भोकर येथील कामगार नेते कॉम्रेड पी.एन.राजापूरकर यांचे दु:खद निधन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : शेतकरी,कष्टकरी,कर्मचारी आदींच्या न्याय हक्कासाठी लढणारे एक अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून ओळख असलेले मुळचे राजापूर ता.धर्माबाद येथील व ह.मु.श.प्रफुल्ल नगर, मुदखेड रोड भोकर येथे स्थायिक झालेले सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी तथा कामगार नेते कॉम्रेड पिराजी नागोराव राजापूरकर (६३) यांचे दीर्घ आजाराने नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान दि.२ एप्रिल २०२४ रोजी दुपारी २:०० वाजताच्या दरम्यान दु:खद निधन झाले आहे.
स्व.पी.एन.राजापूरकर हे सार्वजनिक बांधकाम विभागात एक कर्मचारी म्हणून सेवा बजावत असतांना देखील त्यांनी आपल्या नौकरीची कधीही पर्वा केली नाही व त्यांनी अधिकारी, कर्मचारी,कष्टकरी,मजूरदार,शेतकरी,शोषित,वंचित,पीडित व आदींच्या प्रश्नांसाठी विविध आंदोलने केली आहेत.तसेच पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थानिक कार्यालय ते मंत्रालयापर्यंत सातत्याने पाठपुरावा करण्याची त्यांची मोठी हातोटी होती.याच बरोबर कम्युनिस्ट व फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत ही त्यांनी अमुल्य योगदान दिले असून राजकीय क्षेत्रातील एक अभ्यासू विश्लैषक म्हणून ही त्यांची ख्याती होती.गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.या जेष्ठ कामगार व सामाजिक नेत्याच्या जाण्याने चळवळीत एक मोठी पोकळी निर्माण झाली असून राजापूरकर व मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,सून, नातू असा मोठा परिवार आहे.बुधवार दि.३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठधाम हिंदू दहनभूमी भोकर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.स्व.पी.एन.राजापूरकर यांच्या परिवाराच्या दु:खात संपादक उत्तम बाबळे व परिवार सहभागी असून त्यांना विनम्र भावपुर्ण श्रद्धांजली!