श्रीजया चव्हाण २ महिन्यात आमदार मुलगी म्हणून तुमच्या घरी येणार ! ना.गिरीश महाजन
अरेच्चा ‘सस्पेन्स’ संपला-महायुतीच्या कार्यकर्त्यांनो लागा कामाला…ना.गिरीश महाजन यांच्या वक्तव्यातून श्रीजया अशोकराव चव्हाण याच भोकर विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार असल्याचे झाले शिक्कामोर्तब !
उत्तम बाबळे,संपादक
भोकर : भोकर विधानसभा मतदार संघाने महाराष्ट्र राज्यास स्व.डॉ.शंकरराव चव्हाण व अशोकराव चव्हाण यांच्या रुपाने दोन मुख्यमंत्री दिले.स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या कुशीत मार्गदर्शनाखाली वाढलेल्या आणि चव्हाण घराण्यातील तिसऱ्या पिढीतील श्रीजया चव्हाण यांना या मतदार संघात सेवा करण्याची संधी मिळणार आहे.येत्या २ महिन्यांत आमदार मुलगी म्हणून तुमच्या घरी त्या येणार आहेत,असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दि.१७ ऑगस्ट रोजी भोकर येथील संत सेवालाल महाराज स्मारकाच्या भूमिपुजन सोहळ्या प्रसंगी व्यक्त केले. त्यामुळे भोकर विधानसभा मतदार संघातील महायुतीचा उमेदवार कोण असणार आहे ? याविषयीचा ‘सस्पेन्स’ संपला असून महायुतीतील अन्य इच्छूक व संभाव्य उमेदवारांच्या उमेदवारी मागणीला तुर्तास तरी विराम मिळाला आहे.
हे पहा काय म्हणालेत ना.गिरीश महाजन आणि श्रीजया अशोकराव चव्हाण
काँग्रेस व भोकर विधानसभा मतदार संघातील आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात गेलेले माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू असलेले सहकारी राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत भोकर तालुक्यातील ९२६ कोटी रुपये निधीच्या विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपुजन सोहळ्यांचे आयोजन केले होते.यात प्रामुख्याने (६.८७ कोटी) शासकीय विश्रामगृह समस्थर लोकार्पण), हूडको अंतर्गत ४२ किलो मीटर रस्त्यांची सुधारणा (५५० कोटी, भुमिपूजन),पिंपळढव साठवण तलाव आणि सूधा प्रकल्पाची उंची वाढवण्याच्या कामाचे भुमीपूजन (११६.४८ कोटी),पिंपळढव,मोघाळी,लामकाणी,२० किलोमीटर रस्त्याचे भूमिपूजन (११०.६२ कोटी),सार्वजनिक बांधकाम विभागीय ईमारत (८२७ कोटी) (लोकार्पण),तहसील व उपविभागीय निवासस्थानाचे भुमिपूजन(७२८ कोटी), उपजिल्हा रुग्णालय निवासस्थान भुमिपूजन (४३.५३कोटी), गाव तलावाचे पूर्नरूज्जीवन व शूशोभीकरण भुमीपुजन (२८.५४ कोटी),औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचे लोकार्पण (८.१२कोटी),बालाजी मंदिर ते बोरगाव रस्ता सूधारणा भुमिपूजन (३ कोटी),भोकर बाह्यवळण रस्त्याचा लोकार्पण (३७ कोटी) या कामांचा समावेश होता.
तसेच ७ कोटी रुपये निधीतून भोकर येथील संत सेवालाल महाराज व संत रामराव महाराज यांच्या स्मारकाच्या उभारणीचा भूमिपुजन सोहळा जि.प.हायस्कूल भोकर च्या प्रांगणात संपन्न झाला.ना.गिरीश महाजन यांच्या हस्ते स्मारकाच्या उभारणीचे भूमिपुजन झाले.तर सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खा.अशोकराव चव्हाण हे होते.यावेळी खा.डॉ. अजित गोपछडे,आ.राजेश पवार,आ.डॉ.तुषार राठोड,माजी आमदार अमिता चव्हाण,माजी आमदार अमरनाथ राजूरकर, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल,माजी जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख,जिल्हा उपाध्यक्ष भगवान दंडवे,डॉ.राम नाईक,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष राजेश्वर देशमुख,रामचंद्र मुसळे गोविंद पाटील नागेलीकर, रामसिंग चव्हाण,विनोद चव्हाण यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती.सोहळ्याच्या पार्श्वभूमीविषयी स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ.उत्तम जाधव यांनी प्रास्ताविकातून मनोगत व्यक्त केले.तर बांबूसिंग महाराज पोहरादेवी,दीक्षा गुरु प्रेमसिंग महाराज,आ.डॉ.तुषार राठोड, रोहिदास जाधव यांसह आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मनोगत व्यक्त करतांना श्रीजया चव्हाण यांनी बंजारा समाजाने आशिर्वादासह माझ्या पाठीशी रहावे असे,आवाहन केले.विशेष बाब म्हणजे भावी आमदार श्रीजया चव्हाण यांनी ‘नारळ फोडण्याचे’ कार्यक्रम केल्याची स्पष्टोक्ती दिली व ज्या स्मारकाच्या उभारणीचे भूमिपुजन होते आणि ते स्मारक बांधल्या गेले नसतांनाही बांधल्याचे वक्तव्य केले.तर अध्यक्षीय समारोप करतांना खा.अशोकराव चव्हाण म्हणाले की,सदरील स्मारकासाठी ७ कोटी रुपये मंजूर केलो आहे व पुढे ही निधी कमी पडू देणार नाही.माझे वडील स्व.डॉ.शंकरराव चव्हाण आणि संत रामराव महाराज यांचे चांगले संबंध होते.संत रामराव महाराज यांनी मला आशिर्वादरुपी ‘एक लिंबू’ काढून दिला होता व ‘जा तुझा विजय होईल’ असे म्हटले होते.त्यांच्या आशिर्वादाने मी मुख्यमंत्री होऊ शकलो.असे ही ते म्हणाले.तर पालकमंत्री गिरीश महाजन बोलतांना पुढे म्हणाले की, पोहरादेवी ही बंजारा समाजाची काशी आहे.तेथील तीर्थ स्थानाला आमच्या सरकारने ६५० कोटी दिले.खा.अशोकराव चव्हाण हे विकास पुरुष आहेत.त्यांनी आपल्या मतदारसंघात खूप निधी आणला,परंतू मी माझ्या मतदारसंघात एवढा निधी नेऊ शकलो नाही.चव्हाण घराण्याला विकासाचा वारसा आहे. त्यामुळेच येथील मतदारांनी स्व.डॉ.शंकरराव चव्हाण, अशोकराव चव्हाण यांना मुख्यमंत्री केले व अमिता अशोकराव चव्हाण यांना आमदार केले.आता चव्हाणांची तिसरी पिढी श्रीजया चव्हाण या देखील येत्या २ महिन्यात आमदार मुलगी म्हणून तुमच्या घरी येईल,असे ही ते म्हणाले.त्यांच्या सदरील वक्तव्यांने भोकर विधानसभा मतदार संघातील महायुतीचा उमेदवार कोण असेल ? यावर शिक्कामोर्तब झाले आहे.भोकर व नांदेड जिल्ह्यातून बहुसंख्येने बंजारा समाजातील महिला व पुरुष उपस्थित राहिलेल्या भूमिपुजन सोहळ्याचे सुरेख असे सुत्रसंचालन मोहन राठोड यांनी केले आणि उपस्थितांचे आभार डॉ.राम नाईक जाधव यांनी मानले.
अरेच्चा ‘सस्पेन्स’ संपला-महायुतीच्या कार्यकर्त्यांनो लागा प्रचार कामाला…ना.गिरीश महाजन यांच्या वक्तव्यातून श्रीजया चव्हाण याच भोकर विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार असल्याचे झाले शिक्कामोर्तब !
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम लवकरच वाजणार आहेत.त्या औचित्याने महायुतीतील पक्षांचा मतदार संघ निहाय वाटा आणि कोटा किती ? हे निश्चित व्हायचे आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष व भोकर विधानसभा मतदार संघातील आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आणि राज्यसभेची खासदारकी मिळवली.एवढ्यावरच न थांबता दरम्यानच्या काळात त्यांनी मुलगी श्रीजया चव्हाण यांना भोकर विधानसभा मतदार संघाच्या भावी आमदार म्हणून विविध कार्यक्रम,उपक्रम,प्रचार व प्रसिद्धी माध्यमांतून पुढे आणले.यामुळे भाजपातील व महायुतीतील शिवसेना(शिंदे गट),राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील (अजित पवार गट) इच्छूक उमेदवारांच्या मागणीवर पाणी फेरले जात होते.असे असतांनाही काही इच्छूकांना आम्हास उमेदवारी मिळेल अशी आशा व अपेक्षा होती.परंतू ना.गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यातून ती अपेक्षा ही भंग झाली आहे.काही दिवसांत भाजपा ५० उमेवारांचे नावे निश्चित करणार आहे.ती यादी प्रसिद्ध होण्यापुर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी ना.गिरीश महाजन यांनी उपरोक्त वक्तव्य केल्याने भोकर विधानसभा मतदार संघातील महायुतीचा उमेदवार कोण असेल ? हे सस्पेन्स संपले असून श्रीजया अशोकराव चव्हाण याच उमेदवार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.म्हणून महायुतीच्या पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचार कार्याला लागण्यास हरकत नाही,असे बोलल्या जात आहे.