Sat. Dec 21st, 2024
Spread the love

तर माता सितादेवींच्या पदस्पर्षाने पावन झाली भोकर तालुक्यातील सिताखांडी

अयोध्येत दि.२२ जानेवारी रोजी प्रभू श्री राम लल्ला ची प्राणप्रतिष्ठा होत आहे.त्या औचित्याने भोकर तालुक्यातील पवित्र स्थळ श्रृंगीऋषी आश्रम व सिताखांडी विषयी प्रासंगिक लेख वाचकांसाठी-संपादक

 हिंदू पौराणिक कथांमधील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे भगवान श्री रामाचे अयोध्येच्या सिंहासनावर आरोहण होणे.भगवान श्रीराम यांनी लंकेश्वर रावणाचा पराभव केल्यावर व १४ वर्षांचा वनवास यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर जो भव्य दिव्य राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला तो न्याय आणि नीतिमान शासनाच्या स्थापनेचे प्रतीक होता,जिथे लोकांच्या कल्याणाला अग्रक्रम होता. भगवान श्री राम हे एक आदर्श राजा मानले जातात. ज्यांनी दया,करुणा,न्याय,शिस्त व शील जपत प्रजेसाठी राज्य केले.एक नीतिमान मर्यादा पुरुषोत्तम राजा म्हणून राबविलेल्या त्यांची कारकिर्दीला रामराज्य तथा एक आदर्श राज्य म्हणून मानले जाते.राज्याभिषेक सोहळ्याने अयोध्येत समृद्धी व शांततेच्या नव्या पर्वाची सुरुवातही झाली.भगवान श्री रामाच्या त्या कारकिर्दीत, राज्याची भरभराट झाली व लोक सुसंवादात सुरक्षित आणि आनंदाने जगले.राज्याभिषेक सोहळ्याला धार्मिक व आध्यात्मिक महत्त्वही होते.भगवान श्री रामाचे रामराज्याच्या सिंहासनावर आरोहण होणे हे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून पाहिले जात होते.हा सोहळा एक भव्य दिव्य सोहळा होता,या नेत्रदीपक सोहळ्याचे  साक्षीदार होण्यासाठी व नवीन राजाला शुभेच्छा, आशीर्वाद देण्यासाठी ऋषी,मुनींसह अनेक विद्वान लोक त्यावेळी आयोध्येला गेले होते.या महान तपस्वी ऋषी मुनींतील एक नाव म्हणजे महान तपस्वी ‘श्रृंगीऋषी’ हे होय.भगवान श्री रामाचा राज्याभिषेक सोहळा हा वाईटावर नीतिमत्तेच्या विजयाचे,न्याय व नीतिमान शासनाची स्थापना, समृद्धी आणि शांततेच्या नवीन युगाची सुरुवात झाल्याचे प्रतीक होते.प्रचलित कथा व अख्यायिकांनुसार अशा ऐतिहासिक अजरामर सोहळ्याच्या पुजेत,होम हवन करण्यात ज्यांचे पवित्र हस्त लागले व सहभागी होण्याचे भाग्य ज्यांना लाभले आहे त्या महान तपस्वी श्रृंगऋषी यांचे नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील सोमठाणा,सावरगाव माळ, देवठाणा,रेणापूर,बटाळा, किन्हाळा,थेरबन व शिनगारवाडी या गावांच्या मधोमध असलेल्या जंगलात आणि पूर्व दिशेला वाहत जाणाऱ्या सुधा नदीच्या तीरी वास्तव्य झाले आहे.भोकर शहरापासून ५ ते ६ कि.मी.अंतरावर व सावरगाव माळ या गावापासून अगदी जवळ रेणापूर गावशिवार हद्दीत ‘श्रृंगीऋषी’ यांचे आश्रम आहे.प्रचलित अख्यायिकांनुसार या परिसरात भगवान श्रीराम, माता सितादेवी व लक्ष्मण यांचा या जंगलात प्रवास झाला आहे.या प्रवासादरम्यान माता सितादेवी यांना तहान लागली असता लक्ष्मणाने बाण मारला व त्याठिकाणी शुद्ध नितळ पाण्याचा एक झरा प्रवाहित झाला.त्या झऱ्याच्या पाण्याने माता सितादेवींची तहान भागली.परंतू काही दिवसांनी त्या झऱ्याच्या प्रवाहाची गती कमी झाली.ही बाब लक्षात घेऊन श्रृंगऋषी यांनी भगवान श्रीराम राज्याभिषेक सोहळ्यास जातांना या झऱ्याचे पाणी आपल्या सोबत नेले व ते शरयू नदीच्या पवित्र पाण्यात टाकले आणि त्याठिकाणचे पाणी आपल्याकडे घेतले.तसेच त्यातील काही पाणी काशी येथे टाकले व तेथील पाणी सोबत घेतलेल्या त्या शरयूच्या पाण्यात मिसळले आणि राज्याभिषेक सोहळ्यावरुन परत येतांना ते पाणी आपल्या सोबत येथे आणले.सोबत आणलेले ते पवित्र पाणी त्या झऱ्याच्या उगमस्थानी टाकले.त्यामुळे तो झरा पुन्हा प्रवाहित झाला व १२ महिने वाहू लागला.ही किमया त्या पवित्र पाण्याचीच आहे म्हणावे लागेल.आजही तो झरा जीवंत असून उत्तर-दक्षिण वाहतो.शरयू व काशी येथील पवित्र पाणी या झऱ्याच्या उगमस्थानी टाकले गेले आणि हा झरा अजरामर प्रवाहित झाल्याने यास ‘शरयू-काशीचा’ झरा म्हणून ही काहीजण संबोधतात.याच झऱ्याच्या पश्चिमेस तपस्वी श्रृंगऋषी यांचे वास्तव्य झाले आहे.महान तपस्वी ‘श्रृंगीऋषी’ यांचे वास्तव्य झालेल्या ठिकाणी कालांतराने तपस्वी श्री विष्णुदत्त ब्रम्हचारी महाराज यांनी वास्तव्य केले आहे.श्री विष्णुदत्त ब्रम्हचारी महाराज हे देखील थोर तपस्वी व आयुर्वेदाची चांगली माहिती असणारे बहुगुणी व्यक्तीमत्व होते.त्यांनी गेल्या जवळपास ६५ ते ६७ वर्षांपूर्वी श्रृंगीऋषी मंदिर बांधले. या मंदिराची देखभाल ते करत असत. दरम्यानच्या काळात प.पु.ह.भ.प.श्री विष्णुदत्त ब्रम्हचारी महाराज हे शनिवार दि.६ एप्रिल १९६३ रोजी समाधिस्त झाले. त्यांची समाधी त्या मंदिर परिसरात आहे.श्रृंगीऋषी आश्रम व मंदिराचे मुख्य विश्वस्त म्हणून भोकर पंचायत समितीचे माजी सभापती अप्पाराव देशमुख सोमठाणकर हे येथील कामकाज पाहतात.मंदिराचा परीसर अंदाजे १.६० हेक्टर आर असून मंदिराच्या परिसरामध्ये प्राचिन महादेव मंदिर देखील आहे. तसेच श्री गणेश मंदिर व राधाकृष्ण मंदिर ही आहे.श्रृंगीक्षषींचे वास्तव्य झालेल्या ठिकाणी एक भूसूरुंग असून ते सद्या बंद करण्यात आले आहे.श्री दत्त‍ जयंतीच्या दिवशी तसेच श्रावण महिन्यामध्ये श्री श्रृंगीऋषी मंदिर व आश्रम येथे भावीकांची गर्दी असते.तसेच लक्ष्मणाच्या शक्तीमुळे येथील बारमाही झऱ्याचा उगम झाला आहे अशी श्रद्धा असल्यामुळे भक्तगण कार्तीक महिन्याामध्ये येथे दरवर्षी लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आयोजीत करतात.तर माता सितादेवींच्या पदस्पर्षाने पवित्र झालेल्या सिताखांडी येथून उगम झालेल्या सुधा नदीच्या पाण्यात या झऱ्याचे पाणी मिसळते व याच नदी प्रवाहावर बांधण्यात आलेला सुधा प्रकल्प हा मोठा जलाशय भोकर तालुक्यातील नागरिकांसाठी आशिर्वादरुपी वरदान ठरला आहे.तर माता सितादेवी,लक्ष्मण व श्रृंगीऋषी यांच्या पदस्पर्शाने भोकर तालुक्याची भूमी पावन झाली असून तपस्वी श्रृंगीऋषी यांनी येथील पाणी श्रीराम राज्याभिषेक सोहळ्यास अयोध्या येथे नेऊन व शरयूचे पाणी येथे आणून आयोध्येशी भोकर चे पवित्र नाते जोडले आहे.

तर माता सितादेवींच्या पदस्पर्षाने पावन झाली भोकर तालुक्यातील सिताखांडी
भगवान श्रीराम कथा व प्रचलित अख्यायिकांनुसार भगवान श्रीराम हे १४ वर्षाचा वनवास संपवून पत्नी सितादेवी,लक्ष्मण यांच्या सोबत अयोध्येत परतल्यानंतर नतदृष्ट विचारांच्या लोकांनी माता सितादेवी यांच्या पवित्र चारित्र्यावर शिंतोडे उडविणाऱ्या वल्गणा व कुजबुज सुरु केली.शीलवंत तथा मर्यादा पुरुषोत्तम राजा म्हणून ख्याती असलेल्या श्रीरामास ते सहन झाले नाही व त्यांनी भाऊ लक्ष्मणास पत्नी सितादेवी यांना परत वनवासात सोडण्यात यावे असे सांगितले. आज्ञाधारक भाऊ लक्ष्मणाने भावाचा आदेश शिरोवर घेतला व माता सितादेवी यांना वनवासात सोडण्यासाठी निघाले.याच दरम्यान माता सितादेवी यांचा प्रवास ज्या जंगलातून झाला त्या जंगल परिसरास ‘सिताखांडी’ म्हणून संबोधले गेले आहे.
उंच व घणदाट झाडे,दऱ्या,खोऱ्यांनी व्यापलेल्या ज्या भूमीत माता सितादेवी व लक्ष्मण आले तो भूमी परिसर नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील सिताखांडी होय. या ठिकाणी ते पोहचल्यावर माता सितेस तहान लागली असल्याने त्यांनी लक्ष्मणाकडे पाण्याची मागणी केली. परिसर नवखा,भयान जंगल,पाणी कुठेही आढळले नाही.त्यामुळे पाणी कुठे शोधायचे ? हे समजू न शकल्याने लक्ष्मणाने बाण मारून जमिनीतून पाणी वर काढले.त्या स्थळाला ‘लक्ष्मण डोह’ अशी ओळख मिळाली आहे.तो ‘लक्ष्मण डोह’ आजही आजही अस्तित्वात आहे.लक्ष्मणाने ते पाणी मोठ्या पर्णाच्या दोन द्रोणात घेतले व माता सितेस देण्यासाठी आणले.परंतू प्रवासात थकलेल्या माता सितेस तेथे झोप लागली.ती झोपमोड होऊ नये म्हणून लक्ष्मणाने माता सितेस उठविले नाही व त्या उठल्यावर पाणी पितील म्हणून त्या पाण्याचे एक द्रोण उशास व दुसरे द्रोण पायथ्यास ठेवले. माता सिता या गाढ झोपेत असल्याने पुर्वेस ठेवलेल्या द्रोणास त्यांचा पाय लागला व पश्चिमेस ठेवलेल्या द्रोणास हात लागून ते दोन्ही द्रोण लवंडले. त्या पाण्यातुनच पूर्वेला सुधा तर पश्चिमेला सिता अशा दोन नद्यांचा उगम झाला. आजही अस्तित्वात असलेल्या या दोन नद्यांचे उगमस्थान सिताखांडी आहे.तर या नद्यांच्या उगमस्थानावरुन दुसरी एक आख्यायिका अशी ही आहे की, येथे सितामातेसाठी असलेल्या स्नानगृहातून वाहणारे पाण्याचे दोन प्रवाह निघाले त्या प्रवाहांचे सुधा व सिता नदीत रुपांतर झाले. एकाच ठिकाणी उगम झालेल्या या दोन नद्यांचा पाणी प्रवाह एकाच दिशेने न वाहता विरुद्ध दिशेने वाहतोय हा माता सितेच्या पावित्र्याचा महिमा असून भौगोलीक व नैसर्गिक चमत्कारच आहे असे म्हटल्या जाते.
भोकर पासून ८ कि.मी.अंतरावर असलेल्या निसर्गरम्य सिताखांडी परिसराच्या मध्यभागातून महाराष्ट्र -तेलंगणा राज्यास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग जातो.येथे उगम पावलेल्या सुधा नदीचा प्रवाह पुढे महान तपस्वी श्रृंगीऋषी आश्रम परिसरातून उगम पावलेल्या त्या बारमाही झऱ्याच्या पाणी प्रवाहात मिसळतो.याच संगमावर भोकर तालुक्यातील जनतेसाठी वरदान ठरलेला सुधा प्रकल्प हा मोठा जलाशय बांधण्यात आला आहे.तर याच सुधा नदीवर पुढे तेलंगणा राज्यातील म्हैसा मंडळ येथे गडन्ना सुधा वाघू हा विशाल जलाशय बांधण्यात आला.तसेच ही सुधा नदी पुढे दक्षिण गंगा म्हणून सर्व परिचित असलेल्या गोदावरी नदीत विलीन होते. त्यामुळे सुधा नदीस गोदावरीची उपनदी म्हणून ओळखल्या जाते.सिताखांडी येथे श्रीराम,सिता व लक्ष्मण यांचे मंदिर, महादेव मंदिर असून दर्शनासाठी व पर्यटनासाठी भाविक भक्तांसह अनेकजणांची ये-जा असते.भोकर तालुक्यातील सिताखांडी व तपस्वी श्रृंगीऋषी आश्रम पवित्र भूमी प्रभू श्रीराम यांच्या आनंदोत्सवी,सुख आणि दुःखाच्या कार्यकाळाची साक्षीदार असल्याने श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने सजायला पाहिजे होती ?मर्यादा पुरुषोत्तम राजा प्रभू श्रीराम,माता सितादेवी, लक्ष्मण यांच्या वनवास-दु:खाच्या काळात सिताखांडी व श्रृंगीऋषी आश्रम परिसरात त्यांचे पदस्पर्श झाला व ही भूमी पवित्र झाली.तर महान तपस्वी श्रृंगीऋषी यांनी प्रभू श्रीरामाच्या राज्याभिषेक आनंदोत्सवात सहभागी होऊन भोकर तालुक्यातील पवित्र जल अयोध्येत नेऊन भोकर चे आयोध्येशी पवित्र नाते जोडले.हे भोकर तालुक्यातील जनतेचे सौभाग्य आहे.भोकर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री झाले असता त्यांनी सन २०१० मध्ये सिताखांडी परिसरास पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळवून दिला आहे.तर नांदेड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी श्रृंगीऋषी आश्रम परिसरास तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळवून दिला आहे.असे असले तरी म्हणावा तसा या दोन्ही ऐतिहासिक व धार्मिक ठिकाणचा विकास झालेला नाही. तर देशाचे पंतप्रधान विकास पुरुष नरेंद्र भाई मोदी यांच्या हस्ते दि.२२ जानेवारी २०२४ रोजी आयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर जिर्णोद्धार व श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा होत आहे. या मंगल औचित्याने संपूर्ण देशात आनंदोत्सव,दीपोत्सव साजरा केला जात आहे.भोकर शहर व तालुक्यातील अनेक गावांत ही आनंदोत्सव व दीपोत्सव साजरा केला जात आहे. ऐतिहासिक,पौराणिक,धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या सिताखांडी व श्रृंगीऋषी आश्रम येथे ही मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव आणि दीपोत्सव व्हायला पाहिजे. परंतू तसे होतांना दिसत नाही.सिताखांडी येथे देविदास महाराज यांच्या पुढाकारातून मंदिरात पुजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.तर श्रृंगीऋषी आश्रम येथे सोमठाणा,सावरगाव माळ व आदी गावांतील भक्तगणांनी पुजा व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. ऐरवी निवडणूकींच्या प्रचार शुभारंभाचे श्रीफळ या ठिकाणी फोडणा-या पुढाऱ्यांनी मात्र या पवित्र ठिकाणांकडे पाठ फिरवल्याने अनेकांतून खंत व्यक्त होत आहे.तसेच भोकर तालुक्यातील सिताखांडी व तपस्वी श्रृंगीऋषी आश्रम पवित्र भूमी ही प्रभू श्रीराम यांच्या आनंदोत्सवी,सुख आणि दुःखाच्या कार्यकाळाची साक्षीदार असल्याने श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठापणा निमित्ताने भव्य दिव्यत्वाने सजायला पाहिजे होती ? किमान अख्यायिकांवर विश्वास असणाऱ्यांनी तरी हे करायला पाहिजे होते,असे ही अनेकांतून बोलल्या जात आहे.

भविष्यात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या कलशारोहण सोहळ्या प्रसंगी तरी पवित्र श्रृंगीऋषी आश्रम ते सिताखांडी चा परिसर शुशोभित व्हायला पाहिजे,आनंदोत्सवी सोहळ्यांनी बहरला पाहिजे, श्रीराममय झाला पाहिजे अशी अपेक्षा ठेवतो व थांबतो!

जय सिता राम!!
उत्तम बाबळे,संपादक


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !