श्री शाहू भोकरच्या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेतून १ ते २ जानेवारीला ठरणार ‘महाराष्ट्राचा द्वितीय महावक्ता’
कै.माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे हे आहे द्वितीय वर्ष
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोकर च्या वतीने माघील वर्षापासून कै.माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून यंदा दि.१ ते २ जानेवारी दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.तर ‘ईव्हीएममुळे भारतीय लोकशाही धोक्यात आहे/नाही’ याविषयावर आपल्या वक्तृत्व कौशल्याच्या सादरीकरणातून विजेता स्पर्धक यावर्षी ‘महाराष्ट्राचा द्वितीय महावक्ता’ होणार आहे.
श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोकर च्या वतीने माघील वर्षापासून कै.मा.आ.बापूसाहेब देशमुख गोरठेकर राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.गेल्या वर्षी स्पर्धेचा विषय ‘आरक्षणामुळे सामाजिक व आर्थिक समस्या सुटतील काय? होय/नाही’ ठेवण्यात आला होता आणि प्रथम विजेत्याला ‘महाराष्ट्राचा महावक्ता’ म्हणून उपाधी बहाल करण्यात आली होती.३१ हजार रुपयांच्या प्रथम बक्षिसासह या उपधीची पहिली हक्कदार ठरली होती संत ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालय धुप्पा,जि.नांदेड ची विद्यार्थिनी कु.ऋतुजा पाटील. तर यंदाचा ‘महाराष्ट्राचा द्वितीय महावक्ता’ दि.१ ते २ जानेवारी २०२४ रोजी दरम्यान आयोजित स्पर्धेतून ठरणार असून यावर्षीच्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचा विषय ‘ईव्हीएममुळे भारतीय लोकशाही धोक्यात आहे/नाही’ असा आहे.तसेच भोकर येथील श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय’ येथे ही स्पर्धा दोन फेऱ्यांत पार पडणार आहे.
राज्यातील सर्व महाविद्यालयांच्या सर्व शाखांच्या पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या युवकांना या स्पर्धेत भाग घेता येईल.स्पर्धेत सांघिक आणि वैयक्तिक पातळीवर पारितोषिके देण्यात येतील.प्रत्येक महाविद्यालयाचा एकच संघ सहभागी होऊ शकतो.त्या पैकी एक स्पर्धक विषयाच्या अनुकूल बाजूने व दुसरा स्पर्धक विषयाच्या प्रतिकूल बाजूने आपलं मत सांसदीय भाषेत मांडू शकतो.यावर्षीच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धेच्या दोन फेऱ्या होतील.पहिली फेरी दि.१ जानेवारी रोजी होईल व पहिल्या फेरीसाठी केवळ तीन मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे आणि पहिल्या फेरीतील उत्कृष्ट ठरलेल्या १० संघांना दुसऱ्या फेरीत प्रवेश देण्यात येणार आहे.
दुसरी फेरी दि.२ जानेवारीला पार पडेल व त्यातून प्रथम येणाऱ्या एका महाविद्यालयीन संघास फिरता चषक देऊन गौरविण्यात येईल.या व्यतिरिक्त वैयक्तिक स्तरावर पहिले पारितोषिक ३१ हजार रुपये,दुसरे पारितोषिक २१ हजार रुपये व तिसरे पारितोषिक ११ हजार रुपये असे आहे.तर वैयक्तिक पातळीवर समान गुण मिळाल्यास ते पारितोषिक दोघांत विभागून देण्यात येईल.दुसऱ्या फेरीतील स्पर्धकासाठी स्पर्धेचा वेळ केवळ ७ मिनिटे असेल व या वेळेत त्यास आपल्या वक्तृत्व कौशल्याची कस पणाला लावायची आहे आणि ‘महाराष्ट्राचा महावक्ता’ व्हायचे आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचे नियम पुढीलप्रमाणे…
स्पर्धेनंतर त्याच ठिकाणी बक्षीस वितरण होईल.स्पर्धा आयोजकांकडून प्रवास,भोजन व निवास खर्च अनुज्ञेय असणार नाही.स्पर्धेला येणाऱ्या संघाने आपल्या महाविद्यालयाच्या लेटरपॅडवर स्पर्धकाचे नाव, प्राचार्यांच्या सही व शिक्यानिशी ७५८८५२३५२० या क्रमांकावर व्हॉट्सॲपवर दि.३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पाठवणे आवश्यक आहे.येताना महाविद्यालयाचे ओळखपत्र सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही व परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.अशी माहिती श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोकर चे प्राचार्य संजय सावंत देशमुख यांनी दिली आहे.