विज्ञानवादी मराठी साहित्याचे जागतिक विद्यापीठ म्हणजे डॉ.अण्णा भाऊ साठे होय-संपादक उत्तम बाबळे
राज्य परिवहन महामंडळ भोकर बस आगारात साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांचा १०४ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : साहित्यरत्न सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांनी नकारात्मक परंपरेच्या तत्वज्ञान जगतात आपल्या झुंजार लेखणीच्या सामर्थ्याने वास्तव तथा सकारात्मक विज्ञानवादी मराठी साहित्याचे जागतिक विचारपीठ तयार केले.यामुळेच त्यांचे साहित्य २७ भाषेत भाषांतरित झाले. नव्हे तर त्यांच्या साहित्यावर आज असंख्य अभ्यासक, विद्यार्थी अभ्यास करुन पीएचडी घेताहेत.म्हणून डॉ. अण्णा भाऊ साठे हे केवळ एक साहित्यिक नसून विज्ञानवादी मराठी साहित्याचे जागतिक विद्यापीठ होत, असे प्रतिपादन अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन चे प्रदेशाध्यक्ष संपादक उत्तम बाबळे यांनी व्यक्त केले.राज्य परिवहन महामंडळ भोकर बस आगाराच्या वतीने आयोजित डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती सोहळ्या प्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भोकर बस आगाराच्या वतीने प्रति वर्षी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.याच औचित्याने भोकर आगारातील अधिकारी,कर्मचारी,चालक, वाहक व आदींच्या वतीने दि.१ ऑगस्ट २०२४ रोजी भोकर आगारात साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक संजयकुमार ना.पुंडगे हे होते.तर प्रमुख वक्ते म्हणून अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संपादक उत्तम बाबळे हे होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बस स्थानक प्रमुख पी.जी.साखरे,सेवानिवृत्त कर्मचारी सायलू काळे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटीत कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमारे,नगर परिषद कर्मचारी संघटनेचे दिलीप वाघमारे,सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार गाडेकर,राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ भोकर चे पदाधिकारी पत्रकार गंगाधर पडवळे,विशाल जाधव,गजानन गाडेकर यांसह आदींची उपस्थिती होती.याप्रसंगी गिरी महाराज यांनी मनोगतातून डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे जीवन कार्य मांडले.प्रमुख वक्ते म्हणून बोलताना संपादक उत्तम बाबळे पुढे म्हणाले की,अविज्ञानवादी परंपरागत जगतात जगणारे लोक चिकित्सकता व विवेकशीलता हरवून बसतात. परिणामत: जगण्यासाठी लढण्याचे बळ ही गमावून बसतात. अविज्ञानवादी परंपरांत नकारात्मकतेची बीज पेरलेली असतात.ही बीज दलित,शोषित,वंचित,पिडीत,कष्टकरी, कामगार व सर्व सामान्य माणसांत रुजली गेली तर ते मानसिक गुलामगिरीत ही अडकून पडू शकतात.आणि हे होऊ नये म्हणून जगण्यासाठी लढण्याचे बळ देण्याकरिता आपल्या अनुभवाच्या संचयावर डॉ.अण्णा भाऊ साठे यांनी अनेक प्रकारे विज्ञानवादी साहित्याची निर्मिती केली.जसे की,’मरी आईचा गाडा’.मरी आईचा गाडा ही डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या सिद्धहस्ते अवतरलेली एक अप्रतिम विज्ञानवादी कथा आहे.ती अविज्ञानवादींना विज्ञानवादी शिक्षणाची प्रेरणा देते.म्हणून डॉ. अण्णा भाऊ साठे हे थोर विज्ञानवादी साहित्यिक आहेत,असे ही ते म्हणाले.तर अध्यक्षीय समारोप संजयकुमार पुंडगे यांनी केला.यावेळी भोकर बस आगारातील बहुसंख्य वाहक,तंत्रज्ञानी, महिला व पुरुष अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.विद्युत रोषणाईने बस स्थानकाची केलेली सजावट, स्वादिष्ट भोजनासह अतिशय नियोजनबद्ध व आनंदोत्सवात संपन्न झालेल्या या जयंती सोहळ्याचे प्रास्ताविक,सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन वरीष्ठ लिपीक श्रीदत्त चाटलावार यांनी केले.तर हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जे.ए.सुर्यवंशी,एन. एस.पोतरे,आर.एन.गजभारे,यु.पी.कदम,व्ही.पी.वाघमारे,बी. पी.शिवेवार,शै.चं.गुडमेवार,आर.एस.पवार यांसह आदींनी परिश्रम घेतले.