स्मशानभूमीच्या जागेवर नियमबाह्य अतिक्रमण करण्यात आले आहे.ते नियमबाह्य अतिक्रमण महसूल प्रशासनाने तात्काळ हटवून स्मशानभूमीच्या जागेची हद्द कायम करावी, अन्यथा स्मशानभूमीत ‘मसनवाटा मुक्ती आंदोलन’ करण्यात येईल असा इशारा दि.९ डिसेंबर रोजी अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन व मागासवर्गीय ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे तहसिलदार व गटविकास अधिकारी मुखेड यांना दिला आहे.
मौ.वसुर ता.मुखेड येथील शेत खाते क्र.२८७ व गट क्र.३,४,५ मध्ये सातबारा नोंदीनुसार मागासवर्गीय समाजाकरीता निर्धारीत केलेल्या स्मशानभूमीच्या एकूण ६ गुंठे जमिनीवर लगतच्या शेतक-यांनी नियमबाहय अतिक्रमण केले आहे.ते नियमबाह्य अतिक्रमण हटविण्यात यावे व नियोजित स्मशानभूमीच्या जमिनीची हद्द कायम करण्यात यावी या मागणीसाठी गावातील मागासवर्गीय समाज बांधवांनी तहसिलदार मुखेड,निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड व संबंधित प्रशासनाधिकाऱ्यांना निवेदने दिली आहेत.त्यास अनुसरून महेश वडदकर यांना दिलेल्या निवेदनाचे संदर्भिय पत्र क्र.२०२४ /मशाका-२ज.टे-५/कावि दि.११ जुलै २०२४,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ.गंगाधर गायकवाड यांनी दि.१९ सप्टेंबर २०२४ व दि.१४ ऑक्टोबर २०२४ रोजी तहसिलदार मुखेड यांना दिलेले पत्र महसूल प्रशासनास प्राप्त झालेले आहे,यावरुन तहसिलदार तहसिल कार्यालय मुखेड यांनी वादातित जागेच्या स्थळ पाहणीसाठी मंडळ अधिकारी जाहूर ता.मुखेड यांच्या नावे कार्यालयीन आदेश पत्र जा.क्र.२०२४/जमा-२/साधाकुळ/कापी दि.१ ऑक्टोबर २०२४ रोजी काढले.यास अनुसरून मंडळ अधिकारी यांनी स्थळ पाहणी करुन रितसर पंचनामा केला व तो अहवाल दि.२१ ऑक्टोबर २०२४ रोजी तहसिल कार्यालय प्रशासनाकडे सुपूर्द केला आहे.
सर्वसाधारणपणे तालुका असो किंवा जिल्ह्यातील मागासवर्गीय समाजाच्या स्मशान भूमी व रस्त्याच्या जागेच्या अत्यावश्यक आणि गंभीर समस्येकडे शासन, प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी हे गांभीर्याने तथा प्रामाणिक लक्ष देत नाहीत.हेतूपुरस्कर कानाडोळा केला जातो आणि मौ.वसूर ता.मुखेड येथील मागासवर्गीयांच्या स्मशानभूमीच्या जागे संबंधित नियमबाह्य अतिक्रमण हटविण्या बाबत ही असेच झाले आहे.मंडळ अधिकारी यांनी वादातित जागेची स्थळ पाहणी करुन सत्य अहवाल सादर केलेला असतांनाही तहसिल प्रशासन ते नियमबाह्य अतिक्रमण हटवून स्मशानभूमीच्या जागेची हद्द कायम करुन देण्यासाठी उदासिन आहे.म्हणून ती जागा बळकावणाऱ्या विरुद्ध योग्य ती कारवाई करुन नियमबाह्य अतिक्रमण तात्काळ हटवून ‘स्मशानभूमीची’ जागा कायम करावी या मागणीसाठी अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतिश कावडे यांच्या नेतृत्वाखाली मौ. वसूर येथील मागासवर्गीय ग्रामस्थांनी दि.९ डिसेंबर २०२४ रोजी तहसिलदार व गटविकास अधिकारी मुखेड यांना निवेदन दिले आहे.तसेच ते नियमबाह्य अतिक्रमण डिसेंबर २०२४ अखेर पर्यंत तात्काळ हटविण्यात आले नाही तर येत्या जानेवारी २०२५ महिन्यात स्मशानभूमीत ‘मसनवटा मुक्ती आंदोलन’ करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.निवेदन दिलेल्या शिष्टमंडळात सतिश कावडे,सरपंच रमेश पाटील शिंदे,सामाजिक कार्यकर्ते व्यंकट लोहबंदे,व्यंकट घाटे,अचित घाटे,निवृत्ती कावडे, रामराव कावडे,सम्रत कावडे,झरीबा कावडे,अनिल कावडे,नागनाथ कावडे,अरविंद शिंदे,रमेश शिंदे,उत्तम शिंदे,पंढरी शिंदे,भिमा शिंदे,पप्पू कावडे,इंद्रजित कावडे,श्रीपती कावडे,बापुराव कावडे,रामकिशन कावडे,यशवंत शिंदे,बांबू शिंदे यांसह मौ. वसुर ता.मुखेड येथील मागासवर्गीय समाजातील बहुसंख्य नागरिकांचा समावेश होता.