Fri. Apr 11th, 2025

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रेरणादायी विचारोत्सव आनंदमयी साजरा करावा-पो.नि.अजित कुंभार

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व भारतीयांसाठी परम वंदनिय आहेत.त्यांचे कर्तुत्व व विचार तुम्हा आम्हा सर्वांसाठी हजारो वर्ष उर्जादायी आणि प्रेरणादायी आहेत. त्यामुळे त्यांचा जन्मोत्सव विविध लोकोपयोगी उपक्रमांनी व प्रेरणादायी विचारोत्सवाने आनंदमयी साजरा करावा.हा जन्मोत्सव साजरा करतांना उपद्रवींवर आळा घालण्यासाठी व कायदा,शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आम्ही सदैव कर्तव्यावर तत्पर आहोत,असे मनोमन भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी व्यक्त केले.दि.१७ फेब्रुवारी रोजी भोकर पोलीस ठाण्यात संपन्न झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
दि.१९ फेब्रुवारी २०२५ रोजी भोकर येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या औचित्याने विविध लोकोपयोगी उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी भोकर शहरातून दुचाकी व चारचाकी वाहनांची भव्य रॅली काढण्यात येणार असून रॅलीच्या सांगते नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या नियोजित ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक भोकर येथे निमंत्रित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.तसेच यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भोकर पोलीस ठाण्यात दि.१७ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सदरील बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक अजित कुंभार हे होते.तसेच भोकर तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार एस.आर.आडेपवार,महा.वि.वि. कंपनीचे अभियंता आचार्य,भोकर नगर परिषदेचे कर्मचारी प्रतिनिधी साहेबराव मोरे,सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी आनंद पाटील सिंधीकर, कपिल पाटील किन्हाळकर,माधव पाटील वडगावकर,गोविंद ढगे पाटील,शांतता समितीचे सदस्य व पत्रकार बांधव यांच्यासह आदी मान्यवरांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव कशा प्रकारे आनंदोत्सवात साजरा करता येईल व हे करतांना उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर सर्वानुमते चर्चा करण्यात आली. यावेळी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे प्रा.डॉ.व्यंकट माने, आनंद पाटील सिंधीकर,गोविंद ढगे पाटील,जेष्ठ पत्रकार एल.ए. हिरे,संपादक उत्तम बाबळे,मिर्झा ताहेर बेग,आनंदीबाई चुनगुरवाड, मिलींद गायकवाड यांसह आदींनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.तसेच अध्यक्षीय समारोप करतांना पो.नि.अजित कुंभार म्हणाले की,कार्यक्रम,उपक्रम व मिरवणुकी दरम्यान कोणी उपद्रवी कृत्य करण्याचा प्रयत्न करत असेल तर ती व्यक्ती निदर्शनास आणून द्यावी त्यांची गय केली जाणार नाही.सर्वांनी कायदा चे पालन करावे व रयतेच्या राजांचा जन्मोत्सव निर्भयपणे आनंदोत्सवात साजरा करावा.पोलीस,महसूल,महा.विद्युत वितरण कंपनी व नगर परिषद प्रशासन सदैव कर्तव्यावर तत्पर राहिल,अशी ग्वाही देखील यावेळी त्यांनी दिली.तर उपस्थितांचे आभार गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचारी परमेश्वर गाडेकर यांनी मानले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !