‘ते’ भाजपात आल्याने…आता विकास कामातील आडवा आडवी संपली-खा.प्रतापराव चिखलीकर
कार्यक्षेत्रांतर्गच्या विविध विकास कामांच्या भूमिपुजन सोहळ्याकडे भोकर नगर परिषदेने फिरविली पाठ…
तर महायुतीतील प्रमुख घटक पक्षांच्या काही पदाधिकाऱ्यांतून व्यक्त झाला नाराजीचा सूर…?
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण हे मंत्री असतांना राजकीय विरोधातून विकास निधी आणण्यात आम्ही कमी पडलो.परंतू ते भाजपात आले असल्याने… आता विकास कामातील आडवा आडवी संपली असून नांदेड जिल्हा व भोकर चा विकासात्मक चेहरा मोहरा आम्ही बदलून टाकू,असे प्रतिपादन खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केले आहे.ते भोकर शहरातील विविध विकास कामांच्या भूमिपुजन व लोकार्पण सोहळ्यात प्रसंगी बोलत होते.
तर दि.६ मार्च रोजी भोकर नगर परिषद कार्यक्षेत्रात हा सोहळा संपन्न झाला असला तरी यात सहभागी न होता नगर परिषदेने पाठ फिरविल्याचे निदर्शनास आले असून यामागील गौडबंगाल काय ? अशी चर्चा होत आहे.तसेच राज्यात महायुतीचे सरकार असतांनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो प्रसिद्धी पत्रक आणि बॅनरवर नसल्याने महायुतीचा धर्म टाळला गेला नाही व प्रोटोकॉल ही तोडला गेला आहे,असे म्हणत दोन्ही पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आगामी लोकसभा निवडणूक -२०२४ ची आचारसंहिता जाहीर होण्यासाठी अगदी मोजके दिवस उरलेले असतांना खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळाच्या शेवटच्या घटीकेला पहिल्यांदाच भोकर विधानसभा मतदार संघातील अर्धापूर,बारड व भोकर शहरातील विविध विकास कामांच्या भूमिपुजन आणि लोकार्पण सोहळ्या निमित्त दि.६ मार्च २०२४ रोजी पहिल्यांदाच ‘नारळ’ फोडली.यात भोकर शहरातील ३ कोटी १० लक्ष रुपये निधीच्या एकूण १५ विविध विकास कामांचा समावेश आहे.भोकर शहरातील श्री लक्ष्मी मंदीर,महात्मा गांधी चौक व श्री मारुती मंदिर,लहान तळे तेली गल्ली येथे रस्त्याच्या कामांचा भूमिपूजन सोहळा खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते संपन्न झाला.यानिमित्ताने मारुती मंदिर,तेली गल्ली येथे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा सभा संपन्न झाली.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे महाविजेते-२०२४ मराठवाडा संयोजक प्रवीण साले,भाजपा उत्तर नांदेड चे जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख,भाजपा प्र.का.सदस्य संतोष मारकवार,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर पाटील लगळूदकर,भाजपा तालुकाध्यक्ष गणेश पाटील कापसे,तालुका सरचिटणीस बाळा साकळकर,सभापती जगदीश पाटील भोसीकर,संचालक सुभाष पाटील किन्हाळकर,भगवानराव दंडवे,जिल्हा उपाध्यक्षा विजयाताई घिसेवाड,जिल्हा सरचिटणीस पुनमताई देशपांडे, महिला शहराध्यक्षा सुनिता राचूटकर,भोकर शहराध्यक्ष विशाल माने,माजी जि.प.सदस्य दिवाकर रेड्डी,ओबीसी उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष गणपत पिट्टेवाड,युवा मोर्चाचे श्रीकांत किनाळकर, नांदेड म.न.पा.चे माजी नगरसेवक विपुल मोळके,बाळू खोमणे, संचालक राजू अंगरवार,राजू देशपांडे,दिगांबर पाटील कार्लेकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप सोनटक्के यांनी प्रास्ताविकातून आयोजित सोहळ्याची पार्श्वभूमी विषद केली. तर उद्घाटक खा.प्रतापराव पाटील चिखलीकर बोलतांना पुढे म्हणाले की,कोरोना प्रादुर्भाव काळात आम्हा खासदारांना म्हणावा तसा विकास निधी उपलब्ध करून घेता येऊ शकला नाही.कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आरोग्य व सुरक्षितता यावर अधिक भर दिला होता.तसेच खा.अशोक चव्हाण हे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री होते.त्यावेळी त्यांनी विकास कामांच्या निधी वाटपात झुकते माप दिले नाही.परंतू जेंव्हा आमचा पालकमंत्री झाला त्यावेळी मात्र समान विकास निधी वाटप करता येऊ शकले.आता तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपात आले आहेत व भाजपाने त्यांना राज्यसभेचा खासदार करुन सन्मान केला आहे.डॉ.अजित गोपछडे हे देखील खासदार झाले आहेत.त्यामुळे नांदेड जिल्हा व भोकर च्या विकासात्मक कामांसाठी आम्ही आता निधीची कसलीच कमतरता भासू देणार नाही.असे ही ते म्हणाले.या सोहळ्याचे सुरेख असे सुत्रसंचालन प्रशांत पोपशेटवार यांनी केले.तर उपस्थितांचे आभार तालुकाध्यक्ष गणेश पाटील कापसे यांनी मानले.
विविध विकास कामांच्या भूमिपुजन सोहळ्याकडे भोकर नगर परिषदेने फिरविली पाठ…
भोकर नगर परिषद कार्यक्षेत्रांतर्गत कोणते काम असो एरवी अधिकारी,कर्मचारी व माजी नगरसेवक पुढे पुढे करतात आणि दिमतीला असतात.तसे पाहता कार्यक्षेत्रांतर्गतची कामे असल्याने त्यांनी उपस्थित राहणे हे त्यांचे कर्तव्य आहे.परंतू खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते झालेल्या भोकर नगर परिषद कार्यक्षेत्रांतर्गतच्या विविध विकास कामांच्या भूमिपुजन व लोकार्पण सोहळ्या प्रसंगी भोकर नगर परिषदेचे प्रशासक,मुख्याधिकारी,अभियंता किंवा अन्य कोणीही कर्मचारी उपस्थित राहिले नाहीत.ही गंभीर बाब खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तहसिलदार व वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.तसेच याबाबत संबंधीत वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे मला तक्रार करावी लागेल असा ‘सज्जड’ सल्ला ही त्यांनी दिल्याचे समजते.तर याबाबत तहसिलदार व संबंधितांनी लोकसभा निवडणूक अनुषंगाने बैठक असल्याने ते येऊ शकले नाहीत असा निर्वाळा दिल्याचे ही समजते.परंतू जबाबदारी म्हणून कोणी तरी उपस्थित राहिले पाहिजे होते,असे असतांनाही नगर परिषदेचा एकही जबाबदार व्यक्ती उपस्थित राहिला नसल्याने विविध विकास कामांच्या भूमिपुजन सोहळ्याकडे भोकर नगर परिषदेने पाठ फिरविल्याचे ‘गौडबंगाल’ काय ? यावर मात्र प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
महायुतीतील प्रमुख घटक पक्षांच्या कही पदाधिकाऱ्यांतून व्यक्त झाला नाराजीचा सूर…?
भाजपा,शिवसेना(शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) या पक्षांच्या महायुतीचे राज्यात विद्यमान सरकार आहे व केंद्रातही ही महायुती आहे.त्यामुळे बहुतांश कार्यक्रम प्रसंगी भाजपाच्या नेत्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे फोटो प्रसिद्धी पत्रक आणि फलकांवर लावले जातात.असे असतांनाही खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते संपन्न झालेल्या भोकर मधील विविध विकास कामांच्या भूमिपुजन व लोकार्पण सोहळ्याच्या प्रसिद्धी पत्रकांवर आणि बॅनरवर ते फोटो दिसून आले नाहीत. त्यामुळे सदरील सोहळा महायुतीचा नसून केवळ भाजपाचा आहे असे निदर्शनास आल्याने महायुचा धर्म ही पाळला गेला नाही व ‘प्रोटोकॉल’ ही तोडल्याची नाराजी ‘त्या’ पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांतून व्यक्त झाली व त्यांनी देखील सदरील सोहळ्याकडे पाठ फिरविल्याचे दिसले.या गंभीर बाबीकडे महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने वेळीच लक्ष द्यावे अन्यथा आगामी निवडणूकीत यांचा परिणाम भोगावा लागेल,असे ही काही पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.