सुधा प्रकल्पाच्या अतिरिक्त भुसंपादनाचा मावेजा द्या, नंतरच काम सुरु करा-प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

भोकर उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांच्या मध्यस्थीमुळे त्या शेतकऱ्यांनी कामबंद आंदोलनास तुर्तास दिली स्थगिती…
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर तालुक्यातील सर्वात मोठी पाणी साठवण क्षमता असलेल्या रेणापूर सुधा बृहत ल.पा.प्रकल्पाची १.१० मी ने उंची वाढविण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.हे काम होतांना बुडीत शेत्रालगतच्या ६ गावांतील शेतकऱ्यांच्या जवळपास ३७.०७ हेक्टर जमीनचे अतिरिक्त भुसंपादन केल्या जात आहे.परंतू सदरील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्या जमीनीच्या संपादनाचा मावेजा संबंधित प्रशासनाने अद्यापतरी दिला नसल्याने तो मावेजा अगोदर द्यावा व नंतरच काम सुरु करावे असा पावित्रा त्या शेतकऱ्यांनी घेतला असून दि.११ मार्च रोजी कामबंद आंदोलन केले.हे समजल्यावरुन भोकर उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांनी त्या शेतकऱ्यांशी भ्रमणध्वणीवरुन संपर्क साधला व म्हटले की,मावेजा देण्याबाबतचे काम प्रगतीपथावर असून सोमवार,दि.१७ मार्च रोजी त्या शेतकऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल आणि त्याविषयी सविस्तर माहिती देण्यात येईल.त्यामुळे त्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी कामबंद आंदोलनास तुर्तास स्थगिती दिली आहे.
माजी मंत्री डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर यांच्या प्रयत्नातून मध्य गोदावरी खोऱ्याच्या उपखोऱ्यातील नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील सुधा नदीवर रेणापूर-सुधा बृ.ल.पा.प्रकल्प उभारण्यास सन १९९२ – ९३ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. पाणलोट क्षेत्र १०५.६७ चौकिमी.तर माती धरणाची लांबी ४८० मी.व महत्तम उंची १८.६७ मी.आणि धरणाच्या डाव्या तीरावर १५५ मी.लांबीचा पुंडी पध्दतीचा व्दाररहीत सांडवा., साखळी क्र.६७ वर विहीर पध्दतीचा डावा विमोचक व साखळी क्र.६०० वर विहीर पध्दतीचा उजवा विमोचक अशा प्रकारे ७.९४७ द.ल.घ.मी पाणी साठवण क्षमता असलेला हा प्रकल्प उभारला गेला आहे.पुढे मुख्य अभियंता(ज.स.)छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) यांच्या परवानगीने तालुक्यातील ४ खेडेगावांकरीता ०.२८७ द.ल.घ.मी.व भोकर शहरासाठी १.८२२ द.ल.घ. मी.पाणी आरक्षित करण्यात आले.एकूण २.१०९ द.ल. घ.मी.पाणी आरक्षित केल्यामुळे सुधा प्रकल्पाच्या सिंचन क्षमतेत २५० हेक्टरची घट होऊन सिंचन क्षमता <span;>७०० हेक्टर झाली.सदरील २५० हेक्टर सिंचन क्षमतेची घट पुनर्स्थापित करण्यासाठी आस्तित्वात असलेल्या रेणापूर-सुधा बृ.ल.पा.प्रकल्पाची उंची १.१० मी.ने वाढविणे आवश्यक होते. त्यासाठी माजी मुख्यमंत्री खा.आशोक चव्हाण यांनी प्रयत्न केले व त्यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने व गोदावरी मराठवाडा विकास महामंडळ,छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) यांनी दि.६ जानेवारी २०२२ रोजी सुधा प्रकल्पाची १.१० मी.उंची वाढविण्याची मंजूरी दिली.उंची वाढ झाल्यास सध्याच्या ७.९४७ द.ल.घ.मी साठवण क्षमतेत २.०५ द.ल.घ.मी. अधिकची साठवण क्षमता निर्मित होऊन एकूण ९.९९७ द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध होणार आहे व त्यामुळे धरणाची महत्तम उंची १९.८७ मी.होणार असून सा.क्र.७५ ते २३० मी.मधील १५५ मी. लांबीच्या सांडव्याची उंची १.१० मी.ने वाढविण्यात येत असल्याने महत्तम पूर विसर्ग १२८४.९४ घ.मी/सेकंद होणार आहे.या कामासाठी १० कोटी १५ लक्ष ९९ हजार ००६ रुपयाच्या निधीस मान्यता दिली आहे.परंतू मातीधरण व सांडव्याच्या संकल्पचित्रातील बदला मुळे या कामाची किंमत आता जवळपास ४२ कोटी रुपये झाली असून याकरिता सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रयत्न केला जात आहे.तसेच सुधा प्रकल्पाची उंची वाढल्याने भोकर तालुक्यातील जलसंधारण विकासात मोलाची भर पडणार आहे.
सुधा प्रकल्पाची उंची वाढविण्यासाठी बुडीत क्षेत्रालगतच्या ६ गावच्या शेतकऱ्यांची अतिरिक्त जमीन भुसंपादीत करण्यात येत असून यात किन्हाळा-८.२८ हेक्टर,बटाळा-२.३२ हे.,बोरगाव-५.१९ हे.,रेणापुर-१.१५ हे.,<span;>सोमठाणा-७.८१ हे.व थेरबन- १२.३२ हे.अशा प्रकारे एकूण ३७.०७ हेक्टर जमीनीचा समावेश आहे.ही अतिरिक्त जमीन भुसंपादित करण्याची प्रशासकीय प्रक्रिया करण्यात आली आहे.तसेच सुधा प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या कामासाठी मुहूर्त मिळाला असून गेल्या चार दिवसांपूर्वी प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली आहे.प्रकल्प बाधीत उपरोक्त गावच्या शेतकऱ्यांना त्या जमीनीच्या भुसंपादनाचा मावेजा अद्यापतरी मिळाला नाही.तालुक्यातील उपयुक्त अशा व जलसंधारण विकासात मोलाची भर पडत असल्याने होत असलेल्या विकासात्मक कामास सदरील शेतकऱ्यांचा विरोध नाही, परंतू मावेना न देता कामास सुरुवात झाल्याने प्रशासनाने प्रथम संपादित जमीनीचा मावेजा तात्काळ शेतकऱ्यांना द्यावा व नंतरच काम सुरु करावे,असा पावित्रा घेतला असून दि.११ मार्च २०२५ रोजी त्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी कामबंद आंदोलन केले.यावेळी लघु पाटबंधारे उप विभागाचे उप विभागीय अभियंता ए.के.कलवले,शाखा अभियंता के.एन.राजकुंटवार यांनी भेट दिली व भुसंपादनासाठी ४ कोटी रुपये वर्ग करण्यात आले असून मागणीप्रमाणे वाढीव रक्कम आम्ही देणार आहोत,असे सांगून कामबंद आंदोलन करु नये अशी विनंती केली.तर तो मावेजा कधी व कोणत्या मुल्यांक प्रमाणात दिल्या जाणार आहे ? हे सांगावे नंतरच आंदोलन थांबवू असा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतला. यावेळी उप विभागीय अभियंता ए.के.कलवले यांनी भोकर उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांशी बोलणे करुन दिले. उपविभागीय अधिकारी हे छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त यांच्या बैठकीसाठी गेले असल्याने त्यांनी सोमवार दि.१७ मार्च २०२५ रोजी शेतकऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे सांगितले.याचबरोबर मावेजा देण्याची प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच ते काम पुर्ण करु असे आश्वासन दिले. तसेच कामबंद आंदोलन करु नये अशी विनंती केली.त्या विनंतीस मान देऊन सदरील शेतकऱ्यानी तुर्तास कामबंद आंदोलनास स्थगिती दिली आहे.तसेच होऊ घातलेल्या बैठकीत समाधानपर उत्तर न मिळाल्यास लोकशाही मार्गाने पुढील आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.