Wed. Dec 18th, 2024

आज भोकर विधानसभा मतदारसंघातील ३ लाख ३ हजार १०३ मतदार करणार लोकशाहीचा सण साजरा

Spread the love

मतदान प्रक्रीयेतून हा सण सुरळीतपणे साजरा करुन घेण्यासाठी १ हजार ९१० अधिकारी व कर्मचारी आणि सुरक्षेसाठी १ हजार ३२ पोलीस अधिकारी,कर्मचारी होमगार्ड मतदान केंद्रावरील कर्तव्यावर सज्ज

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : होऊ घातलेल्या १६-नांदेड लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीतील १९ उमेदवार व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता निवडणूक रिंगणात उभे असलेल्या ८५- भोकर विधानसभा मतदार संघातील २५ उमेदवारांसाठी आज दि.२० नोव्हेंबर रोजी ३ लाख ३ हजार १०३ मतदार आपल्या हस्ते मतदान यंत्रावरील( ईव्हीएम) चिन्हांचे बटन दाबून मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा सण साजरा करणार असून एकूण ३४४ मतदान केंद्रावरील ही प्रक्रिया पुर्ण करुन घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान यंत्रसामग्रीसह १ हजार ९१० कर्मचारी व १ हजार ३२ पोलीस अधिकारी,कर्मचारी होमगार्ड कर्तव्यावर सज्ज झाले आहेत.
होऊ घातलेल्या १६-नांदेड लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रीय,प्रादेशिक पक्षाचे व अपक्ष असे एकूण १९ उमेदवार आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता ८५-भोकर विधानसभा मतदार संघात एकूण २५ उमेदवार निवडणूक रिंगणातून आपले नशिब आजमावत आहेत.दि.१८ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६:०० वाजता प्रचाराची भोंगी बंद झाली, प्रचार प्रसाराच्या वाहनांची चाके थांबली.प्रचार सभांतून होणारा घोषणांचा पाऊस,आश्वासनांची खैरात व एकमेकांविरुद्धच्या शब्दफेकी तोफांचे गोळे ही थंडावले.प्रचार सभा,रॅलीतील(रोड शो)उमदेवार व त्यांच्या समर्थकांच्या गृहभेटीतील गाठीभेटींतून मतदारांनी काय ‘अर्थ’ घ्यायचा तो घेतला आणि योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी आपले अमुल्य मत कोणास द्यायचे याची खुणगाठ बांधून घेतली आहे.मतदार संघातील भोकर, मुदखेड व अर्धापूर या तीन तालुक्यात १ लाख ५४ हजार ४७८ पुरुष व १ लाख ४८ हजार ६१४ स्त्री आणि इतर (तृतीयपंथी)११ असे एकूण ३ लाख ३ हजार १०३ मतदार आहेत.सदरील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एकूण ३४४ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.भारतीय लोकशाहीत देशाचे व राज्याचे उज्जल भविष्य घडण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करुन सरकार बनविणे गरजेचे असते.मतदान करणे हा प्रत्येक जबाबदार नागरिक तथा मतदाराचा हक्क आणि कर्तव्य आहे.हा हक्क व कर्तव्य बजावून लोकशाहीचा सर्वात मोठा सण साजरा करायचा असतो.
आज दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७:०० ते सायंकाळी ६:०० वाजता पर्यंत मतदानातून लोकशाही चा हा सण साजरा होणार आहे.या अनुषंगाने मतदान प्रक्रिया पुर्ण करुन घेण्यासाठी दि.१९ नोव्हेंबर २०२४ रोजी ३४४ मतदान केंद्रावर १ हजार ७२० व राखीव १९० असे एकूण १ हजार ९१० अधिकारी व कर्मचारी मतदानयंत्र आणि अन्य साहित्य सामग्रीसह ४१ बस,३० मिनी बस,क्रुझर जीप ८ अशा एकूण ७९ वाहनांनी रवाना झाले आहेत.मतदार संघात एकूण ३६ झोन असून झोनल अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता ३६ वाहने उपलब्ध करून दिली आहेत.तर कायदा,शांतता, सुव्यवस्था व सुरक्षेसाठी १ हजार ३२ पोलीस अधिकारी,कर्मचारी व होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार विनोद गुंडमवार, तहसिलदार आनंद देऊळगावकर व अर्धापूर चे तहसिलदार आणि नायब तहसिलदार यांच्या उपस्थितीत उपरोक्त मतदान अधिकारी,कर्मचारी व पोलीसांची उपरोक्त वाहनांनी रवानगी करण्यात आली.उपरोक्त सर्व अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रावरील कर्तव्यावर सज्ज झाले असून ३ लाख ३ हजार १०३ मतदार आपल्या अमुल्य मतदानाचा हक्क आणि कर्तव्य बजावणार आहेत.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !