Sun. Dec 22nd, 2024

संदिप काळे व डॉ.अभिजीत सोनवणे यांना सेवा समर्पणचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

Spread the love

भोकर येथील सेवा समर्पण परिवाराच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त नेत्ररोग निदान शिबीर,महारक्तदान शिबीर व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे करण्यात आले आहे आयोजन

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : सेवाभावे समर्पीत होऊन ग्रामस्वच्छता,जलसंधारण, शिक्षण,आरोग्यसेवा अशा आदी क्षेत्रात निस्वार्थपणे अविरतपणे अमुल्य योगदान देणाऱ्या भोकर येथील सेवा समर्पण परिवार या सेवाभावी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त प्रतिवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात.त्याच अनुषंगाने ५ व्या वर्धापन दिनानिमित्त नेत्ररोग निदान शिबीर,महारक्तदान शिबीर व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावर्षी पत्रकारिता क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेले संपादक संदिप काळे यांना पत्रकारितेतील राज्यस्तरीय सेवा समर्पण आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ.अभिजीत सोनवणे यांना समाजसेवेतील योगदानामुळे राज्यस्तरीय समाजसेवा सेवा समर्पण पुरस्कार दि.३१ मार्च रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येऊन गौरविण्यात येणार आहे.अशी माहिती सेवा समर्पण परिवाराचे अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड यांनी दि.२६ मार्च रोजी संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
सेवा समर्पण परिवार भोकर या सेवाभावी संस्थेच्या वतीने संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त प्रतिवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात.यावर्षी संस्थेचा ५ वा वर्धापन दिन असून त्या औचित्याने राबविण्यात येणार असलेल्या कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देण्यासाठी दि.२६ मार्च २०२४ रोजी देशमुख कॉम्प्लेक्स,पंचायत समिती समोर, भोकर येथे संस्थेचे अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड,सचिव विठ्ठल फुलारी व पदाधिकारी डॉ.रामेश्वर भाले,प्रा.डॉ.उत्तम जाधव,प्रा.बालाजी काळवणे,दिगांबर देशमुख,रवि देशमुख यांसह आदींच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२९ मार्च २०२४ रोजी नागापूर ता. भोकर येथे सकाळी १०:०० वाजता नेत्ररोग निदान शिबीर होणार आहे.तर दि.३० मार्च २०२४ सकाळी १०.०० वाजता माऊली मंगल कार्यालय किनवट रोड,भोकर येथे महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच याच ठिकाणी दि.३१ मार्च २०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

महारक्तदान शिबीराचे उद्घाटन भोकर चे तहसिलदार सुरेश घोळवे यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.पंजाब चव्हाण,प्राचार्य संजय देशमुख,नायब तहसिलदार तथा भोकर नगर परिषदेचे प्र.मुख्याधिकारी मारोती जगताप यांची उपस्थिती राहणार आहे.तर राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.दत्ता भगत,उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अव्वर सचिव राजेंद्र खंदारे, भोकर उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी,भोकर अप्पर पोलिस अधिक्षक डॉ.खंडेराव धरणे यांसह आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.सदरील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभ हस्ते सेवा समर्पण परिवाच्या वतीने सकाळ समुहाचे संपादक तथा व्हाईस ऑफ मिडीयाचे संस्थापक अध्यक्ष संदिप काळे यांना राज्यस्तरीय पत्रकारिता सेवा समर्पण पुरस्कार व सामाजिक कार्यकर्ते डॉ.अभिजीत सोनवणे यांना राज्यस्तरीय समाजसेवा सेवा समर्पण पुरस्कार प्रदान करण्यात येऊन गौरविण्यात येणार आहे.या पुरस्कारचे स्वरूप रोख ११ हजार रुपये,मानपत्र व सन्मानचिन्ह असे राहणार आहे.संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेस बहुसंख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.उत्तम जाधव यांनी मानले असून नेत्ररोग निदान शिबीराचा गरजूंनी लाभ घ्यावा व महारक्तदान शिबिरात रक्तदान करुन राष्ट्रीय उपक्रमात योगदान द्यावे आणि होणार असलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन सेवा समर्पण परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

समाजसेवक डॉ.अभिजीत सोनवणे यांच्याविषयी ही अल्पश: माहिती…
डॉ.अभिजीत सोनवणे हे त्यांच्या सेवाभावी संस्थे मार्फत पुणे येथे नऊ प्रकल्प राबवितात…
संस्थेचे नऊ प्रकल्प… !
सोहम ट्रस्ट अंतर्गत “डाॕक्टर फाॕर बेगर्स” या अनोख्या उपक्रमांतर्गत नऊ प्रकल्प सुरु आहेत.
नवरात्रीतील नऊ दिवसांप्रमाणे,हे नऊ प्रकल्प सध्या सुरु आहेत.”भीक” नावाच्या दैत्याचा नाश होवुन पीडित आणि दुर्बल घटकाच्या आयुष्यात “दसरा” हा सण यावा, याच भावनेने हे नऊ प्रकल्प सुरु आहेत.
१) भिक्षेक-यांना वैद्यकीय सेवा देणे…
धार्मिक स्थळांबाहेर नाईलाजाने भीक मागत असलेल्या भिक्षेक-यांवर रस्त्यांवरच मोफत उपचार.गरज भासल्यास मोठ्या हाॕस्पिटल मध्ये अॕडमिट करुन मोफत उपचार,डोळ्यांचे आॕपरेशन,कृत्रिम हात पाय बसवणे इ. सद्या ११०० भिक्षेकरी या सुविधेचा लाभ घेत आहेत.
२) भिक्षेकरी ते गावकरी…
भीक मागणा-या व्यक्तींना समाजात स्थान मिळवून देण्याकरीता संस्था धडपडत आहे.भीक मागणे सोडल्याशिवाय त्यांना गावकरी म्हणून समाजात स्थान मिळणार नाही हे ओळखुन भाजी विकणे,नारळ विकणे,बुटपाॕलीश व्यवसाय, चहाचे दुकान असे व्यवसाय टाकुन देणे.तरुण भिक्षेक-यांना वाॕचमन,वेटर अशा नोक-या मिळवून देणे.या माध्यमांतुन १८५ कुटुंबं स्वावलंबी झाली आहेत.गावकरी म्हणून त्यांना मानाचं स्थान मिळालं आहे.
३) भीक नको,बाई शीक…
भीक मागणा-या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देवून ५२ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी संस्थेने घेतली आहे. यात पहिलीपासून बी.काॕम.पर्यंतची मुले लाभ घेत आहेत.
४) आता नको भीक,चल योगा शीक…
भिक्षेक-यांनी शारिरीक मानसिक निरोगी रहावे या हेतूने भिक्षेक-यांसाठी रस्त्यांवरच योगासन वर्ग घेतले जातात. यातुन त्यांचे शारीरीक व मानसिक व्याधी बरे करणे हा मुळ हेतू आहे.
५) भिक्षेकरी नोकरी महोत्सव …
अंगात काही कला असूनही ज्यांना भीक मागावी लागते अशा हुनरबाज लोकांना एकत्र आणुन,ज्यांच्याकडे अशा प्रकारची कामे उपलब्ध आहेत अशा उद्योजकांशी यांचा संवाद घडवून आणला जातो.प्रत्यक्ष व्यक्तीशी चर्चा करुन,उद्योजक योग्य त्या व्यक्तीला काम देतात.काम मागणारा आणि देणारा,अशा दोघांच्याही फायद्याचा हा प्रकल्प.
६) भोक्ता ते दाता…
सद्या रुग्णांसाठी रक्ताची कमतरता आहे.साथीच्या रोगात नविन रक्तदाते घराबाहेर पडून रक्तदान करायला उत्सुक नाहीत.अशा वातावरणात संस्थेने ११०० भिक्षेक-यांच्या रक्त तपासण्या करुन रक्तदानास वैद्यकीय पात्र अशा ३५० भिक्षेक-यांना रक्तदानास प्रवृत्त केले आहे. जनकल्याण रक्तपेढी मार्फत हा उपक्रम सुरु असून,आयुष्यभर समाजाकडुन “भीक” घेणारा भिक्षेकरी रक्त “दान” करुन समाजाचे ऋण फेडत आहे.
७) बेघर…ते आपलं घर…
ज्या व्यक्ती आयुष्याच्या अंताला लागलेल्या आहेत आणि रस्त्यावर बेवारस पडलेल्या आहेत,अशा व्यक्तींना रस्त्यावरच शुचिर्भूत केले जाते आणि महाराष्ट्रातील शासनमान्य वृद्धाश्रम मध्ये किंवा निवारा केंद्रांमध्ये त्यांची सोय केली जाते.आज पर्यंत अशा ७५ निराधार व्यक्तींची सोय महाराष्ट्रात विविध ठिकाणी केलेली आहे.
८) खराटा पलटण…
दुर्बल घटकाच्या हाताला काहीतरी काम मिळावे यासाठी संत गाडगेबाबा यांच्या विचाराने प्रेरित होऊन संस्थेने “खराटा पलटण” सुरू केलेली आहे.सुमारे १०० भिक्षेक-यांच्या मिळून ५ टिम्स संस्थेने तयार केल्या आहेत.या टिम्स मार्फत सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता केली जाते.या बदल्यात टीममधील प्रत्येकाला मानधन दिले जाते.दुर्बल घटकाच्या हाताला रोजगार,सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता आणि आपणही स्वच्छता पाळावी असा समाजाला जाणारा संदेश, अशा तीन तत्त्वांवर चालणारा हा प्रकल्प आहे.
९) भिक्षेकरी ते कष्टकरी …
भिक मागणारांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण द्यावे आणि प्रशिक्षित झाल्यावर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.असे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे.यासाठी संस्था पुण्यात किंवा पुण्याच्या अगदी जवळपास किमान पाच गुंठे जागेच्या शोधात आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !