तहसिलदार राजेश लांडगे यांच्यावर भोकर येथील ३ कार्यालयांची आहे जबाबदारी
तर आगामी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केली आहे तीन कार्यालयांचा पदभार असलेल्या या अधिकाऱ्यांच्या बदलीची तयारी…
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : जवळपास दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालयास कायमस्वरूपी पदभारी उपविभागीय अधिकारी मिळाल्याचा आनंद येथील नागरिकांनी झाला होता.परंतू उपविभागीय अधिकारी सचिन यादव यांनी अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीतच त्या खुर्चीचा पदभार सोडून मुंबई मंत्रालय गाठल्याने भोकर चे तहसिलदार राजेश लांडगे यांच्याकडे तो प्रभारी पदभार सोपविला गेला असून उपविभागीय अधिकारी कार्यालय,तहसिल कार्यालय व नगर परिषद या ३ कार्यालयांचा पदभार असलेल्या कर्तव्यदक्ष अधिकारी राजेश लांडगे यांची ही आगामी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बदलीची तयारी केली असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत असल्याने पुन्हा एकदा या तीन ही कार्यालयांचा पदभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे सोपविला जाणार का कायमस्वरूपी अधिकाऱ्यांकडे ? अशी चर्चा कार्यालय परिसरात होत असून नागरिकांची संभाव्य गैरसोय टाळली जावी म्हणून उपरोक्त तीन ही कार्यालयांना कायमस्वरुपी अधिकारी मिळावा अशी अपेक्षा अनेकांतून व्यक्त होत आहे.
उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रालयीन कार्यालय मुंबई येथे अवर सचिव म्हणून बदली झाल्यापासून जवळपास दीड वर्ष भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा पदभार भोकर व मुदखेड चे तहसिलदार आणि प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी अनुपसिंह यादव यांच्याकडे आलटून पालटून होता.दरम्यानच्या काळात आक्टोंबर २०२३ मध्ये पदोन्नत तहसिलदार सचिन यादव यांची भोकर चे उपविभागीय अधिकारी पदी नियुक्ती झाली होती.त्यांच्या रुपाने कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालयास मिळाल्याचा आनंद येथील नागरिकांना झाला.परंतू त्यांचे भोकर येथे मन रमत नसल्याने राज्यकर्ते व वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे बदलीसाठी त्यांनी फिल्डींग लावली आणि येथील पदभार तहसिलदार राजेश लांडगे यांच्याकडे सोपवून थेट मुंबई मंत्रालय गाठले आहे.
भोकर तहसिल चे विद्यमान तहसिलदार राजेश लांडगे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकर चा प्रभारी उपविभागीय अधिकारी म्हणून पदभार स्विकारला असून सद्या ते भोकर नगर परिषदेचे देखील प्रशासक व प्रभारी मुख्याधिकारी आहेत.त्यांच्या कार्यालयीन कामाची हातोटी लक्षात घेऊन वरिष्ठ आणि जिल्हाधिकारी यांनी त्यांच्यावर उपरोक्त तीन जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत.ओढाताण व तारेवरची कसरत करत ते उपरोक्त जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत.सप्टेंबर २०२१ मध्ये भोकर तहसिल कार्यालयाचा पदभार स्वीकारलेल्या तहसिलदार राजेश लांडगे यांचा सव्वा दोन वर्षाचा येथील प्रशासकीय कार्यकाळ होत असल्याने ते बदलीस पात्र आहेत.दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक उल्लेखनीय प्रशासकीय व विकासात्मक कामे केली आहेत.अशातच राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्या अधिकाऱ्यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ पुर्ण झाला आहे व जे अधिकारी स्वजिल्ह्यातील आहेत अशांच्या बदलीचे प्रस्ताव तयार करावेत अशा सुचना दिल्यानुसार आगामी सार्वत्रिक निवडणुकींची प्रशासकीय तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली असून नांदेड जिल्ह्यातील अधिकारी आणि तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अहवाल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तयार केला आहे.तसेच सदरील अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे, यानुसार नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यापैकी ९ तालुक्यातील तहसिलदारांच्या बदल्या होणार असून यामध्ये ७ तहसिलदार व २ उपविभागीय अधिकारीऱ्यांचा समावेश आहे.तर २ तहसिलदारांच्या जागा रिक्त असून एका उपविभागीय अधिकाऱ्याची जागादेखील रिक्त आहे,एकूणच ९ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा अहवाल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे.यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील कंधारचे तहसिलदार राम बोरगावकर,हिमायतनगरचे डी.एम.गायकवाड,धर्माबादचे आर.एन.हांदेश्वर,अर्धापूरच्या उज्वला पांगारकर,भोकर चे राजेश लांडगे,किनवटचे डॉ.मृणाल जाधव,उमरीचे हरीश गाडे,तर भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालय क्षेत्रांतर्गत मुदखेड चा पदभार रिक्त आहे.
दरम्यान आगामी निवडणूक प्रक्रिया चालू होण्यापूर्वी महसूल विभागातील बदलीपात्र अधिकाऱ्यांची यादी निवडणूक आयोगाने मागवली असल्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच त्यांच्या बदल्या होणे अनिवार्य असून त्या अधिकाऱ्यांना जिल्ह्याबाहेर पाठविण्याची तयारी प्रशासन करत आहे.जर त्यांच्या बदल्या झाल्या व अन्य जिल्ह्यातून पदसिद्ध सक्षम अधिकारी येथे आले नाहीत तर त्या जागांवर नायब तहसिलदारांची प्रभारीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तसेच कायमस्वरूपी सक्षम अधिकारी नियुक्त न झाल्यास भोकर तालुक्यातील उपरोक्त तीन ही कार्यालयाचा कारभार ‘अलबेल’ होण्याची शक्यता आहे.म्हणून भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालय,भोकर तहसिल कार्यालय व भोकर नगर परिषद कार्यालय या तीन्ही महत्त्वपूर्ण कार्यालयांना कायमस्वरुपी सक्षम अधिकारी मिळावेत आणि येथील नागरिकांची होणारी संभाव्य गैरसोय टाळली जावी अशी अपेक्षा अनेकांतून व्यक्त होत आहे.