Sun. Dec 22nd, 2024

पिंपळकौठा शिवारातील स्टोन क्रेशरवर वन अधिकाऱ्यांनी केली धाडसी कारवाई

Spread the love

स्टोन क्रेशरसह कोट्यावधीची सामुग्री वन विभागाने घेतली ताब्यात 

आगामी विधानसभा निवडणुकीपुर्वी कंत्राटदार दादाराव ढगे यांच्या मागे लागले हे शुक्लकाष्ठ ; तर यामागे राजकीय षडयंत्र असण्याची शक्यता ?

अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : पिंपळकौठा मगरे ता.मुदखेड शिवारातील वन जमिनीवर उभारण्यात आलेल्या स्टोन क्रेशरवर उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय नांदेडच्या अधिकाऱ्यांनी दि.२३ जुलै रोजी धाडसी कारवाई केली असून या कारवाईत १६ हायवा,५-मिक्सर,१-रुटर,१-जेसीबी,१-रोलर,१-लेव्हलर,१-पाणी टँकर,४-क्रेशर युनिट यासह स्टोन क्रेशरची कोट्यावधीची सामुग्री ताब्यात घेतली असून दादाराव ढगे पाटील यांच्याविरुद्ध वन अधिनियमाच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आगामी विधानसभा निवडणूकीच्या संदर्भाने मुलीच्या भावी आमदारकीसाठी भोकर विधानसभा मतदारसंघात त्यांनी संपर्क दौरे सुरु केले आहेत.याच दरम्यान वन विभागाने ही कारवाई करुन त्यांच्या मागे शुक्लकाष्ठ लावले असल्याने हे एक ‘राजकीय षडयंत्र’ ही असू शकते? असे त्यांच्या अनेक हितचिंतकांतून बोलल्या जात आहे.
नांदेड जिल्ह्यात वन विभागाच्या मोठ्या प्रमाणात राखीव जमीनी आहेत.या जमीनीवर शासनाच्या वतीने झाडे लावणे व त्यांचे संवर्धन करणे,वनतळे तयार करणे यासह विविध शासकीय योजना राबविल्या जातात.तसेच या राखीव वनक्षेत्राचा कोणालाही वापर करता येत नाही.वापर केल्यास तो कायदेशीर गुन्हा ठरतो व वन विभागाच्या वतीने त्या विरुद्ध कारवाई केली जाते.असे असतांनाही पिंपळकौठा मगरे ता. मुदखेड शिवारातील चिदगिरी रस्ता परिसरात एक स्टोन क्रेशर उभारले आहे.तसेच त्या वनपरिक्षेत्रातील जमीनीवर मोठ्या प्रमाणात खोदकाम करुन दगड काढून गिट्टी तयार केली असल्याची माहिती वनविभागाला समजल्यानंतर वनविभागाचे प्रमुख उपवनसंरक्षक केशव वाबळे यांनी याबाबतची दखल घेतली.तसेच त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सहाय्यक वन संरक्षक (तेंदु कँम्पा) भिमसिंह ठाकुर,वनपरिक्षेत्र अधिकारी (फिरते पथक) के.डी.राठोड,वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) संदीप शिंदे,विभागीय कार्यालयाचे वन सर्वेक्षक अनिल मज्जनवार, नागेश आलगुंडे व इतर वित्तविभागाच्या  कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या मोठ्या पथकाने दि.२३ जुलै २०२४ रोजी तेथे भेट देऊन तपासणी केली.यावेळी तेथे उभारण्यात आलेले ते स्टोन क्रेशर वन विभागाच्या जमीनीवर अनाधिकृतपणे उभारले असल्याचे त्याच्या निदर्शनास आले.तसेच त्या राखीव जमीनीवर जवळपास १५ ते १६ मोठ मोठे गिट्टीचे ढिगारे ही आढळून आले.याचबरोबर गिट्टीची वाहतूक करण्यासाठी आणलेले जवळपास १५ ते १६ हायवा ट्रक ही तेथे उभे केलेले दिसून आले.तसेच त्या परिसराची पाहणी केली असता राखीव जमीनीवर खड्डे करुन दगड खोदून काढल्याचे ही त्यांच्या निदर्शनास आले.यामुळे सदरील पथकाने सायंकाळी स्टोन क्रेशरची महागडी यंत्रसामुग्री,१६-हायवा,५-मिक्सर,१-रुटर,१-जेसीबी,१-रोलर,१-लेव्हलर,१-पाणी टँकर,४-क्रेशर युनिट यासह इतर कोट्यावधीची सामुग्री ताब्यात घेतली.सदरील स्टोन क्रेशर व मुद्देमाल ओमकार कन्स्ट्रक्शनचे मालक तथा मुदखेड व भोकर विधानसभा मतदार संघातील मोठे प्रस्थ शासकीय कंत्राटदार दादाराव ढगे पाटील यांचे असल्याचे समजले. यावरुन शासकीय कंत्राटदार दादाराव ढगे पाटील यांच्या विरुद्ध सदरील पथक प्रमुखाच्या अहवालावरुन वन विभागाने वन अधिनियम १९२७ चे कलम २७(ई),(एफ),(जी),(एच) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आगामी विधानसभा निवडणुकीपुर्वीच मुलींसाठी भावी आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या शासकीय कंत्राटदार दादाराव ढगे पाटील यांच्या मागे लागले आहे हे शुक्लकाष्ठ ; तर सदरील कारवाई मागे ‘राजकीय षडयंत्र’ असण्याची शक्यता ?

सदरील कारवाई संदर्भात म्हणणे जाणून घेण्यासाठी शासकीय कंत्राटदार दादाराव ढगे पाटील यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.परंतू त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या मुलीला भोकर विधानसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी पक्ष श्रेष्ठींकडे केल्याचे समजते.उमेदवारी दिल्यास त्यांच्या कन्या या मतदार संघात प्रबळ उमेदवार ठरु शकतात.याच अनुषंगाने त्यांनी भोकर विधानसभा मतदार संघातील मुदखेड, भोकर व अर्धापूर तालुक्यातील अनेक गावांत संपर्क दौरे सुरू केले आहेत.त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुक काळात दादाराव ढगे पाटील हे स्वपक्ष व विरोधी पक्षाच्या काही भावी तथा संभाव्य उमेदवारांपुढे मोठे ‘स्पीड ब्रेकर’ ठरु शकतात. याची जाणीव ‘काहींना’ झाली असल्यानेच दरम्यानच्या काळात त्यांना अडचणीत आणण्यासाठी व स्टोन क्रेशरला टाळे लावण्यासाठी सदरील कारवाई केली असावी आणि त्यांच्या मागे हे शुक्लकाष्ठ लावण्यात आले असावे ? कारण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याविरुद्ध सलग कारवाई करण्याची मालिका सुरु आहे.त्यामुळे सदरील कारवाई मागे देखील ‘राजकीय शडयंत्र’ असू शकते ? असे नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांच्या काही हितचिंतकांनी म्हटले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !