भोकर मतदार संघातील उमेदवारांचे निवडणूक खर्चाबाबत ४ नोव्हेंबरला प्रशिक्षण-प्रविन मेंगशेट्टी
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : ८५-भोकर विधानसभा मतदार संघातील नामनिर्देशन पत्र माघारी घेतल्यानंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे निवडणूक खर्चाबाबत दि.४ नोव्हेंबरला प्रशिक्षण आहे,तर दि.८ नोव्हेंबरला निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी होणार असून उमेदवार किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून लोकप्रतिनिधित्व अधिनियमाचे पालन करावे,असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांनी केले आहे.
८५-भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे उमेदवार व त्यांच्या खर्च प्रतिनिधींना निवडणूक खर्चाबाबतच्या भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या तरतुदी अवगत करुन देण्यासाठी खर्च निरीक्षक यांच्या उपस्थित दि.४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ३:३० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे सभागृह भोकर येथे उमेदवारांचे प्रशिक्षण आयोजित केले आहे.भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने हे प्रशिक्षण आयोजित केले आहे.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम ७७ नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वत:,ती स्वत: किंवा त्याच्या,तिच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे त्याला, तीला नामनिर्देशित करण्यात आले आहे.त्या दिनांकापासून निवडणुकीच्या निकाल लागण्याच्या दिनांकापर्यत दोन्ही दिनांक धरुन,त्याने किंवा त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहे.याबाबद प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
तर दि.८ नोव्हेंबरला निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी होणार
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने ८५-भोकर मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी दि.८ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते ते सायंकाळी ५ वाजतापर्यंतच्या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयचे सभागृह भोकर येथे केली जाणार आहे.या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षक यांच्यासमोर सादर करणे आवश्यक आहे.अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमीत केलेल्या परिपत्रकांनुसार कार्यवाहीस पात्र असतील. तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशेब ठेवणे व दाखल करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम १० क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी निरर्ह ठरविण्यास पात्र असेल याची नोंद घ्यावी.असे निवडणूक निर्णय अधिकारी ८५-भोकर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.