समाज भुषण सतिश कावडे यांनी वाटेगावच्या पवित्र मातीशी नतमस्तक होऊन व्यक्त केली कृतज्ञता
डॉ.अण्णा भाऊ साठेंच्या कर्मभूमी मुंबईत पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर जन्मभूमी वाटेगावच्या पवित्र मातीशी नतमस्तक होण्यास दिला अग्रक्रम
उत्तम बाबळे,संपादक
मुंबई/वाटेगाव : नांदेड येथील समाजसेवक सतिश कावडे यांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दिला जाणारा ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाज भुषण पुरस्कार’ देऊन दि.१२ मार्च रोजी मुंबईत सन्मानित करण्यात आले.जीवनपथावर ‘ज्या’ महापुरुषांना आपले श्रद्धास्थान व प्रेरणास्थान मानून समाजसेवी कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न केल्या जातो ‘त्या’ महान व्यक्तीमत्वांच्या नावाचा पुरस्कार देऊन एका सामान्य सामाजिक कार्यकर्त्यास जेंव्हा सन्मानित केल्या जाते तेंव्हा ही बाब त्या व्यक्तीसाठी अतिशय गौरवाची आणि तेवढीच जबाबदारीची असते.याची जान असलेल्या समाज भुषण सतिश कावडे यांनी डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या कर्मभूमी मुंबईत हा सन्मानाचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या घरी न जाता प्रथम जन्मभूमी वाटेगावच्या पवित्र मातीशी नतमस्तक होण्यास अग्रक्रम दिला असून तेथे जाऊन नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त केली आहे.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाजसेवी संस्था आणि व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाज भुषण यांसह आदी महापुरुषांच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मानित केल्या जाते.मागील चार वर्षांच्या काळातील सन २०१९ ते २०२३ या दरम्यानचे हे पुरस्कार वितरण प्रलंबित होते.त्याच अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे,आमदार किशोर जोरगेवार,ज्ञानेश्वर म्हात्रे,भरत गोगावले,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मुख्य सचिव सुमंत भांगे,समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया,बार्टीचे महासंचालक सुनील वारे,माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे,माजी आमदार राम गुंडूले यांसह आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दि.१२ मार्च २०२४ रोजी नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस,नरिमन पॉईंट मुंबई येथे प्रलंबित पुरस्कार वितरणाचा भव्य सोहळा संपन्न झाला.यावेळी ९३ सेवाभावी संस्था व ३०० वैयक्तिक अशा ३९३ जणांना उपरोक्त उल्लेखित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यात वसूर,ता.मुखेड जि.नांदेड येथील अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ समाजसेवक सतिश लक्ष्मणराव कावडे यांचा ही समावेश आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मुख्य सचिव सुमंत भांगे याच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाज भुषण पुरस्कार देऊन त्यांना ही यावेळी सन्मानित करण्यात आले.
या आनंदोत्सवी सन्मान सोहळ्या प्रसंगी समाज भुषण सतिश कावडे यांच्या सोबत त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. ललिताताई कावडे,मुलगी,जावई,नातवंडे,भाऊ चंद्रकांत कावडे,अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष संपादक उत्तम बाबळे,प्रदेश उपाध्यक्ष परमेश्वर बंडेवार,प्रदेश सचिव शिवाजी नुरुंदे यांसह आदींची उपस्थिती होती.
शोषित,पीडित,वंचित,उपेक्षित,अशिक्षित,अस्पृश्य,शेतकरी,कष्टकरी,कामगार,गरजू,गरीब यांसह आदींना अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे,अंधश्रद्धेतून आत्मश्रद्धेकडे,आंतरिक संघर्षातून परमशांतीकडे,अस्वास्थातून स्वास्थाकडे,अन्यायातून न्यायाकडे,असमानतेतून समतेकडे,दु:खातून सुखाकडे, गुलामीतून मानवमुक्तीकडे आणि अपयशाच्या दरीतून यशाच्या शिखराकडे नेण्यासाठी येथील अनेक संत,महंत,महापुरुषांनी आपले जीवन निस्वार्थपणे खर्ची घातले. यातीलच एक नाव म्हणजे विश्व साहित्य भुषण साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे हे होय. शिव-लहु-फुले-शाहू-आंबेडकर-अण्णा भाऊ यांसह आदी महापुरुषांची प्रेरणादायी चळवळ तथा विचार स्विकारुन व अंगिकारुन सामाजिक चळवळींच्या माध्यमातून अनेक समाजसेवी लोक अन्याय अत्याचाराविरुद्ध विविध आंदोलने करुन आणि संघर्षमयी लढा देऊन अनेकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात.तशाच सेवाभावीतील एक नाव म्हणजे समाज भुषण सतिश कावडे हे होय.साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे प्रेरणादायी विचार स्विकारुन व अंगिकारुन सतिश कावडे यांनी देखील सामाजिक न्यायासाठी आजपर्यंत निस्वार्थ समाजसेवी कर्तव्य बजावले आहे.त्यांच्या उल्लेखनीय कर्तव्याची दखल घेऊन राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाज भुषण पुरस्कार’ प्रदान करुन त्यांना सन्मानित केले आहे.
आपली अस्मिता,आस्था,श्रद्धास्थान व प्रेरणास्थान असलेल्या महापुरुषाच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मानित होणे यापेक्षा मोठा दुसरा आनंद असूच शकत नाही.विशेषत: हा पुरस्कार साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या कर्मभूमीत त्यांना प्रदान करण्यात आल्याने त्यांचा आनंद देखील द्विगुणितच झाला.परंतू भारावून जात हा आनंद व्यक्त करत व अभिनंदनाचे पुष्पहार,तुरे घेत मिरवण्याऐवजी महापुरुषांच्या अनंत उपकारांची जान असलेल्या समाज भुषण सतिश कावडे यांनी आपल्या घरी न जाता सर्वप्रथम साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या पवित्र जन्मस्थळी वाटेगाव ता.वाळवा जि.सांगली येथे जाऊन त्या मातीशी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आणि पुरस्कार स्वीकारलेल्या दिवशीच मुंबईहून वाटेगावची वाट धरली.त्यांच्या समवेत उत्तम बाबळे,परमेश्वर बंडेवार,चंद्रकांत कावडे असे आम्ही तिघे गेलोत.दि.१३ मार्च २०२४ रोजी दुपारी १:०० वाजता वाटेगाव येथे आम्ही सर्वजण पोहचलो.सत्यशोधक डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मस्थळी अर्थातच त्यांच्या घरात ठेवण्यात आलेल्या त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास समाज भुषण सतिश कावडे यांनी पुष्पहार अर्पण केला व या प्रतिभावंता सामोर नतमस्तक होऊन त्यांना आणि पवित्र मातीशी वंदन केले.आम्ही सर्वांनी देखील हे केले.तसेच सतिश कावडे यांनी डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या वारसदार असलेल्या सुनबाई श्रीमती सावित्रीबाईं मधूकर साठे यांना पुष्पगुच्छ शॉल,साडी,चोळी चा आहेर देऊन पुरस्कार मिळाल्या बाबद कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी श्रीमती सावित्रीबाईं साठे यांनी देखील सतिश कावडे यांसह आम्हा सर्वांचा ही यथोचित सन्मान करुन पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.काही वेळ आम्ही तेथील शिल्प सृष्टी पाहिली व यानंतर समता नायक वीर योद्धा फकिरा यांच्या पवित्र समाधीचे सर्वांनी दर्शन घेतले आणि परतीच्या मार्गावर निघालो.समाज भुषण सतिश कावडे यांच्या नावापुढे आता डॉ. अण्णा भाऊ साठे यांचे नाव पुरस्काराच्या माध्यमातून शासनमान्यतेने जोडल्या गेल्याने त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी पडली आहे.याचे भान,जान ठेऊन अख्खी हयात त्या नावाचा कुठेही अवमान होईल असे कृत्य हातून घडू देणार नाही व अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा देत त्यांच्या सन्मानार्थ प्रेरणादायी विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा संकल्प समाज भुषण सतिश कावडे यांनी परत निघतांना केला आहे.ही बाब अभिनंदनीय असून साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या कर्मभूमी मुंबईतील व पवित्र जन्मभूमी वाटेगाव येथील आनंदोत्सवी अविस्मरणीय प्रसंगी समाज भुषण सतिश कावडे यांच्यासोबत उपस्थित राहून दोन्ही ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्याचे भाग्य चळवळीतले सहकारी म्हणून आम्हास मिळाले.त्यामुळे आम्ही देखील कृतज्ञता व्यक्त करतोत.तसचे समाज भुषण सतिश कावडे यांच्या हातून पुढील काळात अशीच समाजसेवा घडत रहावी यासाठी त्यांना उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य मिळो अशी निसर्ग निर्मिकाकडे विनम्र प्रार्थना करतोत आणि मनस्वी शुभेच्छा देऊन थांबतो.