ज्यांनी दिली समाजोन्नतीची हमी त्यांच्या सोबत आम्ही-प्रदेशाध्यक्ष उत्तम बाबळे
अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनचा महायुतीस पाठींबा ; खा.अशोक चव्हाण,श्रीजया चव्हाण यांसह आदींना दिले पाठींब्याचे पत्र
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : महायुती सरकारने माघील काळात मातंग व वंचित अनुसूचित जातीच्या समाजोन्नतीसाठी काही ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.तसेच पुढील काळातही कामे करण्याची हमी दिली आहे.म्हणून त्यांना साथ देण्याचा निर्णय अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेने घेतला असून माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण,भोकर विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार ॲड.श्रीजया चव्हाण,देगलूर-बिलोली मतदार संघाचे उमेदवार जितेश अंतापूरकर,मुखेड मतदार संघाचे उमेदवार डॉ.तुषार राठोड यांसह आदींना पाठींब्याचे पत्र दिले आहे.
मातंग व तत्सम वंचित जाती समुहाने सकल मातंग समाज, सामाजिक कार्यकर्ते व अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून समाजोन्नतीपर मागण्यां मंजूर व्हाव्यात यासाठी अनेक आंदोलने केली.याची दखल घेऊन भाजपा,शिवसेना (शिंदे गट),राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) महायुती सरकारने माघील कार्यकाळात मातंग व तत्सम वंचित जातींच्या उन्नतीसाठी काही महत्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय घेतले.जसे की,दि.१ ऑगस्ट २०२४ रोजी बार्टीच्या धर्तीवर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थे (आर्टी)ची निर्मिती केली.अनुसूचित जातीतील मातंग व तत्सम वंचित जातींच्या उन्नतीसाठी मा.सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण उपवर्गीकरण अ,ब,क,ड करण्याचा अधिकार राज्यांना असल्याचा निर्णय दिला.त्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मा.उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायीक समिती नेमली.आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या पावन समाधीस्थळीचे संगमवाडी पुणे येथील भव्य स्मारक उभारण्यासाठी मोठा निधी मंजूर केला.रशिया सारख्या बलाढ्य देशात विश्व साहित्य भुषण डॉ.अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारला,साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांना मुंबई येथील स्मारक समितीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती दिली.अमित गोरखे यांना विधान परिषदेची आमदारकी दिली.यांसह आदी मागण्या मंजूर केल्या.
तसेच होऊ घातलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीनंतर पुढील काळात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर नियुक्त समितीच्या अहवालानुसार अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करणे,विश्व साहित्य भुषण साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा ठराव घेऊन तो केंद्र सरकारकडे पाठविणे व केंद्र सरकार डॉ. अण्णा भाऊ साठे यांना या पुरस्काराने सन्मानित करेल अशी हमी सकल मातंग समाज व तत्सम वंचित जातींना या सरकारने दिली आहे.आणि उपरोक्त मागण्यांसह पुढील काळात येणारे विविध प्रश्न हे सरकार सोडविल असे अपेक्षित आहे.त्यामुळे ‘ज्यांनी दिली समाजोन्नतीची हमी त्यांच्या सोबत आम्ही’ राहू व होऊ घातलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना साथ देऊ असा निर्णय अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेसह अनेक समाज बांधवांनी घेतला आहे.म्हणून अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतिश कावडे,प्रदेशाध्यक्ष उत्तम बाबळे,राज्य सचिव शिवाजी नुरुंदे,संघटक नागेश तादलापूरकर यांसह आदींनी माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण,देगलूर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार जितेश अंतापूरकर,मुखेड मतदार संघाचे उमेदवार डॉ.तुषार राठोड, नांदेड दक्षिण मतदार संघाचे उमेदवार आनंद बोंढारकर यांना पाठींब्यांचे पत्र दिले आहे.तर भोकर विधानसभा मतदार संचाच्या उमेदवार ॲड.श्रीजया अशोकराव चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष उत्तम बाबळे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नामदेव वाघमारे,अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेचे नांदेड जिल्हा सचिव चंद्रकांत बाबळे,गजानन गाडेकर,परमेश्वर भालेराव,शिवकुमार गाडेकर यांसह आदींनी दिले आहे.तसेच भोकर येथील आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे आणि साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी भव्य पुतळे उभारण्यात येऊन सुशोभिकरण करण्यात यावे अशी मागणी केली असून हे मी नक्कीच करेन अशी शास्वती ॲड.श्रीजया चव्हाण यांनी दिली आहे.