Thu. Apr 10th, 2025

शफकत आमना (भा.पो.से.) यांची पदोन्नतीने धाराशिव येथे अपर पोलीस अधीक्षक पदी झाली बदली

Spread the love

सेवा कर्तव्यपूर्तीचा यथोचित गौरव करुन भोकर पोलीसांनी केली त्यांची पाठवणी

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भारत सरकार गृह मंत्रालयाने महाराष्ट्रातील काही कनिष्ठ श्रेणीतील भा.पो.से.(आयपीएस) पोलीस अधिकाऱ्यांना वरीष्ठ समय श्रेणीत पदोन्नती दिली आहे. त्यास अनुसरुन भोकर येथील सेवारत सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी शफकत आमना यांची पदोन्नतीने धाराशिव येथे अपर पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली असून भोकर पोलीस उपविभात त्यांनी उत्तम सेवा कर्तव्य बजावले असल्याने भोकर पोलीसांनी दि.३ मार्च रोजी त्यांचा यथोचित सेवा कर्तव्यपूर्ती गौरव करुन पाठवणी केली आहे.

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने महाराष्ट्रातील भारतीय पोलीस सेवा(आयपीएस)कनिष्ठ श्रेणीतील ५ पोलीस अधिकाऱ्यांना परिपत्रक,क्र.४५०२०/११/९७-आयपीएस-दोन,दि.१५ जानेवारी १९९९ व भारतीय पोलीस सेवा (पे) अधिनियम २०१६ यांमधील तरतुदींनुसार वरिष्ठ समय श्रेणीत पदोन्नती देण्यात आली आहे. त्यात सन २०१९ च्या तुकडीतील व भोकर येथे सेवारत असलेल्या सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी शफकत आमना (आयपीएस) यांचा समावेश असून वरीष्ठ समय श्रेणीनुसार पदोन्नतीने त्यांची धाराशिव येथे अपर पोलीस अधीक्षक पदी बदलीने नियुक्ती करण्यात आली आहे.सदरील आदेश महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाने व राज्य शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या डिजिटल स्वाक्षरीने दि.२८ फेब्रुवारी २०२५ रोजी निर्गमित करण्यात आले आहे.भारतीय पोलीस सेवा(आयपीएस) कनिष्ठ श्रेणीतील व वरीष्ठ समय श्रेणीत पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आलेले पोलीस अधिकारी पुढील प्रमाणे आहेत. १)सन २०१८ च्या तुकडीतील मालेगाव जि.  नाशिक येथे सेवारत असलेले सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तेगबिर सिंग संधु यांची दि.१ जानेवारी २०२४ रोजी पदोन्नती झाली असून पदोन्नतीने मालेगाव जि.नाशिक येथे अपर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.२)सन २०१९ च्या तुकडीतील माजलगाव जि.बीड येथे सेवारत असलेले सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी धीरज कुमार बच्चु यांची दि.१ जानेवारी २०२५ रोजी वरीष्ठ समय श्रेणीत पदोन्नती करण्यात आली व पदोन्नतीने अमरावती ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.३) सन २०२० च्या तुकडीतील लोणावळा जि.पुणे येथे सेवारत असलेले सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी एम.व्ही.सत्य साई कार्तिक यांची दि.१ जानेवारी २०२४ रोजी वरीष्ठ समय श्रेणीत पदोन्नती करण्यात आली व पदोन्नतीने अहेरी,गडचिरोली च्या अपर पोलिस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.४)तर सन २०२० च्या तुकडीतीलच फैजपूर जि.जळगाव येथे सेवारत असलेल्या सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांची दि.१ जानेवारी २०२४ रोजी वरीष्ठ समय श्रेणीत पदोन्नती करण्यात आली व पदोन्नतीने छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) ग्रामीण च्या अपर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच अनिकेत भारती(भा.पो.से.),पंकज कुमावत (भा.पो.से.),गौहर हसन(भा.पो.से.) व सुनिल लांजेवार( रा.पो.से.) यांची देखील बदली करण्यात आली असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहेत.

सेवा कर्तव्यपूर्तीचा यथोचित गौरव करुन भोकर पोलीसांनी केली त्यांची पाठवणी

पदोन्नत अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांनी गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पोलीस उपविभाग भोकर येथे उत्कृष्ट सेवा कर्तव्य बजावले आहे.गैर कायदाचे कृत्य व वर्तन करणाऱ्या अपवृत्तीवर त्यांनी आळा घालण्यासाठी या काळात यशस्वी प्रयत्न केले होते.त्याच बरोबर पोलीस उपविभाग क्षेत्रातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक देत गुन्हेगार व गुन्हेगारीवर आळा घातला होता.पदोन्नतीने नुकतीच त्यांची बदली झाल्याने भोकर पोलीसांच्या वतीने दि.३ मार्च २०२५ रोजी भोकर पोलीस ठाण्यात त्यांचा सेवा कर्तव्यपूर्ती पाठवणी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सदरील सोहळ्यास भोकर चे अपर पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराव धरणे यांची मुख्य उपस्थिती होती. त्यांच्या मुख्य उपस्थितीत भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी साडी चोळी,शॉल व पुष्पगुच्छ देऊन अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांचा यथोचित गौरव केला.याचबरोबर भोकर पोलीस ठाण्यातील सेवारत सहायक पोलीस निरीक्षक शैलेंद्र औटे,सहायक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड,पोलीस उपनिरीक्षक सुरेश जाधव,सेवा निवृत्त पोलीस उपनिरीक्षक केशव राठोड,जमादार सोनाजी कानगुले,गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचारी परमेश्वर गाडेकर,पो.कॉ.प्रमोद जोंधळे, पो.कॉ.जी.एन.आरेवार यांसह आदी पुरुष व महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचा यथोचित गौरव करुन पुढील सेवाकार्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आणि त्यांची पाठवणी केली.तर भोकर पोलीस उपविभागातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवा कार्यकाळात सहकार्य केल्याबद्दल शफकत आमना यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !