Fri. Dec 20th, 2024

आंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी बटाळा येथून ४ बैल व १ गाय चोरली

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील मौ.बटाळा येथे दि.२१ मे रोजी रात्री विद्युत पुरवठा खंडित झाल्याचा फायदा घेत चोरट्यांनी डाव साधला व ४ बैल आणि १ दुभती गाय असे एकूण २ लाख ३५ हजार रुपये किमतीचे गोवंशधन चोरुन पलायन केले असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भोकर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर ऐन खरीप पेरणीच्या तोंडावर गोवंशधनाची चोरी झाल्याने ‘त्या’ मालकांसह परिसरातील शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.

मौ.बटाळा ता.भोकर येथील शेतकरी प्रकाश भाऊराव कापसे (६४) हे दि.२१ मे २०२४ रोजी रात्री ९:३० वाजताच्या दरम्यान त्यांच्या ३ बैल,गाय व वासरास चारा पाणी देऊन घरासमोर त्यांना बांधून झोपी गेले.काही वेळाने अमोसमी पाऊस वाऱ्यामुळे गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला.यामुळे दि.२२ मे २०२४ रोजी मध्यरात्री १२:३० वाजताच्या दरम्यान त्यांनी घराबाहेर येऊन आपल्या ‘त्या’ गुरांना पाहिले व परत झोपी गेले.परंतू विद्युत पुरवठा सुरु न झाल्याने पहाटे ३:३० वाजताच्या दरम्यान ते परत घराबाहेर आले व आपल्या गुरांना पाहिले असता त्यांना तेथे त्यांचा १ बैल दिसला नाही.म्हणून त्यांनी गावात व आजूबाजूला त्या बैलाच्या शोध घेतला असता त्यांना तो मिळून आला नाही.यामुळे त्यांनी दि.२२ मे २०२४ रोजी पहाटे ६:०० वाजता पोलीस पाटील व्यंकटराव कापसे यांना झालेल्या प्रकाराबद्दल सांगितले.यावेळी पोलीस पाटील व्यंकटराव कापसे हे म्हणाले की तुमचा बैल व बटाळा गांवातीलच बालाजी पुंजाजी शिंदे याच्या मोरोती मंदिराच्या पाठीमागे असलेल्या अखाड्यावरुन एक दुभती गाय, तसेच परसराम गंगाराम शिंदे याच्या शेतातील अखाड्यावरुन ३ बैल चोरीस गेल्याचे समजले आहे.

अमोसमी पाऊस व वाया येणे सुरु असल्याने शहरी व ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा खंडित होण्याची मालिका सुरु आहे. मौ.बटाळा ता.भोकर येथे ही दि.२१ ते २२ मे २०२४ च्या रात्री दरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाल्याचा फायदा घेऊन प्रकाश भाऊराव कापसे यांच्या मालकीचा अंदाजे ४५ हजार रुपये किंमतीचा एक बैल,बालाजी पुंजाजी शिंदे यांच्या मालकीची अंदाजे ४० हजार रुपये किंमतीची १ दुभती गाय,तर परसराम गंगाराम शिंदे यांच्या मालकीचे अंदाजे प्रत्येकी ५० हजार रुपये किंमतीचे २ बैल व १ गोरे असे एकूण २ लाख ३५ हजार रुपये किंमतीचे ५ गोवंशधन चोरुन चोरट्यांनी पलायन केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी प्रकाश भाऊराव कापसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भोकर पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.राम कराड हे करत आहेत.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !